कोडगा

"कोडगा" या शब्दाला समानार्थी शब्द खूप असतील, आहेतच!
पण मुळात या शब्दाचा जो अर्थ आहे तो भयंकर आहे
ज्याला कोडगं म्हंटलं जातं त्याला एका अर्थी वाळीतच टाकलं जातं , ज्याने हे अनुभवलं असेल त्याला मी काय म्हणतोय ते बरोबर कळेल
आणि ज्यानी हे अनुभवलं नसेल तो माझ्यामते खरा भाग्यवान
रामाच्या कृपेनं असं भाग्य  जन्माला येणार्‍या प्रत्येकाला मिळो, पण तसं होत नाही
निदान या आपल्या कथेच्या नायकाच्या नशिबी तरी हे भाग्य नव्हतं
भालू दामोदर दरडे, वय वर्ष बत्तीस
भावंडात शेंडेफळ
दिसायला देखणा, उंचा पुरा, सावळा पिळदार अंगाचा
मोठी पाच भावंड तीन बहिणी दोन भाऊ, सगळे विवाहीत संसाराला लागलेले
याचा संसाराचा प्रश्नच नव्हता कारण कमावता नाही तर लग्न कसं होणार?
बारावी पास त्यानंतर शिक्षण झेपेचना, वडील निवृत्त झाले भावानी हात वर केले, बहिणी काय बोलून चालून सासुरवाशीणी
तरी बहिणींचा तसा जिव तुटायचा, मधल्या भावोजींचा तर भालूवर जिवच होता
तसा एका वहिनीचाही जिव होता त्याच्यावर,जिव होता की डोळा? पण भालू मुळात वृत्तीने सज्जन, तिने किती इशारे केले तरी हा कानाडोळा करायचा जपून राह्यचा
आणि भालूचा एकटेपणा समजून घ्यायला वाटून घ्यायला एक स्थान होतं
  लग्न इतक्यात तरी शक्य नाही हे माहीत असून शेजारच्या हेमाचा जिव जडला होता त्याच्यावर
आणि तो ही तिच्याशी प्रामाणीक होता, हेमा कमावती होती, पदवीधर होती
तिच्या घरी  नाक्यावर टाईमपास करणारा भालू मुलीचं स्थळ म्हणून पसंत असणं शक्यच नव्हतं पण अख्ख्या गल्लीला या दोघांच माहीत होतं
त्याच्या जिवाला तोच काय तो आधार
नाहीतर घरी आईसह घासागणीक आणि घोटागणीक तो निक्कामा असल्याचं जाणवून द्यायचे
रविवारी सगळे घरी असायचे  रविवारचा खास बेत असायचा , पंगत बसायची पण त्यात भालूचं ताट नसायचं
तोच बसत नाही असं सगळे म्हणायचे पण त्याला अरे बस इथे असही कोणी म्हणायचं नाही
भालू घरी पडेल ते काम करायचा, म्हणजे अगदी दळण टाकण्यापासनं ते मुलाना शाळेत सोडण्या आणण्या पर्यंत फरशी पुसणं झाडलोट करणं  बाजार आणला तर साफ करून देण्याचं काम सुद्धा त्याच्याच गळ्यात मारलं जायचं
तो कधीच कशाला नाही म्हणायचा नाही
अगदी भावाने जुना होत आलेला शर्ट त्याच्या अंगावर भिरकावला तरी सुद्धा
क्रिकेट उत्तम खेळायचा, फुटबाँलचा खेळ त्याच्याशिवाय रंगायचा नाही, गल्लीतला गणपती त्याच्या भरवशावर आणला जायचा घरच्या गणपतीचीही सगळी जबाबदारी त्याच्यावरच सोयीस्कर रित्या टाकली जायची, त्याच्यावर जिव टाकणार्‍या पाघळलेल्या  वहिनीपासनं स्वत:ला वाचवणं अशावेळी त्याला भारी जायचं कारण मदतीचा हात तीच पुढे करायची पण पुढे केलेला हात कुठे पोहोचेल सांगता यायचं नाही
भालूचं एकच होतं
तो सकाळी लवकर उठायचा नाही
त्याला कारणही तसच होतं सकाळी सहा सात जणाना भराभर आवरून घर सोडायचं असायचं त्यात आपली लुडबुड  नको म्हणून तो झोपायचा नंतर त्याला स्वत:चा  चहा स्वत:च करून घ्यावा लागायचा
त्यावरूनही बोलणी खावी लागायची, या सगळ्याची त्याला सवय झाली होती म्हणूनच इतरांच्या मते तो कोडगा झाला होता
पण आज पावणे दहा झाले तरी तो हलायचं नाव घेत नव्हता, रविवार असला म्हणून काय झालं?
इतकं झोपायचं ?बरीच कामं खोळंबली होती, न्याहारीचे पोहे त्याच्यासाठी उरले नव्हते हे कोणाच्याच लक्षात आलं नाही पण कपडे इस्त्रीला टाकायचे होते, बाजार आणायचा होता दोन्ही भावानी आदल्या दिवशीच आईकडे त्यासाठी पैसे देऊन ठेवले होते आणि अजून हा झोपला होता , हा उठणार कधी, आणि जाणार कधी या विचाराने दोन्ही वहिनी कार्दावल्या होत्या, पाघळलेल्या वहिनीला मात्र एक निजलेला मर्दानी देहं ्बघण्याचं सूख अनुभवता येत होतं त्याचा सावळा रंग त्याची मिशी त्याचे पातळ ओठ, दणकट खांदे, ताशीव पाठ नाहीतर तिचा दमेकरी असल्या सारखा नवरा,जरा दात पुढे असलेला

 हाका मारून झाल्या, शिव्या घालून झाल्या, हलवून झालं,बराच वेळ गेला शेवटी सय्यम हरवून दामोदरपंतानी रागाच्या भरात एक लाथ हाणली आणि ते दचकले, त्यांच्या पायाला आपल्या तरण्या ताठया मुलाच्या देहाचं निर्जीवपण जाणवलं
किनार्‍यावर भरतीची लाट आदळावी तशी अभद्र शंका त्यांच्या पित्याच्या कमकुवत हळव्या मनावर आदळली
हा हळवेपणा आधी होता कुठे?
टाहो फोडत ते भालूच्या देहावर कोसळले
बाळाsssssss उस्फूर्तपणे त्यांच्या तोंडून आर्त हाक गेली, ते मनापासून कळवळले
मनातून कोसळले गेला माझा भालचंद्र, माझ्या वडिलांच नाव ठेवलं होतं त्याला त्याचाही विसर पडला होता मला. भाल्या शिवाय कधी त्याला संबोधलं नाहीssss असं काय काय ते बरळायला लागले
एव्हाना सगळेच भालू भोवती जमले होते, तो गेलाय या बद्दल शंकाच उरली नव्हती, चिठ्ठीतही त्याने स्पष्ट केलं होतं कुणालाही दोशी धरू नका, जन्म घेऊन चुक केली ती मी सुधारतोय
सगळ्यांची क्षमा मागून त्याने निरोप घेतला होता
हाहा:क्कार माजला
क्षणापुर्वी ज्याच्या नावानं दात ओठ खाल्ले जात होते त्याच्या बद्दलच आता गळा फाडून हुंदके बाहेर पडत होते, आपण गमावला त्याला ही बोच प्रत्येकाच्या मनालाच लागली असेल, त्याचा देह असूनही त्याची अनुपस्थिती जाणवायला लागली होती, साधी घरात पाल शिरली तरी सगळ्यात आधी हाक यायची ती भालूच
आता कितीही हाकारा केला तरी प्रतिसाद मिळणार नव्हता
आईला तर शुद्धच नव्हती, इतरांच्या नादी लागन, इतरांशी तुलना करून तिनेही आपल्या पोटच्या गोळ्याला हडत हुडतच केलं होतं
अख्खी गल्ली लोटली पण शेजारच्या इमारतीत राहणारी हेमा फिरकली सुद्धा नाही
आणि दिवस कार्य पार पडल्यावर एका तिन्हिसांजेला ती या घरी येती झाली आणि त्या दमेकरी भावासमोर उभी राहिली, घरात सगळे होते पण ही नक्की काय बोलणार आहे याचा अंदाज कुणालाच येईना
तिचं लग्न ठरल्याची खबर सगळ्यानाच होती
ही आपल्या घरची सून होऊ शकली असती याची कल्पनाही या सगळ्याना होती
पण भावासमोर ती अशी का उभी आहे? हे कुणाला कळेना
आणि हेमाने बोलायला सुरुवात केली
काय भाऊ, झालं का तुझ्या मनासारखं?
स्वत:च्या प्रमोशनसाठी आपल्या बाँस्सच्या भावाच्या गळ्यात मला मारताना तुला काहीच वाटलं नाही?
तुला माहीत होतं ना? आज ना उद्या भालू आणि मी लग्न करणार होतो
माझं माझ्या वडिलांसमोर काही चालत नाही, त्याना समजवायला मला जरा अवधी हवा होता
तरी माझ्या वडिलाना भेटून , त्याना फशीस पाडून तू ही सोयरिक जुळवलीस?
भालूला हे कोडगेपणाने सांगतानाही तुला काही वाटलं नाही?
म्हणूनच त्याने आत्महत्या केली, मी एकमेव आधार होते त्याचा तो ही तू मिजासीत हिसकावून घेतलास
त्याला यशस्वी होऊन दाखवणार होतास ना?
की तुझी बायको त्याच्यावर भाळली म्हणून सूड घतलास असा ?
अरे पण भालू इतका सज्जन होता, की विचार तुझ्या बायकोला त्याने इतकसं तरी कधी तिला प्रोत्साहन दिलय का?
तुम्ही त्याला कोडगा म्हणायचात ना? खरे कोडगे तुम्ही आहात दोन दोन कमावते भाऊ असताना आपल्या धाकट्या भावाला मायेनं सांभाळू शकला नाहीत
नोकरदार असल्याची मिजास दाखवतोस ना? आता बघ
लग्न होऊन मी तुझ्या बाँस्सच्या घरी जातेय
मी  बदली करून घेऊन तुझ्या सेक्षनला येते आणि तुझी अशी वाट लावते
असं कुभांड रचते की चार वर्षात तुला घरी बसवते
आणि निव्वळ घरी आहे  म्हणून तुम्ही जी जी कामं भालूला करायला लावत होतात ना
ती सगळी तुला करायला भाग पाडते
मला डोहाळे लागतील ते ही तुला भिकेला लागल्याचे पाहण्याचे
आता तुला माझ्यापासनं कोणी वाचवू शकत नाही
एक भालू होता जो मधे पडला असता त्याला तुच संपवलास
आता कोडगा व्हायची पाळी तुझी....

Comments

  1. खूप दिवसांनी तुमची नवीन कथा आली ब्लॉग वर
    नेहमी प्रमाणेच अप्रतिम !

    ReplyDelete
  2. शेवट निशब्द

    ReplyDelete
  3. Kay bolu sir sagla kasa dolyasamor ghadatay asa vatat hota

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी