राणूबाई

गौरीचे लांबसडक जाडजूड केस, दाट असे की कंगवा शिरणं मुष्कील कंगवा घेताना तिच्या केसात जाईल असाच कंगवा निवडावा लागायचा, वेणीचे पेड मोजले तर चाळीसच्या वर जायचे, तिच्या लहानपणी कोणी तिच्या वेणीचे पेड मोजायला लागले की आज्जी पाठीत धपाटा घालायची आणि लग बगीने थू थू करायची, म्हणजे थुकल्याचं नाटक मग गौरी मोठी झाली तसे तिचे केसही लांब सडक झाले म्हणजे खरच चालताना सडक झाडण्याचच बाकी होतं मग तिने प्रिंटींग टेक्नाँलाँजी मधे करियर करायला घेतलं त्यातच ती बिझी झाली सकाळी घर सोडायची ते रात्रीच उगवायची, आई आज्जी डोक्यावर बसायच्या म्हणून चार घास जेवायची इतकी दमलेली असायची की कधी कधी आई म्हणायची "जा हात धू जा, नीट चूळ भर आणि झोपून टाक, बाकीचं मी आवरते यावर सुटका झाल्याचा आनंद दाखवत ती नेहमीचं वाक्य बोलायचीच आई पाचचा गजर लाव, मला लवकर जायचय"
तर , अशी ही मुलगी लग्न करून सून म्हणून आमच्या विभाच्या घरी आली विभाचा एकुलता एक मुलगा आधी लग्नाला तयारच नव्हता, पण गौरीला बघितलं भेटला बोलला आणि तिच्या विषयीच बोलत राहिला विभाला अप्रूप होतं ते तिच्या मोहक हसण्याचं आणि लांबसडक केसांचं आली की सारखं त्या विषयीच बोलायची अगं पण मुलगी कशी आहे? कशी वागते? कसं बोलते? विचारलं की म्हणायची ते कसं कळणार? बोलायला सालस आहे अगदी पण तिला बोलायला वेळ असतो कुठे? सकाळी सातला घर सोडते ते रात्री दहाला येते रविवारी सुट्टी आहे सुट्टी आहे असं म्हणते पण रविवार आला की म्हणते लगेच येते, असं म्हणून रात्रीच्या ऐवजी तिन्हिसांजेला घरी येते, त्यातच समाधान मानायचं पण एकदा विभाचा फोन आला , अगदी हळहळत होती" म्हणाली पोरगी केस कापायचे म्हणतेय लांब सडक रेशमी केस कापून शोल्डर कट देणार म्हणतेय" ही म्हणाली तू सांग नको कापूस आमच्या विभाला केसांच फार अप्रूप तिचे स्वत:चे केस फार छान होते पण दोन्ही बाळंतपणात गेले ते गेलेच मुलगा केस खेचतो म्हणतात, हिच्या मुलीनेही केस खेचले मुलगा खूप सालस पण मुलगी पहिल्यापासून स्वतंत्र मताची, घरी दोघच आहेत म्हणून ठीक सासू सासरे असते तर दोन महिन्यात परत आली असती असं स्वत: विभाच म्हणायची त्यामुळे केस चांगले असून मुलीने कायम केस छाटले त्या बद्दल विभा उदासीनच होती पण गौरी केस कापायला निघाली आणि तिचा जिव खालीवर झाला तिने आपल्या मुलाशी बोलून बघितलं पण त्याने तिचीच समजूत काढली, आई तू तिचा व्याप बघतेस ना? आता प्रमोशनही मिळणार आहे तिला केस तिचे निर्णय तिचा आपण काय बोलणार?
 एका रविवारी ती नाहून आली आणि म्हणाली हे शेवटचं नहाणं परवा अनायसे सुट्टी मिळाली आहे तर ब्युटी पार्लरला जाऊन येईन विभाला कळलं आता बोललच पाहिजे ती म्हणाली आईशी बोललीस का? गौरी हसून म्हणाली" मी पण हुशार आहे, केसाना कात्री लावल्यावरच बोलेन आधी बेत कळला तर कुणा कुणाच्या शपथा घालेल तू शपथा मानतेस? शपथा कोण घालतय या वर ते अवलंबून आहे, विभाचे डोळे चमकले आणि तिने ते ओळखले तत्परतेने तिचा हात धरत ती म्हणाली आई आई प्लीज प्लीज तुम्ही नका शपथ घालू, माझा प्राँब्लेम होईल खरं सांगतो आमच्या विभाचा कंठ दाटून आला हे आम्हाला सांगताना ती गहिवरली तर तेंव्हा काय झालं असेल? विभा म्हणाली शपथ नाही घालत पण एक सांग लग्ना आधीही अशीच बिझी होतीस, माहेरी होतीस मग तेंव्हाच का नाही केस कापलेस?
गौरी एकदम हळवी झाली म्हणाली तेंव्हा आई वेणी घालायची, कितीही नको नको म्हंटलं तरी आज्जी तेल थापायची, नहायला घालायला आई मागे उभी असायची आणि खरं सांगू? आई वेणी घालायला बसायची ना तेव्हढाच वेळ आम्हा दोघीना निवांत बोलायला मिळायचा , दोघीना नाही! तिघीना कारण आज्जी पण चहा घेऊन आमच्यात येऊन बसायची, केस कापले असते तर मग काय पाँनिटेल बांधलं की झालं , मग कशाला लागतेय आई आणि आज्जी? यावर हळूवार स्वरात विभा म्हणाली " मग आता मी घालत जाईन तुझी वेणी, नाही नाही नको नको म्हणालीस तरी दर दहा दिवसानी तेलही थापत जाईन डोक्यावर सोन्यासारख्या मुलीचे सोन्यासारखे केस कशाला असलेलं सोनं कमी करतेस? गौरी सुद्धा भावूक होत म्हणाली पण त्या साठी लवकर उठावं लागेल मग उठीन की! विभा अगदी सहज उत्साहात म्हणाली, अगं तशी जागीच असते मी, पण तुम्हा दोघांची जायची गडबड त्यात माझी लुडबुड कशाला? म्हणून पडून राहते, तुझी वेणी घालायला उठले तर त्यात काही विशेष करतेय असं मला वाटणार नाही पण माझ्या सांगण्यावरून तू हा बेत रद्द केलास तर त्याचं मात्र मला विशेष वाटेल कारण ते सुख माझ्या मुलीने मला कधी दिलच नाही मग काय आमच्या विभाचं रुटीनच बदललं पाचला उठायचं, सुनेच्या हातचा गरम गरम चहा प्यायचा आणि वेणी घालायला बसायचं कधी तिच्या वेणीचे पेड मोजायचा मोहं झाला तर तिच्या आज्जी सारखं थू थू करायचं आणि हळू हळू त्या दोघी मैत्रीणी झाल्या वेणी घालता घालता दोघींच्या ज्या गप्पा व्हायच्या त्या विभाला दिवसभर पुरायच्या, ती पण आपल्या आँफीसमधल्या गमती जमती प्राँब्लेम्स सगळं विभा बरोबर शेअर करायची त्यातलं सुरुवातीला काही कळायचं नाही पण नंतर विभालाही टेक्निकल भाषा कळायला लागली दोघींचे प्रोग्रँम ठरायला लागले विभा आधी पेक्षा स्मार्ट झाली मोकळी झाली आणि धीट सुद्धा आता गौरी तिला ए आई म्हणते आणि ती गौरीला राणूबाई तिला आपल्या लेकीला राणूबाई म्हणावसं वाटायचं पण ती लगेच डाफरायची गौरीच्या रूपानं विभाला तिची राणूबाई मिळाली आणि दोन गोंडस नातू सुद्धा पण तिच्यावेळी विभा इतकी दक्ष होती की दोन्ही मुलगे असूनही त्याना राणूबाईचे केस खेचायला मिळाले नाहीत आणि अखंड सौभाग्य असं की दोघींचा संवाद अखंड राहिला….

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी