प्रश्न

काही प्रश्न कितीही वाटलं तरी नाही विचारता येत
ते तसेच राहतात  मनात
सुचिताचं तसं झालं होतं गौतमशी तीस वर्ष सुखाचा संसार करूनही
ती त्याला कधी विचारू शकली नव्हती, तुम्ही मला पसंत कसं केलत"?
हे खरच होतंं
सुरुवातीला गौतम बरोबर सुचिताला बघितलं की बघणार्‍याच्या मनात हा प्रश्न डोकावायचाच
गौतम सारख्या उमद्या उच्च शिक्षीत मुलाने सुचिताला कसं काय पसंत केलं ?
गौतम दिसायला देखणा, तरणाबांड गडी, शिक्षणातही अव्वल
नाकेला असून दाताला खळी असलेला, मनापासून हसला की डावा डोळा जरा बारीक व्हायचा
आणि तसा तो कायम मनापासूनच हसायचा
आणि त्याचं श्रेय सुचितालाच जातं कारण तिने गौतमला फार सुखात ठेवलं
अर्थात सुचिताच्या सुखासाठी सुरुवातीला गौतमलाही एक कठोर निर्णय घ्यावा लागला होता , आणि त्याने तो वेळ ओळखून घेतला , तो घरापासून नं भांडता , वादात न पडता वेगळा झाला
खरं सांगायचं तर घरापासनं तसा तो वेगळाच होता
महत्वाकांक्षी आई आणि  सतत वैतागलेले वडील, वार्‍याला पाठ दाखवत सतत बचावाचा पवित्रा घेणारा धाकटा भाऊ, अविवाहीत असलेले आणि वेळोवेळी मधे नाक खुपसणारे मोठे चुलते
यांच्या सोबत त्याने बालपण काढलं होतं , घरातल्या प्रत्येकाचं वागणं त्याच्या अंगवळणी पडलं होतं
चांगली मनाजोगती नोकरी मिळाल्यावर, स्थीर स्थावर झाल्यावर घरी लग्नाची चर्चा सुरू झाल्यावर त्याला हा प्रश्नच सतावत होता आपण अँडजस्ट झालो या नमुन्यांबरोबर, आईचा , काकांचा हटवादीपणा आपण सहन केला पण नव्याने आलेल्या त्या मुलीला कसं सांगायचं ? तू याना समजून घे
त्यात गौतमला फार वाटायचं आपला  प्रेमविवाह व्हावा
त्याने पत्रिकाही दाखवली होती एकाला
त्याने स्प्ष्ट सांगितलं होतं "बाबारे तुझ्या नशिबात काही प्रेम विवाहं नाही
पण विवाहा नंतर प्रेमच प्रेम आहे, अगदी कोणी हेवा करावा इतकं प्रेम , हे ऐकून आमचा गडी असा खूश झाला होता म्हणून सांगू
मग त्याच्या मनाने घेतलं जे पहिलं स्थळ सांगून येईल, जी पहिली मुलगी बघू तिच पसंत पडूदे
म्हणजे तुलनाच नको.
आणि पहिलं स्थळ आलं ते झावबा वाडीत राहणार्‍या सुचिता पडळकरचं
नाव ऐकूनच गौतमला एकदम पाँझेटीव्ह वाटलं होतं सुचीता म्हणून त्याच्या डोळ्यासमोर कोणीतरी  सुप्रिया सबनीस सारखी देखणी चुणचुणीत मुलगी तरळून गेली
पत्रिका जमत असल्याचं कळल्यावर तर स्वप्न बघायला फुल चांस होता
पहिल्या सांगून आलेल्या मुलीशीच पत्रिका जमत होती
मग फोटॊ आला, तो तेंव्हाच्या  पद्धती प्रमाणे साडी नेसून स्टुडियोत जाऊन रांजणाशेजारी उभं राहून काढलेला
रुपाकडे लक्षच जाऊ नये असा तिच्या दाट लांबसडक केसांचा शेपटाच त्याचं लक्ष वेधून घेत होता
आता जास्त पुढे पुढे करण्यात अर्थ नव्हता, आईच्या हे लक्षात आलं तर ती आधीच त्या मुलीवर डूक धरेल याची त्याला खात्री होती या दोन्ही भावाना त्यांची धाकटी मामी फार फार म्हणजे फारच आवडायची
आईला ते ही सहन व्हायचं नाही, त्यावरून मामीला किती अपमान सहन करावे लागले होते
आपलं महत्व कमी होणार नाही याकडे आईचं कायम लक्ष असायचं
म्हणूनच जो पर्यंत आई सांगत नाही तो पर्यंत आपण विचारायचं नाही असं त्याने ठरवून टाकलं
पण त्याला फार वाट बघावी लागली नाही
कारण एका सोमवारी त्याच्या आईने सकाळी त्याच्या समोर चहा ठेवताना सांगितलं उद्या जरा आँफीसमधून लवकर निघ , आपल्याला मुलगी बघायला झावबा वाडीत जायचय
तुझ्या आँफीसच्या इथून अमूक अमूक नंबरची बस येते त्या बसने ये आणि काळाराम स्टाँपला उतर
मी आणि बाबा दुपारीच शास्त्री  हाँल ला जाऊ  तुझ्या मोठ्या आत्याकडॆ तिथनं वेळेवर निघून तुला काळारामला भेटू, मग जरा वाटा घाटी झाली बस स्टाँपवर कुठे वाट बघत बसणार? एकतर गर्दीची वेळ त्यात याला यायला जरा उशीर झाला तर? त्या पेक्षा त्याला घरीच येऊदे पत्ता देऊन ठेव असं बाबानी सुनावलं आणि समोर काका असल्या कारणाने आईने विषय वाढवला नाही
नाहीतर काकानी ऐनवेळी आईचा पत्ता कट करून स्वत:ची वर्णी लावली असती
आणि ते बाबानाही चाललं नसतं
वाटतं पण मुलगी बघणं वाटतो तितका साधा प्रकार नसतो बरं का
मुळात लहानपणापासून मुलींकडॆ बघू नये, मुलींच्या फंदात पडू नये अशीच शिकवण दिली जाते
त्यात एकदम मुलीकडॆ आता बघ, ते ही चार चौघे घरचे दारचे बसलेले असताना
रूप काही जन्माला पुरत नाही म्हणताना समोर रंगरंगोटी केलेलं रूपच तर येतं
त्यात आपण तिला बघत असतो तशी ती  ही आपल्याला बघत असते, तिच्याही काही अपेक्षा असतात , स्वप्न असतात, त्याचं दडपण आपल्यालाही झेलावं लागतच की
संवेदनशील असल्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत
पण तोटे त्या मानाने कमी. असो!
तर मंगळवार म्हणजे गौतमच्या लाडक्या  गणपती बाप्पाचा दिवस
पार्ल्यात पार्लेश्वराच्या आवारात गणपतीचं मंदीर झाल्यापासनं  त्याचा मंगळवारचा दर्शनाचा नेम कधी चुकला नव्हता, तो आजही चुकू देणार नव्हता, म्हणून नेहमी आँफीसातून येताना तो पार्लेश्वराला जायचा
तर आज तो आँफीसला जाताना देवळात गेला, त्याला खरं आज आँफीसला जावसही वाटत नव्हतं पण आईने कार्यक्रम ठरवला होता त्यात बदल तिला खपला नसता
आणि हा फारच उतावीळ झालाय असाही ताशेरा तिने चार चौघात मारला असता
संध्याकाळ साठी वेगळा शर्ट तो घालणार होता ते ही आईने खोडून काढलं काही नको इतकं करायला, आम्ही पार्ल्याहून येतोय ना झावबा वाडीपर्यंत, तेच खूप झालं . असं ती फणफणली होती
आता आणखीन काही बिनसायला नको म्हणून गौतम गुमान घरातून बाहेर पडला आणि देवळात जाऊन आँफीसला चालता झाला होता
आणि संध्याकाळी आईने सांगितल्याप्रमाणे आँफीसमधून जरा लवकर निघून आईने सांगितलेली बस पकडून तो काळाराम बसस्टाँपला उतरला
जरा लवकरच उतरला म्हणून टाईमपास करून जायचं त्याने ठरवलं रिकाम्या हाताने जाऊ नये ही मामीची शिकवण त्याला आठवली आयुष्यात पहिल्यांदी आईला नं विचारता त्याने पहिली गोष्ट केली म्हणजे सुचिता कडे न्यायला त्याने एक किलो सफरचंद नेली
झावबा वाडीतलं सुचिताचं घर खूपच वेगळं  आणि जूनं होतं मुख्य म्हणजे घराला शेणाने सारवलेलं आंगण होतं ,घराबाहेर सोपा होता
हा गेला तेंव्हा आई बाबा पोहोचले होते
पण दोघेही मूडमधे नाहीत हे कोणी नं सांगता त्याला कळलं होतं
त्यात त्याने सफरचंद आणली म्हंटल्यावर तर आईला डोळे वटारल्याशिवाय राहवलच नाही
सुचीताच्या वहिनीने मात्र हसतमुखाने ती फळं स्विकारली, कोणीतरी पाणी पुढे केलं
त्याला छान वाळ्याचा सुगंध होता
आंगणातल्या सायली कुंदाच्या फुलांचा  सौम्य गंध  वातावरणात दरवळत होता
एकूण सगळं तर छान होतं मग आई बाबांचा मूड का गेलाय हे त्याला कळेना
खाणा खुणा करण्यात काही अर्थ नव्हता पण तरी आईने चालाखीने सुचीता समोर यायच्या आधीच आपल्याला नको, अशी काहीतरी खूण केली होती
नेमका तेंव्हाच मधल्या खोलीचा पडदा झिरमिरला आणि सुचीता समोर आली, जराशी भरल्या अंगाची ठेंगणी , लांबसडक दाट केसांची, गौतम लख्ख गोरापान तर ही उजळ त्याच्यापुढे जरा सावळी वाटेल अशीच
पण चेहर्‍यावरचं हास्य? क्या केहेने....
का काही बोलूच नये, इतकं निर्मळ सालस, त्यात तिचे ट्पोरे डोळे मनाचा वेध घेणारे
फक्त तिने चालायला पावलं उचलली आणि लक्षात आलं चालण्यात जाणवेल इतकं व्यंग आहे
खळकन काही आतल्या आत तुटावं असं ्गौतमला झालं पण क्षणभरच कारण तिच्या आत्मविश्वासात कुठे काही कमी नव्हतं ती खूप छान  हसली आई बाबांच्या पाया पडायला गेली आईने पाया पडू न देता आपली नाराजगी दाखवली
त्याला कारणं दोन होती, एकतर पायात व्यंग आणि आईला नोकरी करणारी सून हवी होती आणि सुचीताला नोकरी करायची नव्हती तिला व्यवसाय करायचा होता कुकींगचे क्लासेस चालवायचे होते
जमल्यास स्नँक्स काँरनर्सची चेन सुरू करायची होती, यातलं गौतमच्या आईला काहीच मान्य नव्हतं
पण जे पदार्थ समोर आले ते खरच लाजवाब होते त्याच्या आईला  स्वैपाकाची ना हौस होती ना आवड
पण गौतम तिच्या हातच्या पदार्थांवर भलता खुश झाला त्याच्या बाबानीही आईला चक्क बाजुला डावलून तिच्या सुग्रणपणाचं कौतूक केलं
गप्पा रंगवण्या साठी काही करावच लागलं नाही तिला खेळांमधे रस होता, देशी विदेशी खेळाडूंबद्दल माहीती होती, वाचन चौफेर होतं जुन्या गाण्यांची ती दिवाणी होती
या दोघांच्या गप्पांमुळे निघायला अंमळ उशीर झाला नाहीतर आईला कधी एकदा तिथून निघतोय असं झालं होतं
आणि गौतमने आपला निर्णय निघतानाच जाहीर करून टाकला
मला सुचीता पसंत आहे, तिला मी पसंत असेन तर माझी लग्नाला हरकत नाही
तरी आई घाई घाईने मधे पडली
अरे काय इतकी घाई आहे? ती कुठे पळून जाणार आहे का?
आणि तिला पळता तरी येणार आहे का हे  मनातलं वाक्य नजरेत आणण्या इतकी त्याची आई कुटील होती
पण त्यावरही मात करत  गौतम परत म्हणाला पळून जाण्याचा प्रश्न नाही
पण पसंत असताना उगीच पद्धत म्हणून कशाला नंतर कळवतो  म्हणत लटकवत ठेवायचं
तिला चालायला प्राँब्लेम आहे ना? ओ के , धिस इज नाँट बीग इशू, काही हरकत नाही
गौतम तिच्या आई बाबांच्या दादा वहिनीच्या पाया पडल्यावर
या दोघानाही तिला पाया पडू द्यावं लागलं आणि मियाँ बीबी राझी तो क्या करेगा काझी या न्यायाने हसत मुख रहावं लागलं मग याच मूडमधे लग्न झालं
आईने सतरांदा सुनावलं
आँफीसमधून सावकाश निघायचं तर तिथून लवकर निघाला आणि तिच्याकडून लगेच बाहेर पडायचं तर गोंद लावल्या सारखा चिकटला
आम्ही बघायचा कार्यक्रम रद्द केला हे संगायला आँफीस मधे फोन केला तर महाराज कधीच बाहेर पडले होते
आँफीसमधे हा थांबला असता तर ही नौबतच घरी आली नसती
वंसनी सांगितलं मुलीच्यात व्यंग आहे, तिच्या अटी खूप आहेत
आणि या पेक्षा लाखपटीनं उजवं स्थळ त्यांच्याकडे होतं म्हणून घाई घाईने याला फोन लावला तर
आणि या सगळ्या मनस्तापाचा राग त्याच्या आईने आपल्या सुनेवर काढला
नवी नवरी म्हणून सगळं साजरं करायला लावायचं आणि ऐन मौक्याच्या जागी व्यंगाचा उल्लेख करून हळ्हळायचं अपमान करायचा असं दुट्प्पी धोरण सासू सासर्‍यानी अवलंबवलं
जरा रुळल्यावर तिने कधी कसली आँर्डर घेतली की तिची कोंडी करायची इथपासून ते तिचे पदार्थ सांडवायचे इथपर्यंत हरतर्‍हेने त्यानी त्रास दिला एकदा गौतम समोर हा प्रकार घडला आणि त्याने उघड उघड आईशी पंगा घेतला , आईने हुकमी एक्का काढला पटत नसेल तर घराबाहेर जा, आमचं घर आहे
पडत्या फळाची आद्न्या म्हणत खरच त्याने सुचीताचा हात धरून घर सोडलं
तीन वर्षात स्वत:चा पार्ल्यातच तेजपाल स्कीम मधे ब्लाँक घेतला मीनव्हाईल सुचीताचे कुकींग क्लासेसही नावारुपाला आले
गौतमची  तरक्की होतच होती पण सुचिताही त्याला खूप सपोर्ट करत होती
तिलाही दोन मुलगे झाले
धाकटा रघुवीर इंडियन नेव्हीत गेला , मोठा रघुनाथ तिला जाँईन झाला त्याने केरळी ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं
धाकट्याचं लग्न आता ठरेल, तिच्या मनात स्नँक्स काँर्नर्स सुरू करायचे होते ते ही स्वप्न पूर्ण झालं , अडचणी आल्याच नाहीत असं नाही पण तरी दान कायम त्यांच्याच बाजूने पडलं
पण तरी गौतम सारख्या मुलाने तासाभराच्या भेटीत आपल्याला आईचा नकार स्विकारून होकार कसा दिला हा प्रश्न अजूनही सूख उराशी दाटून आलं की तिला पडायचा
पण तो कधी ती विचारू शकायची नाही पण आज लग्नाच्या एकतिसाव्या वाढदिवसाला अतिशय भावूक स्वरात मनापासून गौतमने विचारलं तू खरच सुखात आहेस ना?
आणि मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेत सुचीता म्हणाली खरच तुम्ही भरभरून सुख दिलत, खरच मी सुखात आहे तुम्ही कायम माझा आत्मसन्मान जपलात, कायम स्वत:च्या आधी माझा विचार केलात
तरी एक प्रश्न कायम  मला सतावतोय
त्या प्रश्नाला तुमच्या वतीने काही अर्थही नसेल
पण माझ्यासाठी सूख परीपूर्ण होण्यासाठी  ह्या प्रश्नाचं खरं उत्तर आवश्यक आहे
बाप रे! असा कोणता ग्रहण प्रश्न तुला पडलाय? ज्याचं उत्तर तुला अजून मिळालं नाही?
जरा वरमल्या आवाजात सुचीता दोन क्षण गप्प राहून बोलायला लागली
खरं सांगा तुम्ही खेळाडू, उमदे उंचे पुरे
माझ्या सारख्या एक पाय अखूड असलेल्या मुलीला तासाभराच्या भेटीत कसं काय पसंत केलत
ते ही घरच्यांंचा विरोध पत्करून
तू का मला पसंत केलस?
इश्य हे काय विचारणं झालं , तुम्हाला बघता क्षणीच मला आवडला होतात
बास ! माझही तसच झालं
बघता क्षणीच तू मला आवडलीस
आणि तू मनापासून आवडल्या नंतर तुझं जरासं असलेलं व्यंग माझ्या लक्षात आलं
मग निर्णय बदलावासा नाही वाटला?
नाही वाटला....
का?
का म्हणजे?
अशी प्रश्न उत्तरं सुरू राहिली तर त्यात पुढची तीस वर्ष जातील
बरं ऐक
मला तू भेटायच्या आधीच कौल मिळाला होता
तुम्ही कौल लावला होतात
अहं! न लावता मिळाला
कसा काय?
त्या दिवशी फोर्ट वरून मी झावबावाडीला यायला बस पकडली ना
तर त्या कंड्क्टरने चुकून मला एकाच्या जागी दोन तिकीटं दिली
तुझ्या घराशी आल्यावर सहज हातातलं तिकीट खिशात ठेवायला गेलो बघतो तर एकाला एक लागून दोन तिकिटं आली होती, त्या दिवशी त्या बिचार्‍याला  एका तिकिटाचा बुर्दंड भरावा लागला असेल
पण मला मात्र आयुष्य भराच दान मिळालं
माझ्या गणपतीबाप्पाचा वार होता, नियतीचा कौल मिळाला होता
आणि मनापासनं आवडणं जे म्हणतो ते मी पहिल्यांदी अनुभवत होतो, माझी पत्रिका बघून एकाने संगितलं होतं प्रेम विवाहं होणार नाही पण विवाहा नंतर प्रेमच प्रेम असेल
त्याचा शब्दंशब्द खरा ठरला
तो तू खरा ठरवलास, मी ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणाची तुला कल्पना आली असेल
म्हणून मी आपल्या मुलाना मोकळीक दिली आणि तू त्याना उभारी दिलीस आणि मला आत्मविश्वास
असं म्हणून गौतम उठला त्याने तिच्याकडे तिजोरीची किल्ली मागितली, तिजोरी उघडून त्यातून एक चांदीची डबी काढली ती तिच्या हवाली करत तो म्हणाला उघडून बघ यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे .
तिने डबी उघडली त्यात ती बसची दोन तिकिटं होती
तिच्या मनाचं समाधान झालं होतं आणि आनंद डोळ्यातून वाहत होता




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी