मुरलीधर

विश्राम बोरगावकर
वय वर्ष चाळीस
सज्जन साधे सरळ संसारी गृहस्थ
आयुष्य म्हणाल तर, साधं सरळ सोपं , आयुष्यात कोणतीच गोष्ट त्यानी ठरवून केली नाही, अगदी लग्न सुद्धा त्यांच्या चुलत्यानी ठरवलं आणि हे बोहल्यावर उभे राहिले
आंतरपाठापलिकडॆ कोण उभी असेल हे त्यानी धड बघितलंही नव्हतं , पण कोणीतरी ठरवल्याप्रमाणे आंतरपाठा पलिकडे उभी असलेली वसूंधरा अगदी त्याना अनुरूप अशीच होती
एकूणच आयुष्य सुखी माणसाचं असावं तसं होतं
नोकरीही सोयीची होती, आँफीसातही कसला त्रास नव्हता
वसूंधरा अबोल असली तरी हसतमूख होती, तिचाही शिलाईच्या कामावर हात बसला होता
घर बसल्या ती ही चार काय दहा पैसे कमवत होती
यथावकाश दोन मुलं झाली, ती ही तशी गुणीच आता दंगा त्यानी नाही करायचा तर कोणी करायचा?
त्यांचं वयच आहे ते , वसूंधरा समंजस होती शक्यतो मुलांचे प्रश्न ती आपल्या  साध्या सरळ नवरोजी पर्यंत येऊच द्ययची नाही .
तरी सध्या विश्राम या आयुष्याच्या साध्या सरळ सोप्या प्रवासाला काहिसा उबले होते
त्याना एखादी गोष्ट स्वत:ठरवून करायची होती
तसं त्यानी आपल्या बायकोला सांगितलं , मला आता एक असं काहीतरी स्वत: ठरवून पार पाडायचय
वसूंधरा म्हणाली जे कराल ते विचार करून करा
अचानक नका करू, मला कल्पना देऊन ठेवा, माझं बाकी काही म्हणणं नाही
परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे, तो सांभाळून घेईल
मी नोकरी सोडून व्यवसायाकडॆ वळलो तर? त्यानी विचारलं
वसूंधरा जरा बिथरली पण चेहर्‍यावर ते न दाखवता इतकच म्हणाली"तुम्ही काय करा हे मी नाही सांगू शकत
पण जे कराल ते विचार करून करा, नोकरी सोडलीत तरी मला कल्पना देऊन ठेवा
नक्की आपण काय करावं हे त्याना कळेना
धाडसच केलं पाहिजे असं नाही , काहीतरी बदल
पण बदल म्हणजे काय?
त्या दिवशी आँफीस मधे त्याचे मित्र बोलत होते , ते साहेबांकडे जरा लवकर जाण्या विषयी विचारणा करणार होते, का? तर मुरली धराच्या देवळात माधवानंद स्वामी मुक्कामाला आल्याचं त्याना कळलं होतं त्यांच्या दर्शनाला जायचा त्यांचा बेत होता
मनोमन यानीही  ठरवलं आपणही त्या सतपुरुषाचं दर्शन घ्यायला जायचं
मुरलीधराचं देऊळ म्हणजे गावाबाहेर  जरा दूर होतं
सगळ्यांबरोबर विश्रामरावानी लवकर निघण्याची परवांगी मागायचं ठरवलं
पण त्याना विचारावं लागलच नाही कारण साहेबानी त्याना नेमकं त्याच दिवशी एका डेपोला  अचानक भेट द्यायला सांगून रिपोर्ट करायला सांगितला
आणि तो डेपो नेमका देवळाच्या जवळ दोन स्टाँप अलिकडेच होता
बाकी मित्राना जादा काम असल्याने कार्यालय सोडता आलं नाही, आणि विश्राम मात्र ठरवल्या प्रमाणे सहज मुरलीधराला जाऊ शकत होते
त्यातही इतकी सहजता बघून खरं तर ते जरा नर्व्हसच झाले पण तरी मुरलीधराच्या दर्शनाला ठरवल्या प्रमाणे जाऊ शकतोय याचा त्याना आनंद झाला कारण लहानपणी आई बाबांबरोबर सणावारी ते आवर्जून या देवळात जायचे , नंतर मात्र योग कमी आले आणि खंड पडत गेला
अवतारी पुरुष वगैरे  त्यांच्या कल्पनेतच नव्हते पण माधावानंद नाव त्याना जरा दमदार वाटलं
म्हणून ते जरा उत्साहीत झाले होते इतकच
आपल्या दुचाकीवरून ते घराच्या विरुद्ध दिशेला निघाले
गावाचा तो भाग बराच बदलला होता, ओळखीच्या खुणा ओळखता येत नव्हत्या
डेपो ला अचानक भेट दिल्यावर तिथल्या कर्मचार्‍यांची धावपळ झाली कारण तिथले साहेब  गैर हजर होते हिशोब आणि इतर व्यवहार या  विषयी ते नसताना बोलणं शक्यच नव्हतं
आणि यानाही देवळाकडे जायची घाई होती
जुजबी प्रश्न विचारून तेथील मुख्य अधिकार्‍य़ाला दुसर्‍या दिवशी  आँफीसमधे यायला सांगून ते देवळाकडॆ जायला निघाले
देऊळ मात्र आठवणीत होतं तसं समोर आलं फक्त देवळाच्या आवारात एक टुमदार घर उभं राहिलं होतं
बाकी आवार प्रशस्त आणि संध्याकाळच्या रम्य वातावरणात अधीकच खुलून दिसत होतं .विश्राम त्या अवतारी सिद्ध पुरुशाला विसरले आणि मुरलीधराच्या दर्शनाच्या ओढीने भराभर पायर्‍या चढते झाले
सभागृहातून ते पुढे गर्भगृहाकडॆ निघाले वाटेत तो छोटा चौक लागला जिथे तुळशी वृंदावन होतं , विश्राम लहानपणी तिथे खेळायचे
चौक पार केला की गर्भगृहाच्या पायर्‍या लागायच्या आणि चौथर्‍यावर  गोमातेला टेकून उभ्या मुरलीधराची फार सूंदर प्रसन्न मुर्ती होती
आपण रिकाम्या हाताने आल्याचं  नमस्कार करताना त्याना जाणवलं
जरा चुकचुकायलाही झालं , निदान तुळशीची एखादी मंजिरि तरी वहावी म्हणून ते पायर्‍या उतरून परत चौकात आले आणि तेंव्हाच शंखनादाने सारं वातावरण भारून गेलं
मंजिरि खुडायची सोडून त्याना  शंखनादाचा वेध घेण्याचा मोहं  अनावर झाला
ते तसेच त्या चौकाच्या पायर्‍या उतरून बाहेर आले
बघतात तर समोरच्या घरात राहयला आलेले सदगृहस्थ सूर्यास्ताच्या मुहुर्तावर शंखनाद करत  होते
ओढले गेल्या सारखे विश्राम त्या सद गृहस्थापाशी पोहोचले
दमदार शंखनाद पूर्ण करून त्यानी विश्राम कडॆ बघितलं विश्रामनी नकळत हात जोडले
त्यानी चार कमलपुष्प विश्रामच्या हातात ठेवत त्याना विनवलं जरा ही फुलं हरिचरणावर वाहून येता?
आणि ही फळं ही ठेवा,  मी आलोच माझी वृद्ध आई आहे तिला मी संध्यासमयी इथे जरा बाहेर आणून बसवतो
वृद्धावस्थेमुळे तिला अशक्तपणा आलाय आधारा शिवाय ती चालू शकत नाही
आणि  पूत्र समोर असताना मातेला काठीचा आधार घ्यावा लागला तर त्यात  पुत्राचाच कमीपणा आहे, मानला तर
विश्रामनी निमूट ती सूंदर कमलपुष्प घेतली ती फळं घेतली
आणि गर्भागृहात येऊन त्यानी सांगितल्या प्रमाणे हरिचरणी वाहिली तेंव्हा त्याना मगाशची त्यांची रिकामी हाताने आल्याची रुख रुख जाणवली आणि या क्षणी ते शोधूनही सापडणार नाहीत इतकी मोहक सूंदर मंद सुगंध असलेली कमलपूष्प हरिचरणावर वहात होते फळं ठेवत होते तुळशीची मंजिरि वाहत होते
जणू त्या शंखनाद करणार्‍या ग्रुहस्थानी यांची मनातली हळ हळ ओळखली होती , यावरून त्याना त्या सिद्ध पुरुषांची आठवण झाली मनोभावे मुरलीधराला नमस्कार करून ते बाहेर परत त्या सदगृह्स्थाजवळ आले
आणि त्याना नमस्कार करत विचारते झाले की मंदीरात कोणी साक्षातकारी सिद्ध पुरुष माधवानंद मुक्काम्माला आल्याचं ऐकलं पण इथे तर तसं कोणी दिसत नाही ?
या वर ते गृह्स्थ मंद हासत म्हणाले माधवानंद माझच नाव आहे, पण मी साक्षात्कारी सिद्ध पुरुष वगैरे नाही
मी एक साधा ग्रुहस्थ आहे जो नुकताच संसारी जबाबदार्‍यातून मुक्त झालेला आहे
माझी पत्नी सध्या आमच्या चिरंजिवांच्या संसाराची घडी नीट बसवायला थांबली आहे
आणि मुरलीधराची सेवा करायला मी आई सोबत इथे आलो आहे
वडिलोपार्जीत हे मंदीर आमच्या घराण्याच्या मालकीचं आहे आणि मुरलीधरावर माझा हक्क असण्यापेक्षा प्रेम आधीक आहे म्हणून त्याच्या सानिध्यात आयुष्याचा उर्वरीत भाग घालवण्याचा माझा मानस आहे
विश्रामरावाना नक्की काय वाटलं ते शब्दात सांगणं शक्य नाही
पण मनोमन त्यांचं या मातृभक्त सदगृहस्थाशी एक नातं जोडलं गेलं.
मुखाने काही नं बोलता विश्राम त्यांच्या आणि त्यांच्या मातोश्रींच्या पाया पडले वंदन केलं आणि ते घराकडॆ निघाले
ते घरी आले ते मनोमन माधवानंदांचं शिष्यत्व  पत्करून
आयुष्यात काही ठरवायचं तर आपण माधवानंदांची सेवा करायची त्यानी ठरवलं, भक्ती  म्हणजे काय हे त्याना माहीतच नव्हतं
मग त्याना  आपण माधवानंदांच्या सानिध्यात राहयला जावं असं  वाटायला लागलं
म्हणून जेंव्हा वसूंधरानी आठवण करून देत विचारलं की काही ठरवलत का?
ते ठामपणे म्हणाले आपण घर बदलुया
वसूंधराने लगेच होकार दिला फक्त म्हणाली आता मालकीचं घर मिळालं तर बरं होईल
तसा योगही आला , आता त्याचं नियमीत मुर्लीधराला जाणं होत होतं
माधवानंदाना ते काका म्हणायचे आणि पडेल ते काम करत राहयचे मग एक दिवस असं बोलता बोलता नव्या घराचा पत्ता मिळाला .देवळाजवळ अगदी बजेट मधे बसेल अशी वास्तू मिळली
आता फक्त त्याचं आँफीस आणि मुलांची शाळा जरा लांब पडणार होती
पण मुलाना नवं घर आवडलं वसूंधराही खुश दिसली विश्राम त्यामुळे निवांत झाले
ही नवी वास्तू त्याना चांगलीच फळली मुलांची प्रगती समाधानकारक होतीच पण वसूंधराचा शिलाईचा व्यवसायही नावारुपाला आला विश्रामरावांचीही बढती होत गेली
अशी काही वर्ष गेली विश्राम आपला मोकळा वेळ काकांच्या सेवेत घालवायला लागले ते जे जे काम सांगतील उपासना सांगतील  ते मनोभावे करत गेले
आयुष्यात त्यानी पहिल्यांदी काही ठरवून गोष्ट केली आणि ती यशस्वी ठरली याचं श्रेय ते माधवानंदाना देत असले तरी माधवानंद कधी ते श्रेय स्विकारायला तयार नसत
माधवानंद म्हणायचे श्रेय कुणाला देण्याची इतकी घाई करू नका, श्रेय देण्यासाठी सुद्धा वैचारीक बैठक पक्की हवी ती अजून तुमची झालेली नाही
विश्रामराव याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतो असा घ्यायचे, पण अनुभव आल्याशिवाय आपली निष्ठा तरी कशी पक्की होणार? त्या साठी काकानी काहीतरी कृपा करायला हवी, त्याना  वाटायचं आपण इतके काकांच्या सानिध्यात  असतो तरी आपल्याला अनुभव काही येत नाही,पोथी पुरणात भक्ताना आलेले अनुभव किती रंजक असतात, आपण कुणाला काय सांगणार?

काही दिवस असेच गेले आणि त्यांच्या मनीची तळमळ अजूनच वाढत गेली आता मुरलीधराच्या देवळात काकांच्या प्रवचनाला गर्दी वाढायला लागली होती वसूंधरा सुद्धा न चुकता प्रवचानाला हजेरी लावत होती
बरेचदा प्रवचनाच्या पूर्वतयारीची जबाबदारी काका हक्काने वसूंधरेला सांगत आणि ती चोख बजावत असे
आणि एक दिवस विश्रामरावांची ती वेळ ती घडी आली
विश्राम गाढ झोपेत असताना काका उर्फ श्री माधवानंद त्यांच्या स्वप्नात आले.
होते त्यापेक्षा अधीक वृद्ध दिसत होते , आले आणि म्हणाले माझी पादत्राणं मी तुला देतो ती घे आणिजपून ठेव तोच माझा आशीर्वाद समज माझं  सानिध्य सदैव तुला या वास्तूत मिळेल याची खात्री बाळग
विश्रामाने अत्यानंदाने आपले दोन्ही हात पुढे केले
पण पाहिलं तर काकांच्या चरणांशी पादत्राणं नव्हती
विश्रामाने गोंधळून काकांकडे पाहिलं
ते मंद हासत म्हणाले पादत्राणं बाहेर पायरीवर आहेत नंतर जा आणि घे
काकांसाठी दूध आणायला म्हणून विश्राम उठले आणि त्यांचं स्वप्न भंग पावलं
इतक्यात तीनचे टोले पडले
म्हणजे मध्य रात्रच ती आता खाली जाऊन मुख्य दरवाजा उघडण्यात अर्थ नाही असं म्हणत त्यानी रात्र तळमळत काढली
त्यामुळे सकाळी त्यांचा डोळा लागला वसूंधरेनेही त्याना उठवायची घाई केली नाही
त्याना जरा उशीरा जाग आली आणि जाग येता क्षणी त्याना स्वप्न आठवलं
स्वप्न तरी कसं म्हणावं काका साक्षात दिसल्या सारखे वाटत होते
ते तसेच खाली गेले त्यानी मुख्य दरवाजा उघडला आणि पायरीवर बघतात तो काय
खरच नव्या कोर्‍या पादत्राणाचा जोड कोणीतरी ठेवलेला
कोणीतरी कशाला म्हणायचं?
काकानीच ठेवलेला, एकच कल्लोळ उठला
त्यानी तो उचलून हृदयाशी कवटाळला लगेच दार लाऊन घेतलं वसूंधरेला झाला प्रकार सांगितला
ती ही हरखून गेली, हा साक्षातकारच होता
दोघानी तो जोड चांदीच्या तबकात ठेवला
मनोभावे त्याला हात जोडले तुपाचा दिवा दाखवला फुल पान वाहिलं  इतक्यात दार वाजलं
विश्रामनी जाऊन दार उघडलं
दारात एक मध्यमवयीन साधारण परिस्थितीतला गृहस्थ उभा
बोला विश्राम त्याला बघून म्हणाले
तो म्हणाला माफ करा मी मगाशी तुमच्या इथे पायरीवर चपला काढून गेलो होतो
येऊन बघतो तर नाहीत म्हणून सहज विचारतो तुम्ही पाहिल्यात का कुठे?
वसूंधरा म्हणाली पण इथे चपला काढून जायची काय गरज पडली तुम्हाला?
तो म्हणाला आमच्या मालकांकडॆ पुजा आहे, अंब्याच्या डहाळ्या हव्या होत्या पुजेसाठी,म्हणून इथवर आलो पण तिथे झाडापाशी जरा दल दल होती,  जरा महागातल्या नव्या चपला होत्या म्हणून काढून ठेवल्या
थोडी द्विधा मनस्थिती झाली पण वाद न घालता  विश्राम म्हणाले आमच्यासाठी ती पादत्राणं अनमोल आहेत
तुम्ही त्याचं अपेक्षीत मोल सांगा मी उतराई होण्याचा प्रयत्न करतो
तो इसम प्रामाणीकपणे म्हणाला मी त्याचं मोल कसं सांगू? मला त्या चपला आमच्या मालकाने अशाच दिल्या होत्या , त्याचं मोल त्याना माहीत
तरी विश्राम त्याला जरा जास्तच रक्कम, मोल म्हणून द्यायला तयार झाले.पण तो मानी इसम तयार होईना
मग त्या इसमा बरोबर विश्रामराव त्याच्या मालकाकडे गेले म्हणाले यांची पादत्राणं  काही कारणाने मी परत करू शकत नाही तर तुम्ही ती पादत्राणं खरेदी केलीत ना? तर त्याचं मोल सांगा
मालक म्हणाले मी माझ्या गुरूच्या आद्न्येने ती पादत्राणं दान करण्यासाठी मागवली होती
एकूण तीन जोड होते त्यातले नेमके याना कुठले गेले मला नाही सांगता येणार
आपण असं करूया का? माझ्या गुरूना विचारू, ते मोल बरोबर सांगतील
आता गुरू या संकल्पनेबद्दल विश्राम जरा जागृक झाले होते,म्हणून ते त्यांच्या बरोबर त्यांच्या गुरूंकडे गेले
काका स्वत:ला  संसारी म्हणवून घेत होते म्हणून ते चार चौघांसारखे साधेपणाने राहत होते
पण या मालकाचे सदगुरू मुक्तानंद शेताच्या उघड्या खळ्यावर अगदी भणंग आवस्थेत होते, विश्रामला घेऊन ते मालक जसे त्यांच्या खळ्यापाशी पोहोचले तसे ते महाराज गडगडाटासमं हसायला लागले
म्हणाले दादानी दिलेला जोडा मिळाला काय?
तुझ्याकडे जोडा पोहोचवायचं काम दादानी आमच्यावर सोपवलं होतं
ते आम्ही केलं ,आता त्याचे मोल दादाच तुला सांगतील ते माझं काम नाही
ते मालक तर चक्रावलेच असतील पण विश्रामरावांची आवस्था काही वेगळी नव्हती
ते धावत जेंव्हा मुरलीधराच्या आश्रमात पोहोचले तेंव्हा काकांचं प्रवचन सुरू होतं
विश्रामरावाना येताना बघून त्यानी आपल्या प्रसन्न मुद्रेवर एक खट्याळ हास्य आणलं
पण बोलण्यात जराही खंड पडू दिला नाही
ते म्हणत होते
प्रापंचीक माणसाला नुसतं मनासारखं होऊन चालत नाही तर त्यावरही त्याला स्वत:चा ताबा असावा असं वाटत असतं लहानमुलाला खेळवावं तसं भगवंत काहींचे हट्ट पुरवतोही पण काहीना मात्र त्यांच्या मनासारखं घडवताना हे त्याचं सुत्र आहे याची जाणीव करून देतो जे शाहणे असतात त्याना त्या अगम्य सुत्राची जाणीव होतेही ज्याना होत नाही त्यांची अजून वेळ यायची असते
आणि ज्यांनी अचुक वेळ ओळखलेली असते ते निमूट या मुरलीधराच्या चरणांशी आलेले असतात
त्यासाठी निमित्तमात्र काका मामा दादा भाऊ कोणीही असला तरी
सूत्र हलवणारा तो मुरलीधर गोवींदच असतो.आपण ठरवण्याच्या आग्रहा पेक्षा त्याचं श्रेय त्याला देऊन आपण मुरलीधराचा खेळ बघत रहावं
 










Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी