प्रोजेक्ट

हल्ली मुलाना शाळेत पाठवायचं म्हणजे पालकांची शाळा असते, हे वाक्य अनेक पालकांच्या तोंडी ऐकायला मिळतं तसच ते आमच्या नेहाच्या तोंडीही बसलय
नेहा तळपदेला दोन मुलं दोघेही  अभ्यासात हुशार, मोठा चवथीत तर धाकटा पहिलीत
पूर्वी नेहा येता जाता भेटायची
आता तिला तसा खरच वेळ नसतो, मुलांचा अभ्यास, मुलांचं वेळापत्रक, मुलांची शाळा सर्वांगीण विकासाच्या नावाखालची धावपळ या बरोबरच मुलाना शाळेतून दिली गेलेली प्रोजेक्ट्स हा जो काय प्रकार आहे तो अकलनीय आहे, आणि नेहाच्या एकूण धावपळीत भर घालणारा आहे
नेहाने मुलांसाठीच नोकरीला राम राम ठोकला असला तरी ती काय तशी रिकामी नाही
पर्सेस बनवण्याच्या तिच्या व्यवसायाने कधीच जोर धरलाय, एक नाही दोन नाही तर दहा दहा कारिगर तिच्या हाताखाली तिच्या आँर्डरप्रमाणे काम करत असतात , विकीच्या गँरेजला सध्या तिच्या व्यवसायामुळे दुकानाचं स्वरूप आलय, जरा पैठणी फाटली विरली जुनी झाली की नेहाला त्यात विविध आकाराच्या  स्टाईल्सच्या पर्सेस दिसायला लागतात
त्यात घरच्या जबाबदार्‍या काही कमी नाहीत
सासूबाईना पार्कींसन आहे, सासरे हट्टी आहेत, हेकेखोर सुद्धा आहेत त्यात विकीचं त्यांच्याशी अजिबात पटत नाही हे सगळे रागरंग सांभाळून तिला मुलांकडे लक्ष द्यावं लागतं
अभ्यासापुरतं म्हणाल तर ठीक होतं म्हणजे काहीतरी अवाक्यात होतं
पण हे प्रोजेक्ट्सचं काय खूळ सिलँबस मधे कोंबलं आणि नेहाची पुरती तारांबळ उडवून गेलं
पहिली दुसरीतली मुलं ज्याना जेम तेम होड्य़ा नाहीतर फुलदाणी वगैरे करायच्या वयात हाँस्पिटलचं माँडेल , नाहीतर रहदारीचे नियम यावर प्रोजेक्ट करायला सांगतात, बाई मुलाना सांगून मोकळ्या होतात मुलं पालकाना सांगून मोकळी होतात, मधल्या मधे पालकांचे हाल
त्यात नेहा सारख्या जबाबदारी घेणार्‍या मुलीचे तर फारच, म्हणजे एका अर्थी सत्वपरिक्षा
विकी कडून मदतीची अपेक्षा करताच येत नाही कारण घरी अकराला जरी आला तरी एक वाजेपर्यंत त्याचं आँफीसचं काम संपत नाही
सासर्‍याना काही सांगायची सोयच नाही
सासूबाई ना तर शक्यच नाही, नेहा आपली फिरतेय झाडाची पानं आणि पक्षांची पीसं गोळा करत
या प्रोजेक्टसना काही अर्थ नाही काही अर्थ नाही असं ती वैतागुन बोलत असते, ट्वीट सुद्धा करते त्याला भरघोस प्रतिसादही येतो पण त्या शिवाय गत्यंतर नसतं
आताचं प्रोजेक्ट जेंव्हा ऐकलं तेंव्हा तिला सोपं वाटलं होतं
पाखराना पाणी प्यायला गँलरीत , खिडकीत पाण्याने भरलेलं भांड ठेवायचं होतं
आणि पाखराना पाणी पिताना आँब्झर्व करायचं होतं आणि काय फील केलं ते पिक्चर्स सहीत मांडायचं होतं
भांडी बरीच होती पण पाखराना सूट होतील अशी पाँट्स ठेवायची होती
मग सुरुवातीला स्टीलच्या वाट्या जुन्या पातेल्यात पाणी ठेऊन बघितलं
पण जरा ऊन आलं की ती तापायची पाणी गरम व्हायचं
मग हाँटेल्स चे कंटेनर ठेऊन बघितले
पण कावळ्यांच्या धसमुसळ्या हालचालीं मुळे ते सारखे कलंडायचे नाहीतर खाली पडायला लागले
पण हे मात्र खरं साळूंक्या पारवे कबुतरं कावळे चोचीत पाण्याचा घोट घेताना बघणं मात्र अगदी आल्हादायक कृतार्थ करणारं वाटायचं अगदी विकी सुद्धा कधी घरी असला तर ते बघण्यात रमायचा
त्याने काही फोटॊही काढले होते, त्यानी एक  बाबा भान हरपून पाखरांची जलक्रिडा  बघत असतानाचा फार सूंदर फोटॊ काढला, तो इतका झकास आला होता की बाबांच्या चेहर्‍यावरही पसंतीची स्मीतरेषा उमटली होती
पण पून्हा तेच ज्यांच्या साठी हे प्रोजेक्ट हाती घेतलं होतं ती मुलं शाळेत नाहीतर क्लासला
त्यानी पाखराना पाणी पिताना कधी बघायचं ? हा प्रश्नच होता
त्यात तिचा मोठा तर फारच कल्पक, त्याला मोर पाणी प्यायला आलेला बघायचा होता
करकोचे बगळे यायला हवे होते
वास्तवापासनं ही मुलं खूपच लांब आहेत, याची खंत  नेहाला सतत जाणवायची
जे आमच्या साठी सहज साध्य होतं आमच्या संस्काराचा एक भाग होतं ते आता या मुलाना प्रोजेक्ट द्वारे शिकवावं लागतय, दाखवावं लागतय पून्हा त्यात त्यांचा स्वत:चा सहभाग नाहीच
आम्ही सांगणार आणि ते ऐकणार
तसं वास्तवाचं भान विकीचे बाबा करून द्यायचेच
जरा पाण्याचं भांड कलंडलं पाणी सांडलं की पाखरांपेक्षा यांचाच कलकलाट जास्त व्हायचा
त्यावर विकीनेच एक उपाय सुचवला तो म्हणाला पाखराना पाणी पाजण्यासाठी खास मातीची जड भांडी असातात, ती कलंडायचा प्रश्नच नाही, आणि पाणीही थंड राहील
मग पर्सचं  मटेरियल घेताना तिने चार पावलं पुढे जाऊन कुंभार आळी गाठली
तिथली दुनियाच वेगळी होती
कचकड्याचं तिथे   काहीच नव्हतं. माठ मडकी सुराया रांजण, तोरणं ,फुलदाण्या, हत्ती घोडे पाखराना लागणारे पाण्यासाठीचे पसरट वाडगे सगळच मातीचं
आणि माणसं सुद्धा अस्सल मातीची, दिखाऊपणाचा जरा गंध नाही
खरंतर नेहा हरवून गेली त्यात, किती साधी माणसं त्यांच्या गरजाही साध्या
नेहा बोलघेवडी होतीच, तिने लगेच संवाद साधला
प्रत्येक दुकाना बरोबर एक कुटूंब होतं कर्ता पुरुष त्याची कारभारीण एखाद दुसरा म्हातारा तीनचार मुलं
ती ही छान स्वछ्च मातीच्या भांड्यासारखीच गरगरीत मृदू
मग  नेहाने विचारलं तुमच्या मुलाना असतंकी नाही प्रोजेक्ट बिजेक्ट
त्याना काय पाखराना पाणी द्यायला आयतं घरचाच वाडगा मिळेल
ती काय बोलतेय हे त्या लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला
पण मग कर्ता बाप्या म्हणाला "कसं हाय, ही बूक शिकायचं प्रत्येकाला जमल असं न्हाई
पर हा चंदू आहे ना तो तेज आहे, त्याच्या ध्यानात र्‍हातं
तसा तो बिन्नीवाल्याचा शिदूबी तेज  हाय पर शालेत घालायच वय पुढ गेलं म्हणं
मधे मी येका शाळेत भेटून आलो तर त्ये म्हनले की पयली च्या वर्गाला तर नाय बसवू शकत कारन वय जास्त हाय पर तयारी करून आनली तर नव्या वर्षाला तिसरीच्या वर्गाला  घ्यायचा विचार करू
समदे विषय न्हाईत गणीत आनं मराठी व्याकरन
पर असं कोण मिळणार हो
नायतर खात्रीने सांगतो दिवसाला दोन तास जरी या पठ्ठ्याने पुस्तकं वाचली तर सा महिन्यात गडी असा तयार होतोय की जाऊन त्या बाईलाच शिकवल
मुलं शिकणार असतील तर आम्ही खर्चाला डरत न्हाई
पर कुठून सुरुवातच भेटत नाही
पण एका क्षणात नेहाला प्रोजेक्ट मिळालं , तिच्या डोळ्यात चमक आली
तिने चार वाडगे आधी खरेदी केले आणि मग सांगितलं मी पत्ता देते या रविवारी सकाळी जितकी मुलं तयार होतील त्याना घेऊन माझ्याकडे या, एका महिन्यात मला कळेल ठरलेल्या मुदतीत शाळेत जायला कितीजण तयार होतील, बाकीच्याना पण आपण निदान लिहायला वाचायला शिकवूच
पण मेन प्रोजेक्ट ज्या मुलाना शाळेत प्रवेश मिळवून देणं शक्य आहे त्याना शाळेत भरती करून घेणं
माझ्या सासूबाईसुद्धा एका शाळेत हेडमास्तर होत्या, आपण त्यांचीही मदत घेऊ
तो बाप्या नेहाच्या पाया पडणच बाकी होतं
आणि खरच रविवारी महादेव आणि शिबू पाच पांडव घेऊन आले
विकीला नेहमीच आपल्या बायकोचं कौतूक वाटत आलय, वर वर कुर कुर केली तरी त्याचीच मदत मोठी असते
पण यावेळी बाबाही खुश झाले सोसायटीकडून परमिशन मिळवण्याची जबाबदारी त्यानी घेतली
पार्कींसनने खचलेल्या सासुबाईना सुद्धा हुरुप आला त्यानी सुद्धा खूप दिवसानी थरथरणार्‍या हातात पुस्तक धरयाचा प्रयत्न सुरू केला
आपली मम्मा करतेय ते  खरं प्रोजेक्ट आहे याची जाणीव तिच्या मुलानाही आहे
सध्या रामा रामो रामा: प्रथमा च्या स्टाईल मधे नेहाच्या गँरेज मधे पाच पांडवांचा अभ्यास सुरू आहे
सोसायटीने परवानगी तर दिलीच पण  मदतीची तयारीही दाखवली
त्यामुळे नेहाचं पर्सेसचं वर्कशाँप नवीन सुटेबल जागा मिळेपर्यंत सध्या आपल्या घरी भरतय
त्यायोगे हिच्या हातात  नव नवीन पँटर्नच्या पर्सेस दिसायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको .


Comments

  1. Ahaa kaka far sunder. Fb var mi friend nasalyamule comment karu shakat nahi. Ithe sandhi milali. Dhanyavad.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी