पंगत

बाबा गणपति घेअून आला
आअी त्याच्या पायावर दूधपाणी घालायला अेक पाअूल बाहेर आली आणि वार्याने आपलं काम केलं
धडामकन दार लागलं 
गणपती सकट आअी बाबा घरा बाहेर आणि घरात सहा महीन्याची मनूडी आंघोळ अुरकून दुपट्या वर शांत निजलेली 
दाराच्या आवाजाने ती दचकली आणि तिने टाहो फोडला 
विघ्नहर्ता हातात असताना घरावर विघ्न आलं
तशी मनुडी खरच शहाणी होती पण कधी रडली तर वेळीच शांत करावी लागायची नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती
चौदाव्या मजल्यावर घर होतं.
ब्रह्मांडाचा नायक हातात असताना दोघाना त्याचा विसर पडला
दोघं फक्त मनुडीचा टाहो अैकत होते
आअी तर रडायलाच लागली
बाबाचे तर मुर्ती धरून हात भरून आले होते
रावणासारखी त्याची अवस्था झाली,शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहीती होती
मुर्ती आणली की स्थानापन्न करायच्या आधी खाली ठेवायची नसते असं त्याने अैकलं होतं
विषाची परीक्षा कोण घेणार?
तुची माता तुची पिता तुची बंधू तुची सखा म्हणताना त्याच्याच बद्दल अितकी भिती
भिती कसली? तर तो कोपेल याची
क्षणात सगळं आठवलं घरच्यांच्या मनाविरूद्ध केलेलं लग्न
सगळ्यांशी तोडलेले संबंध
दोघं दोघच जगताना कधी शेजारीही डोकाअून पाहीलं नव्हतं
त्यात शेजारच्या फ्लँट मधे अठरा पगडचे पेअींग गेस्ट राहतात म्हंटल्यावर बघायचा प्रश्नच नव्हता
पण आअीचं रडणं अैकल्यावर आपसूक शेजारचं दार अुघडलं गेलं सहा सात मुलांचा घोळका बाहेर आला
व्हाँट हँपंडचा गलका झाला
अेकाने पटकन बाबाच्या हातातली मुर्ती जबाबदारीने आपल्या हातात घेतली
बावचळून गेलेल्या बाबाच्या ते लक्षातही आलं नाही
थकल्या सारखा तो मटकन खालीच बसला
आणि पुढच्या क्षणी त्याच्या नकळत अनावर होत त्याने भावाला फोन केला
आवाजावरून भावाने त्याची अवस्था ओळखली
तो फोनवर बोलत असताना शेजारच्या मुलाना कळलं
त्यानी दोघाना घरात बोलावलं
बघतात तर त्यांच्या घरीही गणपति विराजमान होता
सगळे त्याना धीर देत होते
अेका चुणचणीत मुलाने विचारलं"आपके बेडरूम की विंडो खुली है क्या?
चौदावा मजला
विंडो ओपन असून काय अुपयोग
ती म्हणाली दरवाजा तोड देते है
पण आअीशी बोलत बसायच्या आधीच दोघानी गँलरीतून ढांग टाकली होती
चौदाव्या मजल्यावर थरारक धाडस दाखवत ती दोघं पँरेफीटवरून त्यांच्या बेडरूमशी पोहोचली अकमेकाला हात देत दोघं खिडकीतून आत गेली
बघतात तर मनुडी कोणीतरी खेळवत असल्या सारखी खेळत होती खिदळत होती
मनूडीच्या रडण्याचा आवाज थांबल्यावर आअी बाबाला वाटत होतं मनुडीने डोळे फिरवले असतील
मन चिंती ते वैरी नं चिंती म्हणतात तसा अनुभव ते घेत होते
मनुडी बाकी कशाला नाही पण अेकटं रहायला घाबरते हे त्यांच्या लक्षात आलं होतं
भोवती माणसांचा वावर असेल तर तासंतास मुठी चोखत ती अेकटी खेळत असायची
पण जरा जरी अेकटेपणाची जाणीव झाली तर भोकाड पसरून ती आपली दखल घ्यायला लावायची
म्हणून तर आअी घरी राहूनच कामाचा व्याप सांभाळत होती
बाबा पण मनूडीच्या ओढीनं घरी धाव घेत होता
शिवाय अेक मावशी बाअीही मनुडी साठी ठेवली होती
सकाळी येउून ती रात्री जात असे
पण नेमकी तिने सुद्धा दोन दिवस गणपतीची सुट्टी मागितली होती
या दोघानी आधी घरात प्रवेश मिळवून मनुडीला अुचलली
आणि धाडकन बंद झालेलं दार ततपरतेनं अुघडलं
त्यांच्याकडेवर खुदू खुदू हसणार्या मनुडीला बघून आअी बाबाला काय वाटलं हेशब्दात सांगत बसायचा अट्टाहास मी करणार नाही
पण मनूडी अेकटी असतानाही खेळत होती या वर दोघांचा विश्वास बसेना.त्याना काय माहीत ती अेकटी होती?
की कोणी गब्दूल पाहूणा मनुडीशी लडीवाळपणे खेळत होता?
तो दिसायला भाग्य हवं किंवा ते कळायला श्रद्धा
अितक्यात याच्या फोनमुळे मोठा भाअू मोठेपणाने नात्याचा मान राखत आअी बाबांसह घरी पोहोचला
दूरावा असा कुठे राहीलाच नाही,मनुडीला बघून आजी आबाना गहीवरून आलं
तो मन मिलाप बघून शेजारच्या सडाफटींग मुलानाही अुचंबळून आलं
मग मोठ्याने पूजा सांगितली धाकट्याने मनोभावे पूजा केली
दणक्यात आरती झाली
मोदकांची दिलेली आँर्डर अैनवेळी वाढवण्यात आली
आणि मग त्या गजाननासमोर भलीमोठी पंगत जेवायला बसली,वरण भात, अळुवडी, खमंग बटाट्याची भाजी, शिवाय उकडीचे मोदक बेत कसा फक्कड जमून आला ,सगळी आपली माणसं जमल्याचा आनंद प्रत्येकाला जाणवत होता ,त्यात
प्रत्येकजण आप आपल्या भाषा बोली सहीत त्यात सहभागी झाला होता
मनुडीच्या आनंदाला तर अूत आला होता,तिची बोली तर अजूनच वेगळी होती 
लहान मूलं म्हणजे देवाचच रूप म्हणतात.हे खर मानलं तर
मनुडीच्याच रूपाने तो विघ्नहर्ता खुदू खुदू हसत होता
सार्वजनीक गणपतिची मूळ संकल्पना आणि मुख्य अुद्देश हाच असेल नाही?

Comments

  1. कितिही wela वाचा...कंटाळा yetach नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी