दोघी

आता बाबांजवळ कोण ? हा गहन प्रश्न हल्ली सराफांच्या घरात वारंवार पडायला लागलाय
कारण बाबांची प्रकृती ठीक नाही, सतत  लक्ष ठेवावं लागतं , तसं वय फार आहे असं नाही पण त्यांच्या स्नायूंचा जुना आजार आता जरा बळावलाय, , पचन संस्थाही त्यामुळे जरा बिनसली आणि दुसरा परिणाम म्हणजे हालचालींवर कंट्रोल नाही
ब्युरोकडे अटेंडंट बद्दल सांगून थकलेत, पण मनासारखा माणूस नाही मिळत
अर्थात असं बाईंचं म्हणणं आहे, त्यानी आपले सर्व क्लासेस दुसर्‍या बाईच्या हवाले करून पूर्ण लक्ष बाबांकडेच केंद्रीत केलय,अत्तापर्यंत बाबा या घरासाठी खूप झटले, खूप मेहेनत घेतली, बाईंच्या करियरमधे मनापासून मदत केली प्रोत्साहन दिलं , सराफ क्लासेसचा हा पसरलेला व्याप निव्वळ बाईंचं कर्तूत्व नव्हतं हे बाई जाणून होत्या बाईना यायला उशीर झाला तर घरी वरण भाताचा कुकर लागलेला असायचा नाहीतर मुगाची खिचडी फोडणीला पडलेली असायची, जोडीला मुलांचा अभ्यासही, तसही सराफ बाई जगाच्या मुलाना शिकवायच्या पण त्यांची मुलं बाबांजवळच अभ्यासाबाबत कंफर्टेबल असायची
 तसे घरात आता  कर्तबगार समजुतदार मुलगा आहे त्याला साजेशी सुन आहे , पण दोघे वकिली  पेशात दोघेही नावाजलेले  दोघांची प्रँक्टीस जोरात, सकाळी बाहेर पडले की घरी किती वाजतील यायला सांगता यायचं नाही तरी हल्ली सूनबाईनी मनावर घेतलय पहिल्यापेक्षा बरीच लवकर येते , पण तिच्याशी तसा संवाद नाही म्हणजे तीच अबोल आहे जराशी आणि बाईनाही नाही जमत आपणहून संवाद साधायला
सासू सुनेचं पारंपारीक नातं असावं कुठेतरी मनात तशी ती वागत नाही त्यात ती अँड्व्होकेट.. एकदा असे विचार सुरू झाले की सुरूच होतात म्हणून बाईनी त्यावर ताबा मिळवायला  स्वत:ला शिकवलय
बरेचदा सूनबाई आली की त्या चहाचं आधण ठेवायच्या पण त्यातही प्राँब्लेम होता सुनेला  आधण ठेवताना साखर घातलेली चालायची नाही तिला वरून दीड चमचा साखर घालायची सवय आणि हे बाईंच्या लक्षात राहयचं नाही मग त्यावरून एकदा लेकानी सांगितलं आई तिची ती करून घेईल चहा मग काय एकत्र चहा घेण्याचा प्रश्नच उरला नाही , सराफ बाई आपल्या आजारी पतीच्या सेवेत जास्तच गुरफटल्या
या विरुद्ध त्यांची लेक , आली की घर भरून जायचं , ती ही तिच्या क्षेत्रात मात्तबरच पण तिने सासरही  धरून ठेवलं अर्थात बाईंचेच संस्कार तसे होते
पण एकूण माणसं कटकटी मुलगी जरा चार वेळा  माहेरी आली तर लगेच बोलायला लागली बघावं तेंव्हा हिची माहेरी धाव, मग याच म्हणाल्या नको येत जाऊस अशी
परवा जेवताना बाबाना जोराचा ठसका लागला त्यामुळे जरा थकवा आला गेले दोन दिवस बाई त्याच काळजीत होत्या त्याना  भरवावं लागायचं त्यासाठी डाँक्टर म्हणाले त्याना बसतं ठेवा म्हणजे त्यांची अन्न गिळण्याची क्रिया तुम्हाला स्पष्ट दिसेल , पण बाईंच्या हातनं त्याना उचलणं शक्य व्हायचं नाही, बाबांच्या लक्षात हे लक्षात आलं की ते अधिकच केवीलवाणे व्हायचे, मग शेजारचा राँड्रीक्स हाक मारला की यायचा तो ही फार मायेनं करायचा तो ही बाईंचा विद्यार्थी
त्यांच्या लेकीलाही बाबाना बसतं करता यायचं नाही, भिती वाटायची
सुनबाई मात्र अगदी सहज लहान बाळाला हाताळावं इतक्या अलगद पण त्यांच्या पाठीशी हात घालून त्याना पोटाशी धरून अलगद बसतं करायची
 आजही तिन्हीसांजेला हे सगळं आठवत बाई बाबांजवळ बसून होत्या
राँड्रीक्स मगाशी येऊन बाबाना बसतं करून गेला होता  म्हणून त्या बाबाना काँफी पाजू  शकल्या होत्या पन आता बराच वेळ झाला त्याना पून्हा निजतं करायला हवं होतं
कोणी मदतीला आलं तर कंबरेत हात घालून त्या त्याना सरळ खाली सरकवू शकत होत्या पण आता कोण येणार? त्यानी लेकीला फोन केला पण ती उचलेना
कोणी येण्याची शक्यता नव्हती , आपल्या डोळ्यातले अश्रू बाबाना दिसू नयेत म्हणून बाई दिवा सुद्धा लावायचं टाळत होत्या कदाचीत बाबांचे   डोळे भरून आले असले तर ते ही त्याना पाहवलं नसतं
दोघेही आहे ती परिस्थीती स्विकारून त्या वेढत जाणार्‍या अंधारात बसून होते, आज बाबांचे रिपोर्टस आणायचे होते नाहीतर मुलाने परस्पर ते मेल करून मागवून घेतले असतील पण ते ही तो आल्यवरच कळेल
अशा विचारात बाई गढून गेल्या
आणि  लँच कीनं दार उघडून सुनबाई येती झाली
आपल्या सासूला असं अंधारात बसलेलं बघून तिलाही जाणवलं
तिने हलकेच लाईट लावला घर उजेडानं झगमगल्यावर बाईंची तंद्री भंग पावली
सुन नकळत खूप छान हसली बाईना त्यानेही खूप बरं वाटलं
लवकर आलीस? बाईनी विचारलं
हो! बाबांचे रिपोर्टस आणायचे होते ना, हे म्हणाले तू पुढे हो, मग रिपोर्ट्स घेऊनच आले
काळजीचं काही कारण नाही थोडी सुधारणाच आहे
याना  निजवायचं आहे जरा त्या   संकोचत म्हणाल्या
जा तुम्ही फ्रेश होऊन या मी निजवते  बाबाना ,  कधीचं जायचच होतं  बाई तत्परतेनं गेल्या
आल्या तेंव्हा सुनबाईनी बाबाना छान निजवलं होतं ती त्यांच्याशी काहीतरी बोलत होती, बाईना आणखी बरं वाटलं चहा ठेऊ का ? साखर वरनं घालेन तुला हवी तशी
नको  बाई! मला सँशे मिळालेत काँफीचे , मस्त काँफी होते
काही करायची गरज नाही फक्त गरम गरम पाण्यात सँशे ओतला की फक्त भरपूर ढवळायचं मस्त कडक काँफी तयार, फाँर अ चेंज आज काँफी पिऊया का?
अगं मी आधी काँफीच पीत होते, या माणसाने मला बिघडवलं   छानसं हसत बाईनी बाबांकडे बघितलं बाबाही  खूप दिवसानी हसले
बाबा तुम्ही पण घेणार ना काँफी  म्हणत सुनबाई आत गेली , बाईना एकदम हुशारल्यासारखच वाटलं
यूँ गयी यूँ आयी म्हणतात तसं  सुनबाई काँफी घेऊन आली , त्या मंद सुगंधानं वातावरणात आणखी उत्साह आला, या  काँफीचा आस्वाद घेत असताना स्वैपाकीण बाई आल्या त्याना बाईनी सुचना दिल्या बाबांची विचारपूस करून त्या बाई स्वैपाकाला लागल्या
सुनेनं त्याना विचारलं बाई तुम्ही एक्स्ट्राँ पंधरा मिनिटं थांबू  शकाल का?
मी आणि बाई जरा डाँक्टरांकडे जाऊन येतो
बाई चरकल्या, अग रिपोर्ट्स नाँर्मल आहेत म्हणालीस ना?
हो  बाई, पण तरी डाँक्टर म्हणाले बाईना जरा भेटून जायला सांग
दोघी बाहेर पडल्या बाई निमूट गाडीत बसल्या
दोघी निघाल्या आणि सुनेचा फोन वाजला,
हं बोला काकी, आज  माझ्याकडे काय काम ?... हो का?  अजून मी घरी पोहोचले नाही, आँन द वे आहे
घरी गेल्यावर फोन करू का? फोन ठेवत ती बाईना म्हणाली शमी आली होती का घरी? तिच्या सासूबाईंचा फोन होता आपल्याकडे कोणी फोन घेतला नाही म्हणून मला केला
बाई मनात म्हणाल्या  मगाशी मी पण शमीला फोन केला तिने उचलला  नव्हता
बाई आपल्या विचारातून जाग्या झाल्या बघतात तर गाडी वेगळ्याच रस्त्याला लागली होती
अगं दवाखाना बदललाय का? किती दिवसात महिन्यात मी  बाहेर पडलेच नाही
म्हणून तर तुम्हाला बाहेर  काढलं सुनबाई हसत म्हणाली
मग डाँक्टर म्हणालीस ते
ते असच बाबांसमोर, पेशंट समोर शक्यतो आपले प्लँन्स सांगू नयेत असं आमचे आबा म्हणतात
शिवाय त्या स्वैपाकाच्या बाईना काय सांगणार? दोघी छान हसल्या गाडी  समुद्राशी आली अंधार पडला होता पण विविध स्टाँल्सचा झगमगाट  त्यामुळे उठून दिसत होता
सुनबाई बोलायला लागली, म्हणाली मगाशी मी आले ना तुम्हाला असं बाबांजवळ अंधारात बसलेलं बघून मला खूप फील झालं वाटलं माझी मम्मा अशी बसलेली बघितल्यावर मला काय वाटेल
तुमचा मुलगा नेहमी मला सांगतो, आणि त्यानी सांगायची गरज नाही आय आँल्सो नो तुम्ही किती कर्तबगार आहात, बाबांच्या तब्येतीनी पार तुम्हाला जखडून टाकलं, आता  बाबा सुधारले तरी त्याला लिमिटेशंस आहेत आणि ती तयारी आपल्याला ठेवायला हवी
पण म्हणून आपण  आपलं लाईफ तर जगणं सोडू शकत नाही, काहीतरी सुवर्ण मध्य शोधायला हवा
आणि तो विचार करूनच मिळेल, म्हणून आता अधून मधून बाहेर पडायला लागा जरा पाय मोकळे करून येत जा मग मनही मोकळं होईल
आपण किती काळजी घेतो हे कुणाला दाखवायला जायची गरज नाही, आपण आपल्याशी प्रामाणीक असलो तरी  इनफ आहे, तुम्ही बसा मी आईस्क्रीम घेऊन येते, सुनबाई उतरून गेली
बाई सुनबाईच्या बोलण्याचा विचार करत तशीच बसून राहिल्या... सून म्हणजे त्याना आपली मैत्रीणच वाटायला लागली त्या  त्याच मूड मधे   बाहेरचा परिसर बघत होत्या
अंधार पडला म्हणून गर्दी कमी होत नव्ह्ती उलट माणसं येतच होती
आणि  अचानक त्या भिरभिरणार्‍या गर्दीत त्याना त्यांची मुलगी दिसली , तिच्या ग्रूप बरोबर खिदळणारी धमाल करणारी
मगाशी हिच्या घरूनच फोन आला होता ना?
म्हणजे माहेरी जाते सांगून ही इथे आलिये? म्हणून हिच्या सासरचे म्हणतात बघावं तेंव्हा ही माहेरी..
म्हणजे चार वेळा  माहेरी हजेरी लाऊन ती दहावेळा आपले प्रोग्रँम्स त्या बेसवर अँरेंज करते
आपल्या बापाचं आजारपण  कँश करते, मग दिलदार माणसासारखं वागायला हिला कशाला जड जाईल
माझ्या संस्कारात...  छे छे संस्कार बिंस्कार असं काही नसतं
शेवटी प्रत्येकजण स्वतंत्र व्यक्ती घडत असते
मला अंधारात  बसलेलं बघून माझ्या सुनेला जाणवू शकत , मग ही तर माझी सख्खी मुलगी
पण दुसर्‍या घरी देऊन आपणच तिला वेगळी केली
मग ही वेगळ्या घरातून आलेल्या मुलीला आपण आपली अगदी मुलगी मानलं नाही तरी आपली मानायला काय हरकत आहे
सुनबाई आईस्क्रीम घेऊन आल्या आणि बाईनी अगदी सहज तिला तिच्या माहेरच्या नावाने हाक मारली  बबीsss

Comments

  1. Farch surekh.Apratim. Tumchya likhanatun vicharana ek navin disha milate. Khush chann.

    ReplyDelete
  2. apal mann kalayla raktatech nate asayla have ase kahi nahi... barech vel raktachya natyala je kalat nahi te parkya mansala umagte... mhanun jiv lavat raha... thank u gokhale kaka...

    ReplyDelete
  3. वाचतांना सुद्धा गलबलतं..अप्रतिम

    ReplyDelete
  4. Waahh.. Surekh Gosht

    ReplyDelete
  5. Khup chan. Bharun ala. Pratyek sunechya ayushyat ase kahi prasang yetat velich olakhun savarla tar saglech sukhi hotat

    ReplyDelete
  6. खुप दिवसांनी नवीन काही वाचलं. छान वाटलं. मनमोकळेपणाने संवाद साधला असता कठीण गोष्ट पण किती सोपी वाटायला लागते.पण हल्ली असा संवाद होतोच कुठे.

    ReplyDelete
  7. आपले मानले तर किती सोप्पे होतात ना प्रश्न

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी