बहुमान

रात्रीची वेळ
तिचं आटपतच आलं होतं, आता दुधाला विरजण लावलं आणि गंज टेबला वर ठेवला की ती निजायलाच जाणार होती, एका कामाला हात न लावता  आटपलं की नाही तुझं? असं राजवाडे दोनदा विचारून गेले
त्यानी आँनलाईन नवा मसाजर  मागावला होता खास तिच्या साठी
तिला वाटलं होतं हे वाढदिवसाचं गिफ्ट असेल, पण नाही!वाढदिवसाची छान तिच्या आवडीची साडी मिळाली होती, पण हा मसाजर केवळ तिच्या काळजीपोटी मागवला होता
हल्ली तिची पावलं खूप दुखायची, रात्री झोप लागायची नाही, आणि लागली तरी ती झोपेत कण्हायची
नव्या नवलाईचे दिवस, त्यांचे नाही मसाजरचे
दोन दिवस स्वत: करतील मग म्हणतील" तुला दाखवलं ना कसं करायचं ? मग आता तू कर. स्पीड कमी जास्त करता येतो, एका हाताने मसाजर धरयाचा आणि एका हाताने ही कळ फिरवायची
तिला त्यांची वाक्यही माहीत झाली होती
मुलंही आज काल  म्हणायची बाबा तुम्ही ठरल्या वेळी ठरल्या सारखे वागता
ही हसली तरी असं काही बोलायची तिची  हिम्मत नव्हती
साधी माणसं फार लवकर दुखावली जातात, असा तिचा अंदाज होता, त्यानी तिसर्‍यांदा बोलवायच्या आत आपण निजायला जायचं अशा विचारात असताना दारावरची बेल वाजली
अशी अवेळी बेल वाजली की समोरच्याला कटवायचं कसं हा विचार कोण असेल बरं ? या प्रश्नाच्या आधी येतो
तिने भराभर स्वैपाकघरातले लाईट घालवले, हाँलचा बंदच होता, पँसेजचा लाईट लाऊन ती दार उघडायला गेली
राजवाडे बेडरूमच्या दाराशी येऊन सावध उभे राहिले
कधी कधी जाधव त्यांचा मित्र पैसे मागायला काहीतरी कारणं घेऊन असा अवेळी दाराशी यायचा
हिने आयहोल मधून बघितलं
आणि विचित्रच रिअँक्ट झाली, बेडरूमच्या दाराशी उभं राहून राजवाड्याना काही अंदाजच येईना
हिने आयहोल मधून बघितलं
इतक्या अपरात्री ती बँग घेऊन उभी होती
फोन नाही, पत्र नाही, येते असा निरोप नाही
विनाकरण येणार्‍यातली ती नव्हती, शेवटी मायलेकीचं नातं त्यामुळे आनंदा बरोबर काळजी जास्त
अशी कशी आलीस? अत्ता कशी आलीस? एकटीच आलीस? असे किती प्रश्न एका  क्षणात बघे रस्त्यात विनाकरण गर्दी करतात तसे तिच्या मनात जमा झाले
तिने घाईने दार उघडलं , तिला घरात घेतलं
तिच्या हातून सुटकेस घेत बाजूला ठेवली तिला जवळ घेत  ती न राहवून म्हणालीच अत्ता कशी आलीस?
आणि तिचा बांध फुटला, हुंदका  अडवताच आला नाही
तसा तिला आधार देत तिने बसवलं , राजवाडे बाहेर न आले तर बरे असं ती म्हणत असताना
राजवाडेही हेच म्हणत होते
मायलेकी बोलतायत तर बोलुदे, दोघींमधे आपण काहीही बोललो तरी दोघीना पटायचं नाही
आणि नक्की काय बिनसलय ते अत्ता नाहीतर मग  कळेलच
उद्या आपण सरळ दांडी मारायची, आपण घरात असलेलं बरं  असा ते विचार करत असताना
दोघी स्वैपाकघरात आल्या, हिने दिवा लावला  गँसवर  तांदुळ चढवले
वरण आणि मेथीची भाजी होतीच, तरी बटाट्याच्या काचर्‍या करायची तिची तयारी होती
पण तिच नको म्हणाली
तुझा आग्रह म्हणून चार घास खाते नाहीतर खरच भूक नाही
पण हिला माहीत होतं अत्ता भूक नाही म्हणेल आणि रात्रभर तळमळत राहील
तशी आज ती तिच्याजवळच निजणार होती
जे समोरासमोर बसून बोललं जात नाही ते अंधारात सोबत पडल्या पडल्या बोललं जातं हा तिचा अनुभव होता
तिने जेवायला वाढलं पहिला घास खाताना तिला जाणवलं भूक होती पोटात
तहान सुद्धा लागली होती
आणि आता इथे येऊन तोंडाला चव सुद्धा लागत होती
स्वत:च्या सवयीनुसार तिने तिला सुद्धा  जेवण आटोपता आटोपता वाटीभर दूध प्यायला दिलं
ती वाटी तोंडाला लावताना तिने विचारलच अजून तुझी ही सवय आहेच का?
ती पण हासली म्हणाली ही सवय लागली कुणामुळे?
दोघी हसल्या आणि ती गंभीर झाली
म्हणाली या सवयी सुद्धा सुटता सुटत नाहीत नाही? अगदी घर सोडलं तरी
यावर हिला  काय बोलावं कळेना
ही घर सोडून आली? आणि डायरेक्ट इथे? राजवाड्याना कळलं तर ते काय रिअँक्ट होतील?
पण त्याना ते कळलच, कारण ते कान देऊन ऐकतच होते
आज घर सोडून आले असं म्हणत असले तरी उद्या नाहीतर परवा घरी परतणार याची त्याना उगीच खात्री वाटत होती, तशी घर सोडून पहिल्यांदीच ती आली होती
पण तरी अशा अपरात्री आई घर सोडून मुलीच्या आश्रयाला आली हे ऐकायला विचित्रच वाटतं नाही का?
पण जावई सासूचं नातं इतकं विचित्र असतं म्हणायला सन इन लाँ
नाहीतर या नात्याला लाँच भारी
पण आई अशा तडकाफडकी घर सोडून का आल्या? हेच राजवाड्याना कळेना
गेल्या महिन्यात तर त्यांच्या एक्सष्टीला सगळे आनंदात जमले होते,उत्सवमुर्ती म्हणून या ही छान मिरवून घेतलं होतं मग एका महिन्यात काय झालंअसेल
काय झाल असेल याची तिला पुसट्शी कल्पना होती
लहानपणापासून नातेवाईकांकडून "ह्यांच्या बाबांचं  आहे ना ते झेंगट" हे वाक्य या दोघी  बहिणी लहानपणापासून ऐकत आल्या होत्या
पण त्याचं सावट आईने कधीच घरच्या वातावरणावर पडू दिलं नव्हतं
आणि बाबाही त्यामुळेच असेल पण आईशी कायम जमवून घेत आले होते, मग आजच काय झालं की ही बँग घेऊन निघून आली?
पडल्या पड्ल्या बोलायला सुरुवात झाली
आणि आई शांतपणे बोलायला लागली,म्हणाली मला अत्ता जाणीव झाली
मला तुझ्या बाबाना समजून घ्यायला हवं
तुम्ही दोघी तीन साडेतीन वर्षाच्या असताना मला कळलं होतं यांचं प्रभूदेसाई मँडमशी जमलय ते
खूप रडले खूप चिडले समजूत काढणारं कोणी नव्हतं भडकवणारेच खूपजण होते
नको ते सल्ला देणारे माझे कोणीच लागत नव्हते
पण उर्मीलाला मी सोडू शकत नाही पण मला आपला संसार मोडायचीही इच्छा नाही हे सांगणार्‍या तुझ्या बाबाना मी ओळ्खत होते
लफडं वगैरे करण्यातले नव्हतेच, अपघात काय फक्त  रहदारीतच घडत नाहीत
रोजचं आयुष्य जगतानाही घडू शकतात, जेंव्हा मी प्रभूदेसाई मँडमना पहिल्यांदी भेटले ना, खरं सांगते पत्नी म्हणून माझा अहंकार दुखावला गेला असेल
स्त्री म्हणून जे संस्कार मिळालेले असतात त्यानुसार मला यातना झाल्या असतील
पण व्यक्ती म्हणून मी मँडमना अँप्रिशीएटच केलं
हं! अशी बाई आवडू  शकते असं म्हणताना अशा बाईला आपला नवरा आवडला याचा सुप्त अभिमानच वाटला
नातेवाईक सगेसोयरे काय गं सगळेच काही पोटतिडकीने तुमचा विचार करत नाहीत
शेवटी आपला विचार आपल्यालाच करावा लागतो
तसा मे केला, दोघे एकाच ठिकाणी कामाला, दोघांचे विषय सारखे, ध्यास एक त्यातून नातं निर्माण झालं तर त्याचा बाऊ कशाला करायचा?
मग अत्ताच का बाऊ करतेस? राजवाड्यांच्या मनातला  प्रश्न तिने विचारला
बाऊ कुठे करतेय? उलट खूप समजुतदार पणे मी हा निर्णय घेतला
घर सोडून मी काय तुझ्याकडॆ राहिला नाही आले, हा माझा मधला थांबा आहे, इथून मी जाणार भांडारकर संस्थेत तिथे माझ्या एकूण अनुभवाचा खूप उपयोग होईल
बाबाना एकटं टाकून ? ती बाबांची बाजू घेत म्हणाली
तेच तर तुला समजत नाहीये
मी त्यांचाच विचार करून बाहेर पडले
प्रभूदेसाई मँडमच्या डोळ्याचं आँप्रेशन झालय, एक महिना सांभाळायला सांगितलय
ड्राँप्स घालायचे असतात दिवसातून सात वेळा
मी म्हंटल मँडमना इथे आणा आपल्याकडे, मी घेईन काळजी, त्या आल्या नाहीत
खूप रडल्या त्या, त्याना एक महिन्यात रडायचं ही नव्हतं मग परत थोडी ट्रिटमेंट घ्यावी लागली, मँडमनी तुझ्या बाबाना यायला बंदी घातली ब्युरोची बाई बोलावली पण ती काही कामाची निघाली नाही
तुझी आत्या अगदी कशी तिची जिरली च्या थाटात मला सांगायला आली
मला जाणवलं जन्मभराचं नातं माझं या बाईशी जोडलं गेलं पण हिने मला ओळखलच नाही
तिला त्रास झालेला बघून मला आनंद कसा होईल
उलट काळजीच वाटेल
कारण मला हाका मारायला तुम्ही दोघी आहात, हे तर हक्काचे माझ्या जवळ आहेत
पण मँडमना कोण आहे?
तुझ्या बाबांच्या प्रेमात पडल्या म्हणून त्यानी लग्नाचा विचार केला नाही की त्यांचं दुसरीकडे इतकसं पाऊल घसरलं नाही
मी एकनिष्ठ होते कारण आमची लग्न्गाठ होती, मँडमनी इतक्या निष्ठेनं हे नातं का पाळलं?
आणि तुझ्या बाबानाही वाटतच असेल की काहीतरी
निव्वळ मी मला समाजाने अधिकार दिलाय म्हणून फणा काढून बसून राहू?
मग तिला तिच्या निष्ठेचं पारितोषिक कधी मिळणार?
मँडमच्या प्रबंधाला पुरस्कार मिळालेत
पण त्यांच्या निष्ठेचा बहुमान करायचं मी ठरवलं
मी त्या दोघाना काल डिनरला घेऊन गेले आणि माझ्या गळ्यातलं मंगळसुत्र त्यांच्या गळ्यात घातलं
आणि सांगितलं जसे सर तुमचे  सुद्धा आहेत तसा सरांचा परिवार सुद्धा तुमचा आहे
आम्ही आहोत आणि तुम्ही एकट्या नाहीत  राजा राणी सारखे राहयचे दिवस सरले अस्ं समजू नका
 तुम्हाला जागा करून द्यायची तर मला बाजुला व्हायला  हवं
कारण आपल्यात डावं उजवं व्हायला नको
म्हणून मी इथे आले
माझा तुमच्यावर विश्वास आहे , तुम्ही दोघं स्मजून घ्याल आणि मुलानाही समजवाल
प्रत्येकवेळी ठरल्या प्रमाणे बोलतात असा आरोप असणार्‍या राजवाड्याना यावर काय बोलायचं खरच कळेना
पण आपल्या मदर इन लाँ बद्दल त्याना खूप आदर वाटायला लागला






Comments

  1. निव्वळ अप्रतिम !!!!!

    ReplyDelete
  2. काळाच्या पुढे. वेगळाच द्रुष्टिकोन. फारच छान.

    ReplyDelete
  3. अजिबात आवडलं नाही...... मुळातच पुरूषांची व्रुत्ती जी दाखवलीय, की मला ती पण हवी आहे आणि उपकार केल्यासारखं मला संसार पण मोडायचा नाहीया..... म्हणजे अन्याय त्या पुरूषानी दोघींवरही करायचा..आणि स्त्रियांनी मोठेपणा दाखवायचा... सगळं accept करायचं...आणि बाकीच्यांनी त्याचा उदोउदो करायचा..so that पुरूष हवं ते करायला मोकळे.......

    ReplyDelete
  4. काका, हीच परिस्थिती उलट असेल
    तर नेमकं काय होईल? नवरा असाच विचार करेल का? नाही आवडला आईचा दृष्टीकोन.

    ReplyDelete
  5. Ajibaat aavadale nahi..mothepana ghenyaat donhi bayakanni janma vaya ghalavala aani purushane Matra sarv saadhya kele

    ReplyDelete
  6. Lihilay nehmi pramane sunder...
    matr Ajibat patali nahi gosta..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी