ओळ्खीची मामी

माझी एक ओळखिची मामी होती
नात्यापेक्षाही जवळची
खूप सात्वीक तितकीच दूर्दैवी, तिला घरात मानच नव्हता
खरं तर घरची मोठी सून
पण धाकट्या जावा जास्त स्मार्ट निघाल्या , आम्ही त्यानाही मामीच हाक मारायचो
पण हिला मात्र मामी मानायचो
एक तरणा मुलगा खंगत खंगत गेला आणि मोठा मुलगा विचारत नव्हता
तसं कोणीच विचारत नव्हतं त्यात हा एक
मामीला सून मिळाली ती पण हुशार तिने दोन दिवसात आपल्या सासूला जोखलं 
पण तिची योग्यता नाही ओळ्खली
श्रीधर स्वामींची निस्सीम भक्त होती मामी, त्यात द्न्यानेश्वरीवर श्रद्धा जडली, मग काय घरातल्या शुद्र राजकारणात तिचं म्न रमलच नाही
मग कसले मान अपमान
घरचे काबाड कष्ट उरकून ती दत्ताच्या देवळात जाऊन बसायची
लेकीसुनानी भरलेलं घर पण वेळेला कधी कधी एक रुपया नसयाचा तिच्याकडे
मधे पाय मोडला, त्याकडेही तसं दूर्ल्क्षच झालं 
म्हणजे दूर्लक्ष केलं 
त्यामुळे कायम लंगडेपण आलं 
तरी ओट्याजवळची कामं झाली की बाथरूम मधे एक पाय पसरून बसत ती चार बादल्या कपडे धुवायची
संसारातून विरक्त होणं वेगळं आणि संसारातून अंग काढून घेणं वेगळं 
तर तिच्या सुनेने संसारातून अंग काढून घेतलं होतं 
सण वार असोत की व्रत वैकल्याचे दिवस ती आपली छान पलंगावर लोळत असायची
नवरा यायच्या वेळी पावडर कूंकू करून त्याच्या पुढे पुढे केलं की नवरा खुश
तसा टोणगाच होता तो त्यापेक्षा कोडगा
अगदी नवस करायच्या बेतात असताना बायको मिळाली होती त्यामुळे तो स्वत:ला धन्य धन्य समजत होता
मग त्याला दोन मुलगे झाले , मामीचं काम आणीक वाढलं , मग कित्येकदा एकभुक्त उपवसाच्या वेळी ती रात्री वाटीभर दूध प्यायची ते ही दुरापास्त झालं 
मामी कधी आमच्याकडे आली तर आई तिला पोटभर खायला घालून पाठवायची, तळलेले तिखटमीठ लावलेले दाणे हा मामीचा अत्यंत आवडता प्रकार होता कधी आईने तसे तळले तर पुडीत बांधून आई मला दत्ताच्या देवळात पाठवयची, तिथे पार बांधलेला एक पिंपळ होता
देवळात पाय पसरून बसायची परवानगी नव्हती , हिला एक पाय दुमडता यायचा नाही, तिचा जन्मच ऐकून घेण्यासाठी झाला होता 
एक दोनदा त्या हेकेखोर गुरुजींकडून चार शब्द ऐकावे लागल्यावर तिने आपली अडचण सांगितली त्यावर गुरुजींचं वक्तव्य असं की मग येत जाऊ नका देवळात घरी बसून नमस्कार करा देवाला पोहोचतो
घरी बसायची सोय नव्हती, एक तर घर लहान आणि मामीला बसलेली बघून कोण येऊन हुकूम सोडेल आणि कोणं कुठलं काम गळ्यात मारेल याचा नेम नसायचा, मुली सुद्धा कधी आस्थेनं वागल्याचं आठवत नाही
पण तिची कुणाबद्दल कसलीच तक्रार नव्हती
पण वयपरत्वे हल्ली कामं सोसेनात, सांगितल्यासरशी हातून कामं होत नव्हती त्यावरून तिच्या वयाचा विचार नं करता डाफरणारे बरेचजण घरात होते, आता नातूही तिला चार शब्द सुनावण्या इतके मोठे झाले होते
घरी हा प्रकार देवळात हा
पुढे त्या गुरुजीनाच लकवा मारला आणि कायमस्वरूपी घरी झोपून राहयची वेळ आली, घरून नमस्कार पोहोचतो म्हणणार्या गुरुजीना हात जोदण्याचीही शक्ती उरली नव्हती,पण जगरहाटीच अशी आहे ते गुरुजी मामीला विचार न करता बोलले तेंव्हा कोणीही मामीची बाजू घेऊन बोलायला आलं नाही
खरं तर मामीची त्या परिसरात हयात गेली होती
सगळे तिला ओळ्खत होते, सांगायला ती तीन मजली इमारतीची मालकीण होती.लग्न होऊन या घरी आली तेंव्हा अवघी पंधरा वर्षांची होती
पण मामीनी न बोलता त्यावरही उपाय शोधला 
जरा वाकून बघितलं तर दत्त दिसेल अशा पिपळाच्या पारावर ती पाय पसरून बसायची सोबत द्न्यानेश्वरी असायचीच
तळलेले दाणे घेऊन गेलो तरी त्यामुळे मला मामीला शोधावं लागायचं नाही
पुडीतला एक एक दाणा अगदी चवीनं खायची
मला अजूनही तिची ती मुद्रा लख्ख आठवते
तसं या लख्ख आठवण्याचा काही उपयोग नसतो
झाला तर शीणच, पण मामीची आठवण आणि आठवणीतली मामी
हे दोन्ही माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचं आहे
कारण आमची शेवटची भेट त्या पार बसवलेल्या पिंपळाखालीच झाली
आईने रव्याचे लाडू केले होते चार लाडू मुद्दाम मामीच्या तोंडी लागावे म्हणून दिले , मी ते घेऊन देवळात आलो मामी निघालीच होती पण आमचा भेटीचा योग होता मी लाडू हातात दिल्यावर तिने मला एक दत्ताला ठेऊन ये म्हणून सांगितलं मग एक स्वत: खाल्ला एक मला दिला आणि एक आईला नेऊन द्यायला सांगितला कधी नाही ते पदराने माझं तोंड पुसलं 
कौतूकाने माझ्याकडे बघितलं दत्ताला बाहेरूनच नमस्कार केला
पिंपळाला जरा वाकून नमस्कार केला 
आणि तिच्या घरापर्यंत आम्ही बोलत बोलत घरी आलो
घराशी आल्यावर तिने मला विचारलं आठ आणे आहेत का रे? मला फोन करायचाय
तिच्या घरी फोन होता पण फोनला हात लावायची चोरी
मी तिला आठ आणे दिले आणि ती पब्लीक फोन पाशी थांबली मी घरी आलो
हीच आमची शेवटची भेट
मग तिचं सुतक असताना मी आई बरोबर तिच्या घरी गेलो
सून मगर मछ के आँसू ढाळत बसली होती
पण मुलीला अचानक उमाळा आला तिला रडू आवरेचना कारण आई म्हणून गेली "वनू नशीब तू तेंव्हा इथे राहयला होतीस, त्यामुळे तुझी भेट तरी झाली
नाहीतर कसं झालं असतं 
कारण वनूताईचं ना आपल्या भावाशी पटायचं ना वहिनीशी
म्हणून ती माहेरी यायचीच नाही, मग नेमकी अत्ता कशी आली? काहीतरी जाणवलं असेल म्हणूनच ना?
पण वनू ताई हंबरडा फोडत म्हणाली छायाताईssss आईला आपण जाणार हे आधीच कळलं होतं 
तिने मला फोन करून बोलाऊन घेतलं 
परवा संध्याकाळी मला तिचा अचानक फोन आला. म्हणाली" तू आलीस तर मला खूप बरं वाटेल, नाही आलीस तर मी अडून राहीन असं नाही
पण अजून पूर्ण विरक्ती यायला वेळ आहे
जायच्या आधी तुझ्या हातून वाटीभर दूध प्यायची इछ्चा आहे
भागवत एकादशी होती तिचा उपास रात्री वाटीभर दूध प्यायची वहिनीकडे तिक्ष्ण कटाक्ष टाकत ती म्हणाली मिळालं तर
आता अचानक आलेल्या अशा फोनवर कोण विश्वास ठेवणार?
पण सासूबाई म्हणाल्या" तू जा बापडी, बोला फुलाला गाठ पडली तर तुला जन्मभराचं लागेल"
असं काही होणार नाही असं घोकत मी आई साठी आले, संपूर्ण दिवस गेला
आणि रात्री उशीरा , त्याकाळी रात्रीचे साडे अकरा म्हणजे उशीरच
ती उठून बसली म्हणाली वाटीभर दूध दे , साखर घाल
मला हळद कूंकू लाव
सुरेखा (वहिनी) पडल्या पडल्या म्हणाली दूध नाहीये!
जे आहे ते श्रीपाद च्या चहासाठी ठेवलय त्याला उद्या पहाटे स्काऊट आहे
आई हे ऐकून शांतपणे हात जोडून झोपणार होती
पण मी ऐकलं नाही, मी त्यासाठीच तर आले होते
थोडं गरम करून तिला वाटीभर दूध दिलं , देवाला हळद कुंकू वाहिलं तिला लावलं पाया पडले
वाटी घासून ठेऊन येऊन बघते तर आई झोपली होती
दुसर्या दिवशी वसूवारस होती सुर्योदयाला पार्लेश्वरात जाऊन आई गायी वासराची पुजा करायची ना
म्हणून सकाळी उठवायला गेले........‍
किती वर्ष झाली म्हणून मोजायला गेलं तर हिशोबाचा जरा गोंधळ होतोय

Comments

  1. भोग भोगून गेल्या बिचार्या 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई