ओघळ

भेट ठरलेली असताना 
नेमकं आईने डोक्यावर तेल थापलं 
म्हणाली आठवडाभर हाताशी लागत नाहीस, आज बरी तावडीत सापडलीस
मी खरं तर वैतागलेच 
आईच्या जागी दुसरं कोणी असतं तर लहानपणी ओचकारायचे तसं ओचकारलच असतं 
ओचकारण्यात मी तरबेज होते त्यामुळे फेमस सुद्धा
म्हणून् तर माऊ नाव पडलं 
ओचकारणं कधीच थांबलं पण हे नाव चिकटलं ते चिकटलं
त्याने पण ओळख होताना पहिलं लाडाचं नाव विचारलं
मी ही उस्फुर्त्पण म्हणाले तू देशील ते
तर त्यानेही उस्फुर्तपणे काही न ठरवता मला माऊच म्हंटलं
आणि अजूनही तसच म्हणतो
खरच माझ्यात आणि मांजरात काही साम्य आहे का?
या विचाराने माझी मीच चमकले
उठून पटकन आरशात पाहिलं
आणि खुदकन हसायच्या ऐवजी दचकलेच
हो! हल्ली तो भेटल्यापासनं आरशात स्वत:ला बघून खुदकन हसायची वाईट खोड लागली आहे
मी नुसतच खोड म्हणते
आई आवर्जून वाईट खोड म्हणते
आईच्या मते असं आरशात बघून मुली उगाचच खुदकायला लागल्या की
त्यांच्यासाठी स्थळं बघायची वेळ झाली असं पुर्वीचे पालक समजायचे
आमची आई सुद्धा तशी पुर्वीचीच आहे
अजून घरी यायला आठच्या जागी नऊ वाजले की असं काही आंतर्बाह्य बघते की चपापायला होतं
हाँस्टेलची रेक्टर असती तर महाखडुस आणि तितकीच प्रेमळ म्हणून फेमस झाली असती
ताई मुळे मी बरेचदा वाचते
ताई नेहमी माझी बाजू घेते, आईला समजावते, तसं ती समजून घेते असं नाही पण मी तावडीतून सुटते
पण यावेळी ताई साथ देईल का माहीत नाही
ताईचं कसं सगळं छान मनासारखं पार पडलं
मनासारखं म्हणजे आईच्या मनासारखं
ताई पदवीधर झाली लगेच तिला स्थळ सांगून आलं
आई म्हणाली बघायला काय हरकत आहे
पसंत पडलीस तर पुढच्या गोष्टी
मी सुधारणा करत म्हणाले होते "ताईलाही तो मुलगा पसंत पडायला हवा
आई म्हणाली ते मी गृहीतच धरून चालले आहे
ताईला पसंत पडेल ही खात्री होती म्हणूनच मी पत्रिका पाठवली, नाहीतर इतका उत्साहही मी दाखवला नसता
हे मला आणि ताईलाच माहितिये, लग्ना आधी ताईला सुभाष भाअी इतके पसंत नव्हते
पण आईचा विचार करून, आईचा उत्साहं बघून ताईने तोंडाने होकार दिला होता
बाबा गेल्यावर आईने आपल्या दोघीना कसं वाढवलं, किती कष्ट उपसले किती मन मारलं या सगळ्याची परतफेड असं नाही पण तरी... तसच काहीस
म्हणून ताई पहिल्याच सांगून आलेल्या स्थळाला होकार देऊन मोकळी झाली
मोकळी झाली म्हणजे मनापासून अडकली
कधी तिला सुभाष भाई आवडायला लागले कोण जाणे
पण खूपच रमली ती त्यांच्या सोबत
आईला दाखवण्या साठी नाही हं! खरच , आम्हा मुलीना एकमेकीच्या मनातलं बरोबर कळतं
म्हणून तर माझं सिक्रेट तिला कोणी न सांगता कळलं
आणि तिने बजावलं आई कितपत मान्य करेल माहीत नाही, आणि आता आईला बी पी चा त्रास सुरू झालाय तिच्या मनाविरुद्ध मी काही तिच्या हे गळी उतरवणार नाही
हे आठवलं आणि त्या मुळे की आरशातलं माझं ध्यान बघून मी खरच वैतागले
आता अशी जाऊ त्याला भेटायला?
तो येईल मस्त भुरभुर्या केसानी, ब्लँ‍क टी शर्ट घालून
आणि मी अशी झंपी, तेलुराम
हसेलच तो, तुमच्यात सुट्टी अशी साजरी करतात का विचारेल. चिडवेल मला
त्या पेक्षा जातच नाही
झोपून टाकते सरळ, तशी माझी झोप हुकमी आहे
कोण तो शुरवीर युद्ध्याच्या वेळी घोड्यावर बसल्या बसल्या झोप घ्यायचा त्याच्या वरताण आहे मी,
पण आज नाही भेटले तर परत दहा दिवस भेटणार नाही आम्ही
आणि तसही मागची भेट पंधरा दिवसापुर्वी झाली होती
खरच देवा ऐसी माँ किसिको ना दे
माझ्या विचाराने मिच जिभ चावली
आईसाठी वेळ पडली तर बिन लग्नाची राहीन म्हणणारी मी
हा भेटल्यावर मी इतकी बदलले...?
मी माझ्या विचारात असताना आई चहाचे कप घेऊन आली
अगं हे काय? आवरायचं नाही का तुला?
बाहेर जायचं म्हणत होतीस ना? रवा आणायला विसरू नकोस,अगदी बारीक नको, जरा जाडसरच बघ
तुला तुझ्या रव्याची पडलिये, मी चिडून म्हणाले
बघ माझं काय ध्यान करून ठेवलयस?
दोन पापड चार चिकवड्या तळून होतील एव्हढ्या तेलात
आईला हसायलाच आलं , आम्ही तिघी अशाच आहोत हसायला आलं की मनमुराद हसतो, म्हणजे याना काही आयुष्यात दू:ख आहेत की नाही? असा प्रश्न पडावा
त्याला सुद्धा माझं हसणं खूप आवडतं
तो एकदा म्हणाला होता तुझ्या या अशा दैवी हसण्याने मी तुझ्याकडे आकर्शीत झालो, सारखं मला तुझं ते हसणच आठवत राहिलं
आणि मला त्याचं विचारात बुडून जाणं आवडलं होतं
आता आता जरा बोलायला लागलाय
नाहीतर मनातल्या मनात गणिताची कठीण कठीण प्रमेय सोडवत असल्या सारखा.... मला जागं करत आई म्हणाली काय ग? मी काय म्हणतेय? जायचय ना तुला?
मी फुरगटून म्हणाले मी कुठेही जाणार नाही, इतकं तेल थापून ठेवलस डोक्यावर, आता मला झोप आली
आई रागावलीच! आता नाही झोपायचं हं
तिन्हिसांजेला कोणी झोपतं का?
मी कधीही झोपू शकते मी ताणून धरत म्हणाले
झोपूनच बघ, नाही अजून तेल थापलं तुझ्या डोक्यावर तर बघ
आईच्या समाधानासाठी मी वरकरणी हसले
नाहीतर मनातून काहुरले होते
खरच बाहेर अंधारून आलं होतं
तिन्हिसांज झाली होती, आणि अजून मी घरीच होते
माझी वाट बघून बघून तो व्याकूळ झाला असेल
फोन तो कधीच करणार नाही
नाही गेले तर रागावणार सुद्धा नाही पण म्हणूनच मी शक्यतो उशीर करत नाही वेळेवर जाते , आज आईने घोळ केला
नव्याने लाट उसळावी तसा माझा आईवरचा ( तात्पुरता) राग उसळला
पण तरी शब्दाला शब्द न वाढवता
मी जस्ट कपडे बदलले आणि बाहेर पडले जाईपर्यंत आईने आणखी दोन कामं सांगितलीच
तेव्हढीच त्याच्या सोबत फिरायची सोहोलत, कारण ताक घुसळायची रवी बघायची म्हणजे स्टेशन रोडला जायला पाहिजे, आणि तिकडे गेलं म्हणजे पाणी पुरी आलीच
खोटं वाटेल पण मी खायला घातली तेंव्हा त्याला पाणी पुरी हा पदार्थ कळला
नाहीतर त्याला तो माहीतच नव्हता
आम्हा दोघाना पाणीपुरी खूप आवडते
पाणी पुरीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं , त्यामुळेच जरा जास्त घाईने बाहेर पडले, आम्ही लग्नात सुद्धा पाणी पुरीचाच घास एकमेकाला भरवणार आहोत
रुख्वत नावाची गोष्ट त्याला माझ्या मुळेच कळली तर रुख्वतात सुद्धा पाणी पुरीची डिश ठेवणार आहोत
असं काय काय आठवत मी तळ्याच्या पाळी पाशी पोहोचले
चांगलच अंधारून आलं होतं तरी तो मला दिसला
मी धावलेच
तो दिसला की मी धावतेच, तो म्हणतो हळू हळू जरा, मी काय कुठे पळून जात नाहिये आणि तुलासोडून किंवा तुझ्या शिवाय मे चालूही शकणार नाही आता
अत्ताही तो तसच काहीसं म्हणाला असेल मी नीट ऐकलं नाही
तेव्हढ्यात त्यानी विचारलं "आज डोक्यावर ओढणी घेऊन का आलीस?
लपत छपत आलीस की काय?
मी म्हणाले नाहीरे! डोक्यचं तेल लपवतेय
मला वाटलच होतं , तो हसणार, आणि तो हसला
तेल कशाला लपवायचं?
आणि इतक्या अंधारात ते कुणाला दिसणार आहे?
तुला दिसेल ना? बाकी कुणाला कशाला दिसायला हवं
मग आज कसं काय तेल लावायचा प्रोग्रँम काढलास बरोबर?
मी नाही, आई ने दावा साधला मी तक्रार करत म्हणाले
तो एकदम हळवा झालेला मला अंधारतही दिसला
आईने तेल लावलय? त्याने त्याच स्वरात प्रश्न केला
अगदी समोर बसवून?
मी हो अशी मान हलवली
"बघू" तो आतुरतेने म्हणाला
त्यात काय बघायचय, मी अजूनच फुरगटुन म्हणाले
बघुदे ना
नकोरे मी अगदीच झंपी दिसते
मला फक्त आईने थापलेलं तेल बघायचय, आम्हाला आश्रमात फक्त सहा महिन्यानी न्हावी यायचा केस सफाचट करायला
रांगेत उभं रहावं लागायचं
एका व्हिजीट मधे त्याला तीस ते पन्नास डोकी भादरायची असायची
कधी कधी त्या घिसडघाईत कापायचं सुद्धा
पण त्यावरही बोटभर तेल लावायला कोण नसायचं
वर मान हलवली म्हणून नाव्ह्याकडून टपलीत बसायची
आई तेल लावत असेल म्हणजे केसात बोटं घालून हळूवार कुरवाळत असेल नाही? तो काय काय बोलायला लागला नंतर नंतर मला ऐकू येणं कमी झालं डोळे भरल्याने दिसणं कमी झालं वेदनेचा आवेग असा की तोल सांभाळणं कठीण झालं
आणि त्याला सावरता सावरता मीच त्याच्या कुशीत कोसळले
खूप रडले
आमचं जमल्यापासून पहिल्यांदी त्याने मला मिठीत घेतलं
आणि त्याची बोटं हळुवारपणे आईने थापलेल्या तेलावरून अलगद फिरत राहिली
अंधार गडद होत राहिला, चंद्रोदय झाल्याचं आम्हा दोघांच्या लक्षात आलं नाही .....

Comments

  1. सुंदर..... संपूच नये वाटत होतं.....

    ReplyDelete
  2. तुमच्या नवीन कथेची आतुरतेने वाट बघतेय सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी