Posts

Showing posts from November, 2017

सराईत

घराचा उंबरठा एकदा ओलांडला की सतरा उंबरठे ओलांडवे लागतात, माझंही तसच झालं, माईकडॆ सुरक्षीत होतो पण तिथनं दैवयोगाने बाहेर पडावं लागलं आणि मग मजल दर मजल करत मी बारामतीकरांच्या अटोपशीर घराशी पोहोचलो.घरात स्थान नव्हतं पण राहण्यापुर्ती जागा होती, राहायची सोय बजेट परवडाणारं होतं पण काही अटी जाचक होत्या त्यात महत्वाची अट म्हणजे काम असो वा नसो दुपारी बारा ते पाच घराबाहेरच राहायचं त्याला रविवारही अपवाद नाही,मुबंई बंद, खग्रास सूर्यग्रहण,धो धो पाऊस यातलं काही असलं तरी..तेंव्हा माझं कामही भटकंतीचं होतं माँडेल को आर्डीनेशन म्हणजे सतत संपर्कात राहावं लागायचं त्याकरता फिरावं लागायचं, चपला झिजवाव्या लागायच्या,डॊकं भिरभिरायचं त्यात बारामतीकरांकडे आणखी एक जाचक अट होती मला फोन फक्त सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सातच घेता यायचे एरव्ही निरोप सुद्धा त्यांची मर्जी असेल मूड असेल तर घेतले जायचे.त्यांच्या घरात मी सात महिने राहिलो पण तरी ते कुटूंब मला पुर्णपणे अनोळखीच राहिलं तीन टगे निकम्मे मुलगे एक थोराड मुलगी, एक अधाशी कुत्रा दोन नोकर आणि सतत हिशोबात गढलेल्या त्या बारामतीकर बाई,आणि त्या...

सुख

थकलेल्या आईचा एकदा बसल्या जागी डोळा लागला तेंव्हा तिचा छकुला अगदी शहाण्या सारखा वागला हळूच सारली त्याने तिच्या मानेखाली उशी अन शालही पांघरली अगदी ती त्याच्यावर पांघरायची तशी आईचे डोळे मिटले होते तरी तिला दिसत होतं सगळं तिला आपलं बाळ वाटलं जगापेक्षा वेगळं मायेनं ओथंबून तिचे भरून आले डोळे आणि आई रडते म्हणून तिचे बाळ कासावीस झाले खुळे आई आई म्हणत त्याने गाठली तिची कुशी कुशीत घेत आईने त्याला दिली आपल्या हाताची उशी मग काय ते वेडं बाळ निवांत निजलं अन आईच्या पदराचं टोक ओल्या पापण्यांनी भिजलं... Edit

तृप्ती

कान्हेरे गुरुजींकडे रात्री हाततल्या बांगड्या खळखळतात घरात एकही स्त्री नसताना... अशा बांगड्या रात्री खळखळल्याकी गुरुजी मुलाला ओरडून सांगातात जाउन बघ रे फाटक उघडं राहिलय बहुतेक जाऊन बघ रे मोठ्या काकाना श्वास लागलाय बहुतेक.. कोमट पाणी पाज या प्रकाराला कंटाळून गुरुजींच्या दोन्ही मुलानी लग्न केली नाहीत, म्हणजे या तिरसट माणसाच्या किर्तीमुळे तसे योगच आले नाहीत आता आयुष्यात यांचे आदेश पाळण्याशिवाय काही रा हिलं नाही हे जणू दोन्ही मुलानी मान्य करून टाकलं होतं कान्हेरे बाई झिजून झिजून गेली तिच्या भाळी हेच भवितव्य होतं.. सुटली म्हणायचीही सोय नाही, जन्मभर अडकलेली तशी मरणानंतरही... म्हणूनच स्वैपाकघरातल्या चुलीजवळच्या फरशीवर बसायची मरणानंतरही तिथेच चिकटलेली राहिली, गुरुजींचा धाकही मेल्यावरही तसाच.. चुलीवरचं दुध उतू चाललं की धास्तावलेल्या बाईच्या बांगड्या भितीने खळखळायच्या, टाकी वाहयला लागली की बांगड्या खळखळायच्या, पंचक्रोशीत या बांगड्यांची मात पोहोचली होती दर पितृपंधरवड्यात तिच्या तिथीला जन्मभरासारखच बेचव अन्नाचं ताट ठेवलं जायचं सर्वपित्रीला घास दिला जायचा अविधवा नवमीला साडी चोळी दिली जायची पण...

लाडकी बाहुली

मकरंद सदाशीव जोशीचं अनघा केशव तुळपुळेशी रीतसर कांदेपोहे खाऊन आणि कैरीचं पन्हं पिऊन पत्रिकेतले छत्तीस गूण जुळल्यावर ठरवल्या प्रमाणे थाटामाटात लग्न झालं. रुखवत बघतानाचा फोटॊ छान आलाय तो आधी बघ असा त्याचा खास निरोप होता म्हणून त्याच्या लग्नाचा अल्बम आम्ही त्या फोटॊ पासून पाहिला. सीतेने रामाला बोटाने त्यांच्या उपवनात बागडाणारं सुवर्ण मृग दाखवलं आणि ती पोझ पिढी दर पिढी पुढे सरकत गेली आणि प्रत्येक सीता आपल्या रामाला काहीनी काही बोटाने दाखवत राहीली तोच वसा आमच्या मकरंद्ने घेतला. अनघा सारख्या गोडेगोड मुलीवर सुद्धा तो वसा घेतल्या सारखच प्रेम करत असणार.माणसाने किती टिपिकल असावं याचं मकरंद सदाशीव जोशी उत्तम उदाहरण आहे.रविवार म्हंटलं की मटकीची उसळ हवीच नाहीतर डाळींब्या, आम्हाला जेवायला बोलावलं तर तँमेटोचं सार आणि फ्रुट सँलँड ठरलेलं मधे पाव भाजीचं फँड होतं पण ते फार टिकलं नाही.अनघाला उमा फार आवडते पण मकरंद तिला जाणून बुजून उमापासून लांब ठेवतो. का तर म्हणे उमा वहिनींची बातच और आहे...सुरुवातीला मी वाद घालायचो मग सोडून दिलं काहीमाणसं आहेत तशी स्विकारावी लागतात त्यातला आमचा मकरंद शिवराम जोशी. गोरा गोरा...

संवाद

नकार कळवणारा फोन आला तो नेमका तिनेच घेतला नकार कळवणार्‍यालाही कदाचीत नकार कळवायचं दडपण आलं असावं फोन उचलल्या उचलल्या फोन कोणी घेतलाय याचा विचार नं करता , कोण बोलतय न विचारता त्याने असलेला नकार कळवून टाकला तिने नकार ऐकला आणि शांतपणे बरं म्हंटलं, वर थँक्स सुद्धा तो बुचकळ्यात पडला थँक्स कशासाठी? त्याने विचारलं ती म्हणाली निदान तुम्ही नकार कळवायची तसदी घेतलीत बरेचजण ती ही तस्दी घेत नाहीत मुलीकडच्यानाच वाट बघून चार फोन करावे लागतात नाहीतर खेटे घालावे लागतात... क्षण्भर थांबून ती म्हणाली तुम्हाला हे स्थळ पसंत नाही हे मी सांगेन बाबा ना पण नकार का दिला नाही विचारणार? ती मनापासून हसली म्हणाली नकाराला अनेक कारणं असतात होकाराला एकच ते कोणतं ? त्याने मोकळ्या स्वरात विचारलं ते होकार असेल तर कळतं नकार असल्यावर काय तो जरा अडखळला चाचरला म्हणाला माझ्याकडून होकारच होता होता म्हणजे? तिने बोलणं वाढवत विचारलं होकार होता म्हणजे होकार आहे.. पण एक घोळ झालाय, म्हणून तुमच्याकडून नकार यायच्या आधी आबा म्हणाले.. ओह! इगो सांभाळताय का? आता काय सांभाळायचय? मला वाटलं होतं नकार ऐकून जो कोण असेल तो फोन ठ...

दोघी

आता बाबांजवळ कोण ? हा गहन प्रश्न हल्ली सराफांच्या घरात वारंवार पडायला लागलाय कारण बाबांची प्रकृती ठीक नाही, सतत  लक्ष ठेवावं लागतं , तसं वय फार आहे असं नाही पण त्यांच्या स्नायूंचा जुना आजार आता जरा बळावलाय, , पचन संस्थाही त्यामुळे जरा बिनसली आणि दुसरा परिणाम म्हणजे हालचालींवर कंट्रोल नाही ब्युरोकडे अटेंडंट बद्दल सांगून थकलेत, पण मनासारखा माणूस नाही मिळत अर्थात असं बाईंचं म्हणणं आहे, त्यानी आपले सर्व क्लासेस दुसर्‍या बाईच्या हवाले करून पूर्ण लक्ष बाबांकडेच केंद्रीत केलय,अत्तापर्यंत बाबा या घरासाठी खूप झटले, खूप मेहेनत घेतली, बाईंच्या करियरमधे मनापासून मदत केली प्रोत्साहन दिलं , सराफ क्लासेसचा हा पसरलेला व्याप निव्वळ बाईंचं कर्तूत्व नव्हतं हे बाई जाणून होत्या बाईना यायला उशीर झाला तर घरी वरण भाताचा कुकर लागलेला असायचा नाहीतर मुगाची खिचडी फोडणीला पडलेली असायची, जोडीला मुलांचा अभ्यासही, तसही सराफ बाई जगाच्या मुलाना शिकवायच्या पण त्यांची मुलं बाबांजवळच अभ्यासाबाबत कंफर्टेबल असायची  तसे घरात आता  कर्तबगार समजुतदार मुलगा आहे त्याला साजेशी सुन आहे , पण दोघे वकिली  पेशात दोघ...

बदल

शशांकचं शंभू हे नामकरण त्याला अंगाला लावायला येणार्‍या बाईनी केलं आणि आज पावेतो त्याला शशांक म्हणणारं कोणी भेटलं नाही शंभू लहानपणी जसा लोभस गोंडस होता तो तसाच राहिला , तरूण झाल्यावरसुद्धा मनात भरायचा तो त्याच्या प्रांजळ डोळ्यातला ाआल्हाददायक भाव, मग त्याचं प्रसन्न हसणं आणि मग त्याचे शुभ्र दंतकळी सारखे दात त्याच्या सावळ्या गालावरच्या खळ्या आणि कुणालाही मागे सारायचा मोहं होईल अशा काळ्याभोर कुरळ्या क ेसांच्या लड्या मी ताईला म्हणायचो याच्या डोक्यावर आपण मुकुट का नाही चढवत? अगदी बाळकृष्ण दिसेल, ताईला तेंव्हा भारी कौतूक वाटायचं पण अताशा ताईला जाणवायला लागलं होतं इतका देखणा सुशील सूंदर मुलगा चार चौघांसारखा नाही निर्मळ आहे तितकाच तो बुजरा आहे काहीसा भित्रा सुद्धा तरी आमचा शंभू भाग्यवान, लहानपणी भित्रा भागुभाई असूनही कोणी त्याची टिंगल केली नाही की स्वत:च्या करमणुकीसाठी त्याला घाबरवलं नाही नाहीतर असं मुल पदरात म्हणजे नातेवाईकाना आयतीच संधी पण शंभूला आम्ही सगळ्यानीच सांभाळला आणि तो होताही तसाच खूप साधा प्रेमळ आणि जिव्हाळा जपणारा.. त्याच्या हातालाही विलक्षण गूण होता म्हणजे आहे कुणाचा पाय मु...

तिसरा वाढदिवस

लग्नाचा तिसरा वाढदिवस दोघांचा प्रेमविवाह. त्यात दोघेच घरात, दोघेही दोन्ही घरी लाडके त्यामुळे सकाळपासून फोन सुरू , तिच्या हट्टासाठी शक्य नसताना त्याने सुट्टी घेतली होती कालपासूनच उत्सवाचा माहोल होता, तिने हौसेनें फुलपुडीवाल्याला दारावर लावण्यासाठी फुलांच भरगच्च तोरण बनवायला सांगितलं होतं अंमळ उशीरा उठायचा मूड असताना त्या फुलवाल्यासाठी त्याला लवकर उठावं लागलं जरा किरकिरायला झालं.. एकतर रात्रीचं जागर ण.. हा हा म्हणजे लाडाची लेक होती ना ती! मग अगदी पप्पा मम्मा पासनं ते तिच्या बहीणी इतर भावंड, मित्र मैत्रीणी , आँफीस मधले सहकारी याच्या बाजूनेही साधारण क्रम असाच बारा वाजले आणि दोन्हीकडून फोन सुरू झाले बोलणंही तसच म्हणजे तेच ठरलेलं शुभेछ्चांचा महापूर आणि थट्टा करण्याची ठरलेली( काहीशी कंटाळवाणी) पद्धत.. पण तरी मजा आली , अशी पुढची साठ वर्ष तरी हाच क्रम राहुदे असं त्याला मनोमन वाटलं होतं पण सकाळी डोळ्यावर झोप असताना उठावं लागलं ही त्याला दिवसाची राँग सुरुवात वाटली कारण एकदा आपण उठलो की ही भर भर आवरून घे म्हणून मागे लागणार हे त्याला माहीत होतं यावरून कितीतरी रविवारच्या सकाळी दोघानी खडाजंगीत घा...

कानावर आलेली बातमी

घर बसल्या काही बातम्या कानावर येतात तशी कुणाल सराफने जोयाशी लग्न केल्याची बातमी कानावर आली. तसा अंदाज होता, तशी चर्चा होती पण इतक्या तडकाफडकी असं काही होईल असं वाटलं नव्हतं. पण जोयासाठी घरदार सोडून कुणाल बाहेर पडला होता,  आणि कुणालचं  घरदार म्हणजे साधं घर नव्हे, आठशे खिडक्या नऊशे दारं असलेलं गोविंदपंताचं घर,गोविंदपंत म्हणजे आमच्या इथली किती मोठी असामी आणि कुणाल त्यांचा एकुलता एक सद्गुणी लाखोमें एक असा मु लगा दिसायला म्हणाल तर विनोदखन्नाच्या मोठ्या मुलासारखा फक्तं त्याला केस कमी आणि आमच्या कुणालची जुल्फं म्हणजे काय विचारता? अहो असणारच माई अजून पदरानं डोकं पुसायच्या . असा कर्तब्गार मुलगा रोज हक्काने पदराने डोकं पुसून घेत असेल तर त्या माउलीला किती धन्य धन्य वाटत असेल नाही? कुठून ही जोया या मुलाला भेटली कोण जाणे? ना जातीची ना धर्माची. करते काय तर कोरिओग्राफर चिन्नीप्रकाशची असिस्टंट, राहते कुठे? तर हाँस्टेल वर गोवींदपंताना कसं चालेल हे सगळं.. पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसं... कुणाल घर सोडून गेल्यावर आम्हाला भेटलाच नाही नाहीतर हिने तरी नक्की कान धरून त्याला विचारलं असतन. ...

थांबलेली गोष्ट

महादेव मोर्डेकर, वयवर्ष साठ, व्यक्तिमत्व प्रसन्न, हसतमुख ,माणूस सूखी.समाधानी? माहीत नाही शंभू हे नाव कसं कधी मिळालं ? कोणी दिलं ? माहीत नाही. पण परिघातली माणसं शंभूच म्हणतात संदर्भानुसार हाक बदलते शंभूकाका, शंभूमामा अगदी शंकरशंभू हाक मारणारे सुद्धा आहेत. एकूण काय शंभूरावाना हाका मारणारे आणि हाकेला ओ देणारे बरेचजण आहेत. पण तरी त्यांच्या डायरीत एकटेपणा ठायी ठायी डॊकावतो.संध्याला त्यांच्या बायकोला ते च आवडत नाही. सगळं कसं मनासारखं चाललेलं असताना हा कसला विसंगत सूर? मनातल्यामनात शंभू मनासारखं या शब्दावर आक्षेप घेत असतात. डायरी चाळली तर पानोपानी हीच तक्रार आहे. तक्रारही कुणाकडे नाही. कुणाबद्दल नाही तरी तक्रार आहे..समांतर चालणारी. हा मनाचा खेळ ही असू शकतो. पण शेवटी आपण जगतो ते काय मनाचा खेळच तर आहे.साठीजवळ आलेल्या इसमाला हा खेळ प्रकर्षाने जाणवत असावा. शंभू मोर्डेकर सध्या त्या स्टेज मधून जात असावेत. संध्याला त्याची कल्पना येणच शक्य नाही. कारण तिचा जगायचा हव्यास अजून कमी झालेला नाही. आता ती सुद्धा पंचावन वर्षांची आहे पण आपल्या दोन मुलींच्या बहाण्याने ती पून्हा पून्हा जगू पाहतेय. संध्या तशी ...

बाप लेकाची गोष्ट

सकाळी सहज खिडकीत उभा राहिलो आणि माझ्या नकळत मी मनातल्या मनात जुवेकर काकांची वाट बघायला लागलो.. कदाचीत काल निजताना ही म्हणून गेली होती.. काका उद्या माँर्निग वाँक ला जातील का हो?... आणि गेले तर एकटेच जातील... एकट्याने बाहेर पडायचा काकांचा आज पहिलाच दिवस... कुठलाही पहिला दिवस तसा अवघडच असतो नाही... काय काका? आज एकटेच? असं कोणी विचारलं तर?..छे, असं कोणी विचारणार नाही म्हणा.. काँलनीत सगळ्याना माहीत आहे  कौशल आता त्यांच्या बरोबर माँर्नींग वाँक ला... माँर्नींग वाँक ला काय.. कुठेच जाणार नाही.. नाहीतर जुवेकर काकू गेल्या नंतर ही बाप लेकाची जोडी कधी फुटली नव्हती..साधे इस्त्रीचे कपडॆ द्यायला आणि आणायला सुद्धा बाप लेक दोघं एकत्र दिसायचे... दर रविवारी दुपारी जोडीने बाहेर जेवणार, दोघं पान खात घरी येणार,मग चांगले दोन तास दुलई घेऊन गुडूप परत संध्याकाळचा चहा घ्यायला दोघे गालरीत हजर...जाऊदे... आता काय काय आठवायचं?... काकानी आता माँर्नींग वाँक सोडून द्यायला हवं... असा विचार मनात आला आणि मीच तिरमिरलो.. असं काय काय सोडून द्यायचं....कशा कशाची सवय करवून घ्यायची... आणि का?... शरणागती पत्करण्याशिवाय दु...

सांगोपांग

पदूभटजी विष्णूपाद स्वामींचे निस्सीम भक्त, विष्णूपाद स्वामी जेंव्हा देहं धारण करून होते तेंव्हा पदूभटजींकडे दोनदा आले होते त्यात एकदा त्यांचे श्रीचरण धुतले तेंव्हा ते ओल्या पावलानी घरभर फिरले त्यात मधल्या खोलीच्या दाराशेजारी स्वामींच्या श्री चरणकमलांचे जे ठसे उमटले ते कायमचे... तो पदूभटजीच्या घराण्याला मिळालेला प्रसाद होता पदूभटजीना अपत्य योग उशीरा होता पण विष्णूपादस्वामींच्या आशिर्वादाने त्याना पु ढे दोन मुलगे झाले श्रीरंग आणि श्रीराम पदूभटजी बरीच वर्ष जगले शेवटपर्यंत प्रकृती उत्तम, पंचेंद्रिय पूर्ण कार्यरत.... वृती..समाधानी त्याना आपला निर्वाणकाळ कळला होता मोठ्या समाधानाने त्याना आपल्या लेकी सुना नातवंड पतवंडाना एकत्र यायला सांगितलं आपल्या दोन्ही मुलाना चार हिताच्या गोष्टी सांगितल्या दोन्ही मुलं गुणाचीच होती पदूभटजींच्याच तालमीत मोठी झाली होती पण तरी धाकट्याची वृत्ती जरा अस्वस्थ असायची... त्याला बाहेरचही जग खुणावायचं पदू भटजी असे पर्यंत त्यानी स्वत:ला आवरलं होतं पदूभटजी एकादशीचा मुहूर्त साधून गेले त्यांचं नीर्वाण म्हणजे एक सोहळाच होता डोळे मिटायच्या आधी साक्षात विष्णूपाद स्वामीनी ...

शेवंती

कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं.. पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही.. सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा.. पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर? तसं व्हायला नको.. म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो.. कधी वाटलं तर येऊन बसत  जा भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी... भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारांवर ठाम झालास तर घेतल्या निर्णयाचा पश्र्चाताप होणार नाही.. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा... आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला.. कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं.. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्प्नाच नव्हती.. एक चूकून राहिलेलं कँलेंडर होतं भिंतीवर वार्‍याने फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवज सुद्धा त्याला नवा होता... त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने कर...

परिमल

ती लग्न होऊन या घरी आली ना तेंव्हा बाकी सगळं ठीक होतं , ठीक म्हणजे छानच... बर्‍यापैकी मोठ घर, अबोल असली तरी मनानं सरळ असलेली सासू, बहिणीची माया लावणारी मोठी जाऊ आधार वाटेल असा मोठा दीर आणि जीव ओवाळून टाकावा असा लाडोबा नवरा आपले लाड करून घेण्यात पटाईत घर या दोघींवर सोपवल्यावर सासू कधी लुडबुड करायला यायची नाही... हिची बडबड कौतूकाने ऐकत राहयची एकच जाच होता स्वैपाकघराला असलेली प्रशस्त खिडकी उघडायची ना ही अशी सक्त ताकीद होती का तर प्रचंड दुर्गंधी येते, आणि ती कोणालाच सहन होत नाही... तशी ही मुळची हट्टी तिच्या आई समान वहिनीलाही तिच्या या हट्टीपणाचीच काळजी होती पाठवणी करताना हिच्या सासूच्या पाया पडताना वहिनी काकुळतीने म्हणाली होती बाकी लाखात एक आहे आमची मुलगी फक्त जरा हट्टी आहे, तेव्हढं सांभाळून घ्या... वहिनीची अशी अकृत्रीम माया बघून सासूचेच डोळे पाणावले होते पण आता चार सहा महिने झाले पण हिच्या हट्टीपणाचे काही गूण दिसले नव्हते.. एकदा हट्टाने तिने खिडकी उघडली होती पण प्रचंड दुर्गंधीने ती ही हैराण झाली त्या नंतर ती कधी ती खिडकी उघडायच्या भानगडीत पडली नाही ती भानगडीत पडली नाही असं सासूला वाटत...