दुसरी आई

’माझी आई’हा विषय शाळेत असताना निबंधासाठी हमखास असायचा
तर फार पूर्वी  एका दूर्गम भागातल्या  एका गावात एका शेतकर्‍याच्या मुलीने  माझी आई या विषयावर निबंध लिहायला घेतला
त्या निबंधाचं पहिलं वाक्य काय होतं ?
माझी आई सावत्र आहे
मी दुसरीत असताना एका संध्याकाळी आत्या आणि बाबा तिला घरी घेऊन आले
आत्यानी मला जवळ घेत सांगितलं "ही तुझी दुसरी आई"
माझी पहिली आई मला आठवत नाही, कारण मी खूप छोटी होते तेंव्हा ती देवाघरी गेली
माझ्या आज्जीनी मला मग सांभाळलं पण मग ती सुद्धा देवाकडे गेली
माझी आज्जी मला नीट आठवते
खूप प्रेमळ आणि मायाळू होती माझी आज्जी, माझ्या पहिल्या आईला आठवून सारखी डोळ्यातून टीपं गाळायची, आज्जीने डोळ्याला पदर लावला की बाबानाही गहिवरून यायचं पण ते रडायचे नाहीत
आमच्या शेतात जाऊन गुरांसाठी वैरण कापत बसायचे
नाहीतर सरपणासाठी लाकुडफाटा छाटायचे
साधासा ताप आला आणि दवाखान्यात न्यायच्या आधीच माझी पहिली आई गेली
असे शेजारचे सांगायचे
दुसरी आई ही माझी सावत्र आई आहे हे त्यानीच मला सांगितलं
सावत्र आई चांगली नसते दुष्ट असते असही त्यानी मला सांगून ठेवलं  होतं
रात्री निजताना सावध रहा नाहीतर तू झोपल्यावर ती तुला विहिरीत फेकून देईल अशी भिती सुद्धा घातली
पण ही दुसरी आई माझ्याशी फार मायेनं वागायची
रात्री मला सावध राहयचं असायचं पण ही दुसरी आई अशी काही माझ्या कसातून हात फिरवत राहाय्ची की
मला कधी झोप लागली कळायचं नाही
माझी ही दुसरी आई माझ्या बाबांपेक्षा वयाने लहान असावी, घरातले नोकर याविषयी कुजबुजाताना मी ऐकलय पण मी कधी तिला या विषयी विचारलं नाही
म्हणूनच असेल पण  माझे बाबा जरा घरात अवघडल्या सारखे वावरायचे
आईशी जास्त बोलायचे नाहीत, हसले तरी पहिल्यासारखं खळखळून हसायचे नाहीत
आईनी मात्र माझ्याशी लगेच दोस्ती करून टाकली
मी तिला विचारलं होतं "तू माझी कोण?" तशी मला जवळ घेत ती म्हणाली होती मी तुझी आई
शेजार्‍यांच ऐकून मी विचारलं होतं सावत्र?
त्यावर आणखी जवळ घेत ती मला म्हणाली होती सख्ख सावत्र असं आईबाबत काही नसतं
आई ही आई असते
आई इतकं जवळचं बाळासाठी कोणीच नसतं
त्या क्षणी मला या दुसर्‍या आई बद्दल इतकं प्रेम दाटून आलं की मी तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपले
आणि आमच्या शेजार्‍याना ठणकाऊन सांगितलं माझी नवी आई खूप खूप चांगली आहे
देवाशप्पथ सांगते आमच्या शेजारी राहते ती माझी मावशीच लागते हे मला कोणी सांगितलं नव्हतं
कारण शेजारी असून आमचं एकमेकाकडे फार येणं जाणं नव्हतं
जमिनीवरून आमच्यात वाद चालले होते ती केस बाबा जिंकल्यापासून तर ते त्यांच्या मागच्या दारानी ये जा करायचे
फक्त मी खेळताना दिसले किंवा शाळेतून येताना दिसले तरच ते माझ्याशी बोलायचे
जेंव्हा मी त्याना दुसर्‍या आईबद्दल ठणकाऊन सांगितलं की माझी दुसरी आई खूप चांगली आहे, तर त्या बाई म्हणाल्या अत्ता चांगलं वागण्याचं नाटक करतेय पण एकदा का तिला तिची बाळं झाली की घरच्या नोकरात आणि तुझ्यात ती बाई काही फरक करणार नाही
गोठ्याजवळ गवताची झोपडी बांधून तुला ती तिथे रहायला पाठवेल
नदीवर गुरं धुवायला पाठवेल
खायला शिळपाकं देईल, कधी कधी उपाशीही ठेवेल तेंव्हा तुला माझे शब्द आठवतील
मी मनातून खूप घाबरून गेले
पण दुसर्‍या आईनी सार्‍या घराला आपलसं केलं होतं
नोकर चाकर म्हणायचे अगदी पयली लक्ष्मी दैवानं नेली पर देवानं दुसरी लक्ष्मीच तिच्या जागी धाडली
मालक भाग्याचं त्याहून ही पोर भाग्याची
दुसर्‍या आईचा सारा दिवस कामात जायचा, त्यात ती माझा अभ्यास घ्यायची
तिला स्वत:ला वाचनाची खूप आवड होती अन बाबा तिच्यासाठी तालुख्यातनं पुस्तकं मागवुन घ्ययचे
ते बाड आलं की दुसरी आई हरखून जायची
मला पण सांगायची वाचनाची आवड लाऊन घे, पुस्तक हाच खरा आपला मित्र
फक्त अभ्यास करून आपण शाहणे होत नाही, अवांतर वाचनही हवं
दुसर्‍या आईचा एक भाऊ होता त्याला मी मामा म्हणायचे
त्याच्या शिक्षणाचा खर्च बाबा करायचे
मग एकदा कळलं दुसर्‍या आईने ही एकच अट घातली होती मी लग्न करून येते पण माझ्या भावाची जबाबदारी तुम्हाला घ्ययला हवी
आणि आत्यानी ती अट मान्य केली होती त्यानुसार त्याला शहरात चांगल्या संस्थेत भरती करून त्याला अव्वल दर्जाचं शिक्षण दिलं जात होतं
सुट्टीला तो आमच्याच घरी यायचा कारण त्याला  या आईशिवाय दुसरं कोणी नव्हतं ,मग दोघं बहीण भाऊ पुस्तकांवर खूप चर्चा करायचे.  वि स खांडेकर, पी के आत्रे ,ग रा कामत या सगळ्या लेखकांची नावं मला या दोघांमुळेच समजली,
तो दुसर्‍या आईला ताये म्हणायचा आणि दुसरी आई त्याला बाबू म्हणायची
मी बाबू म्हंटलेलं तिला चालायचं नाही, तू त्याला मामा म्हण तो तुझा मामा आहे असं दुसरी आई बजाऊन सांगायची
आमच्या बाबांचं सुद्धा या मामावर खूप खूप प्रेम होतं
ते त्याचे खूप लाड करायचे, तो ही सुट्टीला आला की बाबाना प्रत्येक कामात मदत करायचा
भा रा भागवतांची पुस्तकं मला खूप आवडायची,त्यावरूनच तो मला चिंगी म्हणायचा
अजूनही म्हणतो
पण त्याच्याशिवाय मला कोणी चिंगी म्हंटलेलं मला आवडायचं नाही, आता तर कोणी म्हणायचा प्रश्नच येत नाही,
पण त्या दिवसात दुसर्‍या आईला बाळ व्हावं म्हणून आत्याने खूप प्रयत्न केले, अगदी तालुख्याला सुद्धा नेलं
मग एकदा भीत भीत मी आत्याला शेजारचे काय सांगतात ते सांगितलं , दुसरी आई ऐकतेय हे माझ्या लक्षातच आलं नाही
काही कळायच्या आत दुसर्‍या आईने दांडुका घेतला आणि दण दण पाय आपटत ती  शेजारी गेली
मला वाटलं आत्या तिला आडवेल ,समजवेल
पण आत्याने दुसरा दांडुका घेतला , माझं बखोट धरलं आणि दोघी शेजारी गेल्या आणि असा सज्जड दम भरला खबरदार आमच्या मुलीच्या मनात काही उलटं सुलटं भरवून तिला घाबरवलस तर
तंगडं तोडून वेशीवर फेकून देईन अस काहीतरी दोघी म्हणाल्या, मला वाटतं दोन तीन तडाखेही मावशीला खावे लागले
ते सगळे भितीने चळचळा कापत होते
पण घरी येऊन दुसरी आई मला कुशीत घेऊन खूप रडली
पण काही केल्या दुसर्‍या आईला बाळ होईना, मग नवस सायास सुरू झाले
देवदर्शनं कुलदैवताला कौल
कौल लावला तर त्या भटानी सांगितलं या मुलीची पाठ टणक आहे
हिच्या पाठीवर कठीण आहे दुसरं बाळ होणं, आत्या जरा हिरमुसली झाली
पण आई काही फार दू:खी वाटली नाही, किंवा तिने मला ते दाखवू दिलं नाही
पण आत्याला एक उपाय सुचला ती म्हणाली" असं करुया हिला तू माझ्या मांडीवर बसव म्हणजे तुझी वाट मोकळी होईल,शास्त्र म्हणून आपण ही सोय करुया फक्त हिचं कन्यादान मी करेन
तो पर्यंत बाबाना सुद्धा दुसरी आई खूप आवडायला लागली होती, दोघे छान समरस झाले होते
तिला सुद्धा आई व्हायचा अधिकार आहे केवळ या जाणिवेने बाबाही तयार झाले
पण आईच रडायला लागली
म्हणाली हातचं सोडून पळत्याच्या मागे धावायची मला गरज नाही
मला हे एक गुणी लेकरू आहे ते पुरेसं आहे
भले ती मला दुसरी आई म्हणते पण आईच म्हणते ना, मला पुरेसं आहे
मला एकदम रडायला आलं मी  दुसर्‍या आईला घट्ट मिठी मारली, इतकी घट्ट मिठी या आधी कोणीच कोणाला मारली नसेल इतकी घट्ट
आणिम्हणाले आई मी तुला आईच म्हणेन तुच आई आहेस माझी, मला ती पहिली आई आठवत सुद्धा नाही
त्या रात्री मी आईच्या कुशीतच झोपले
झोपताना मी आईला विचारलं "आई sss म्हणजे माझ्यामुळे तुला कधीच बाळ होणार नाही?
आई पटकन म्हणाली" चल वेडी! असे विचार करायचे नाहीत.
तू आहेस ना माझी मुलगी, बास! आणखी कोण कशाला हवं ?
पण मीच म्हणाले नाही मला ताई व्हायचय
तुला कसा मामा तायेsss म्हणतो, तसं मला पण ताये म्हणणारा भाऊ हवाय
आईच्या डोळ्यात पाणी तरळलं, अंधारात सुद्धा डोळ्यातलं पाणी चमकतं बर का! मी पाहिलय ते चमकताना
आई म्हणाली मग तुच देवबाप्पाला सांग बाप्पा मुलांचं सगळं ऐकतो
आणि वेड्या मुलांच तर जरा जास्तच ऐकतो, आई असं लाडाने म्हणाल्यावर मी तिला अशी बिलगले आणि तिनेही अगदी मनीमाऊ सारखं मला गोंजारलं की मला झोपच लागली
आणि स्वप्नात कोण आलं माहीत आहे? हातात  घडा घेतलेली देवी, तिला आठ हात होते
आणि तिच्या मांडीवर सुद्धा एक बाळ होतं
ती म्हणाली मी देईन तुला तायेsss हाक मारणारा भाऊ, फक्त उद्या घडाभर पाणी शंकरच्या देवळात नेऊन शिवलिंगावर वहा, आणि हे मी तुला सांगितलय हे कुणाला सांगू नकोस
आता आली का सत्वपरिक्षा! असं स्वप्न वगैरे मानणारी मी नव्हते माझं वयही नव्हतं
पण त्या देवीचा मोहं पडला तिने मारलेली ताये हाक कानात घुमत राहिली
आता हे होणार कसं ?
शंकराचं देऊळ गावाबाहेर, आमच्या शिवाराच्याही पुढे त्यामुळे एकटं जायचा प्रश्नच नव्हता, आत्याही घरी गेली होती, घरात कुणाला सांगायचं नव्हतं हीच तर मुख्य अट होती
नशिबाबे मामा आला मग त्याला काय काय बहाणे करून पटवला
ओसरीतला एक घडा घेतला विहीरीतून पाणी शेंदून घेतलं आणि मामा बरोबर डबल सीट सायकलवरून  देवळात गेलो, कधीच विसरणार नाही ते झालेलं दर्शन
तेंव्हा मामानी त्याचं एक सिक्रेट मला सांगितलं त्याचीही अट एकच कुणाला सांगायचं नाही
 सिक्रेट ऐकायला मी ही उत्सूक होते त्यामुळे मी ही अट मान्य केली
शिवाच्या पिंडीवर पाणी वाहून घडा तिथेच ठेवला, प्रार्थना केली, देवीने जे स्वप्नात सांगितलं होतं ते परत शंकराला सांगितलं  आणि मामा जवळ येऊन बसले
आणि मामानी त्याचं मन मोकळं केलं त्याचं प्रेम जडलं होतं ताये मान्य करणार नाही याची त्याला कल्पना होती, भावजीना सांगायची हिम्मतच नव्हती
शहरातल्या एका परभाषीक मुलीवर त्याचा जिव जडला होता
दोघानी आणाबाका घेतल्या होत्या, मामाचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं खूप हुशार होता तो अभ्यासात
आम्ही घरी आलो तर आई पून्हा पून्हा विचारत राहिली हे काय? मधेच कुठे गायब झाला होतात ?
पण कशी बशी वेळ मारून नेली
आणि मग चमत्कार झाला, आईला बरं नाहीसं झालं उलट्या सुरू झाल्या, पोटात पाणी ठरत नव्हतं
बाबा कासावीस झाले, आत्या मुद्दाम आली होती तिने बाबाना समजावलं देवानं ऐकलं हिला हवं नको सुरू झालय, काळजी घ्यायला हवी
आणि बाबानी खूप काळजी घेतली, अगदी आईचे केस सुद्धा विंचरून दिले तिला भरवलं
आत्या होतीच मामा सुद्धा दिमतीला होता आणि दसर्‍याच्या मुहुर्तावर आईला मुलगा झाला मला भाऊ झाला आत्याने नाव ठेवण्याचा मान मला दिला आणि मी बाळाचं नाव ठेवलं सुदर्शन
स्वप्नात मला देवीच्या मांडीवर त्याने दर्शन दिलं होतं ना
घरात बाळ आलं पण आईच्या वागण्यात इतकासा फेर आला नव्हता, उलट माझी गुणाची पोर माझ्यापोटी बाळ घेऊन आली असं म्हणत ती माझ्याकडे भरल्या डोळ्यानी पहायची
मग बाळाच्या नादात आमचं घर रमलेलं असताना मामाला शहरात नोकरी लागली त्याने बढती मिळवली, घर घेतलं आणि लग्नाचा विषय निघायच्या आधीच आपण मुलगी पसंत केल्याचं सांगून टाकलं जरा खळ खळ झाली पण लग्न यथासांग पार पडलं
त्याला पण मग नक्षत्रासारखी मुलगी झाली, मामी पण फार चांगली होती , आई बाबाना फार मानायची
आत्या आजारी झाली तर शहरात नेऊन तिच्यावर उपचार केले तिची सेवा केली आणि बरी करून तिला धाडली
आत्या म्हणाली सख्खी मुलगी करणार नाही इतकं तिने माझं केलं
मग हळू हळू माझ्या लग्नाचा विषयही घरात निघायला लागला, माझं ही शेवटचं वर्ष होतं, एक दोन मैत्रीणींची लग्न झाली होती
त्यामुळे मलाही काही त्या गैर वाटत नव्हतं
आणि तेंव्हाच एक आघात घडला, एका अपघातात मामी मामाला आणि बाळाला पोरकं करून गेली
बाबा मामाला घेऊन घरी आले
 मामा समजुतदार होता पण पूर्ण विस्कटला होता, बाळासाठी हुरुप आणून जगायचा प्रयत्न करत होता पण जमत नव्हतं, मला स्थळं सांगून येतच होती
पण मी एक निर्णय  घेतला
मी मामालाच सांगितलं आपण लग्न करुया
मामा म्हणून तू मला आवडतोसच पण नवरा म्हणून मला तुझ्या सारखाच जोडीदार हवा, मग तो तुच का नाही होत?
आत्याला हा माझा निर्णय ऐकता क्षणी पसंत पडला, पण आई बाबा मात्र हदरले कारण आमच्यात बारा वर्षाचं अंतर होतं , मी म्हणाले ते अंतर कधीच कमी होणार नाही मान्य पण  आई बाबा तुम्हीही सुखाने संसार करताच आहात की, आईने कुठल्या परिस्थितीत या लग्नाला होकार दिला  माहीत नाही
पण मी राजिखुशी हा निर्णय घेतेय, हीच बाई माझ्या आयुष्यात माझी सासू कम नणंद म्हणून आली तर मी ते माझं परम भाग्यच समजेन
मामाला समजवायला जरा वेळ लागला पण मग तो ही तयार झाला
अजूनही मी त्याला मामाच म्हणते आमचं बाळ सध्या मला माझ्या नावाने हाक मारतं
पण मग मी तिला आई म्हणायला शिकवणार आहे
कारण आई ही आई असते त्या नात्यात सख्ख सावत्र असं काही नसतं ......




Comments

  1. वाह वेगळं नातं.....पण खुपच सुंदर ...

    ReplyDelete
  2. तुझ्या कथा ह्या तुझ्या असतात. वाचताना अतिशय रमून गेले. तूझा असा स्पेशल ठसा असतो त्यावर. वाचताना कुठेही लिंक तुटत नाही. खूप सुंदर 💖

    ReplyDelete
  3. Vegalyaach jagaat neun thevla.. khup sunder

    ReplyDelete
  4. अप्रतिम कथा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

ओळ्खीची मामी