लाकुडतोड्याची गोष्ट

काही गोष्टी कोणी नं ठरवता ठरून जातात
आणि मग ठरल्याप्रमाणे घडत राहतात, कधी ठरवलं कोणी ठरवलं हे असले प्रश्र्न मग उरतच नाहीत
जसं आई अनंताची लाखोली तेंव्हा  पार्लेश्वराला वाहयची त्यावेळी पिशवी पिशवी फुलं तुपे वहिनी घेऊन यायच्या छायाताई एकशे सोळा फुलं आहेत हो, सदुशष्ट फुलं मिळाली, या कळ्या आहेत उमलतील उद्याच्याला , जरा मोजून घ्या  हे असे संवाद अजून माझ्या कानात घुमतात
त्यावेळी आमच्या इथे रानंच्या रानं माजलेली असायची अनंत चाफा प्राजक्त जांभूळ नागचाफा बकूळ किती झाडं सांगू?
मग आमच्या आईचा नेम ठरलेला कधी प्राजक्ताची नाहीतर कधी अनंताची तगारीची लाखोली आई पार्लेश्वराला वहायची
लाखोली वाहणं म्हणजे लाख लाख फुलं चातुर्मासात चातुर्मास पूर्ण व्हायच्या आत शंकराच्या पिंडीवर वाहणं , बेलीची लाखोली वाहणारे बरेच्जण असायचे गुंजा वाहणारे सुद्धा कोण कोण असायचे त्यावेळी गुंजेची गोमटी झाडं सुद्धा खूप होती आमच्या भोवती ,
 एक गाव देवी होती तिचं नाव नीट आठवत नाही पण तिला करंज्याचा हजारा वाहयला जायचा , करंजा  म्हणजे करंजी नव्हे करंज्याचं हिरवगार तजेलदार झाड असायचं त्याला कडू जहार औषधी फळं लागायची त्याला करंज्या म्हंटलं जायचं , करंज्याच्या फळाचं तेल काढलं जायचं काही वाणी लोक करंज्याची फळं विकत  घ्यायचे म्हणजे अर्धपोतं करंज्या दिल्या तर त्या बदल्यात थोडं डाळ तांदूळ तिखट मीठ मिळायचं
लोककथा अशी की  एका  गरीब बाईला मुल होत नव्हतं तिला गाव देवीने स्वप्नात दृष्टांत दिला
मला टोपली भर करंजा दे तुला मी सोन्यासारखी मुलगी देईन, अट एकच करंज्या वाहयच्या आधी मोजायच्या नाहीत, ती बाई गरीब होती टोपली भर करंजा करायची तिची ऐपतच नव्हती(तरी तिला पोटी मूल हवं होतं )
तिला वाटलं गाव देवीला तर सगळं माहीत आहे , मग ती माझ्याकडॆ टोपली भर करंज्या कशा मागेल? याचाच अर्थ ्ती करंज्याची फळं  मागत असेल , भोळी श्रद्धा ती बाई भल्या पहाटे उठली आणि रानभर फिरून तिने टोपलीभर करंज्या गोळा केल्या आणि देवीच्या छोट्याशा देवळात नेऊन वाहिल्या
मग मोजून बघितल्या तर त्या बरोब्बर एक  हजार नऊ निघाल्या
देवी त्या दानानेही संतुष्ट झाली आणि दृष्टांता प्रमाणे तिला मुलगी दिली
मग काय बाईचा अनुभव गावभर पसरायला वेळ लागला नाही आणि देवीचा हजारा ही प्रथाच पडली
पण लाखोली वाहण्याची प्रथा फार पुरातन, ती कशी कोणी  कधी सुरू केली माहीत नाही
पण आमच्याकडे कोणी लाखोलीचा नेम केला आणि त्याला तुपे वहिनींचा हातभार लागला नाही असं होणारच नाही हे कोणी नं ठरवता सुरू झालं आणि सुरू राहिलं
आमच्याकडेच असं नाही , कुणाकडेही तुपे वहिनी लाखोलीची वस्तू पुरवायच्या
त्या काळात नवर्‍याने सोडलेल्या बाईला असा काय मान असणार? अन तिची काय पत असणार?
पण तरी तुपे वहिनी  मानाने रहायच्या कारणाशिवाय कुणाकडे जायच्या नाहीत, कुणाकडून फुकट काही घ्यायच्या नाहीत मागायच्या तर त्याहून नाहीत
पण तरी काही गोष्टी ठरून गेल्या होत्या त्यात अनंताची पांढरी धोप्पं फुलं आणून दिली की आई त्याना रव्याचे लाडू द्यायची, गहू निवडून दिले की गव्हाचं  पीठ द्यायची
अविधवा  नवमीच्या निमित्ताने पातळ घेऊन द्यायची आणि दिवाळीत फराळाच्या मदतीला आल्या तर थोडा थोडा  का होईना पण त्यांच्या पुरता सगळा फराळ द्यायची
तसच पाऊस तोंडाशी आला... पाऊस कधी तोंडाशी येतो? पाऊस दाराशी येऊ शकतो वेशीशी येऊ शकतो अगदी चुकार पणे डोळ्याशीही येऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय पाऊस जवळ आलाकी आई नंचुकता त्याना आपली जुनी छत्री द्ययाची
हे कोणी नं ठरवता सुरू झालं आणि सुरळीत सुरू राहिलं , आईने नवी छत्री घेतली की जुनी छत्री तुपे वहिनीना मिळायची , त्यात मुद्दाम असं काही नव्हतं पण ठरून गेलं
आता वाटतं तेंव्हाची आयुष्य खरच लाखोली वाहत सुखात सुरळीत पार पडायची
अत्ता सारखी गुंतागुंत नव्हती,  जे आधीपासून ठरून गेलं होतं ते लोक डोळे झाकून पार पाडत राहयचे त्यातच त्यांची आयुष्य सुद्धा पार पडायची
तुपे वहिनींचं बघाना त्यांच्या  सोळा फरशांच्या आणि एक खिडकी असलेल्या घराला त्या काळात साडेतीन रुपये भाडं होतं
पण घर मालक त्यांच्याकडून भाडं घ्यायचा नाही, कारण त्याची बायको अंथरुणाला खिळलेली, सून आली होती ती त्या काळी नोकरी करणारी त्यामुळे दोन्ही वेळचा स्वैपाक तुपे वहिनीच उरकायच्या, बाईच्या हाताला अमृताची चव त्यामुळे असेल पण भाडं बिडं घ्यायचं त्या मालकाच्या मनातही आलं नाही
उलट दिवाळीला तो आपल्या घरावर लावायचा तसाच कंदील तुपे वहिनींच्या घरावरही चढवायचा
आमच्याकडून फराळ जायचा तर सुगंधी उतणं कोणीतरी प्रेमाखातर  द्यायचं
तुपे वहिनींचे सगळे सणवार असेच पार पडायचे फक्त पावसाळा आईने दिलेल्या छत्रीवर पार पडायचा
पण एक वर्ष असं झालं की आईच्या लक्षात आलं आपल्या जुन्या छत्रीचा अगदी अवतार झालाय , इतकी मोडकळीला आलेली छत्री देण्यात काही अर्थ नाही, म्हणून आई स्वत: बरोबर तुपे वहिनीनाही एक छ्त्री घेऊन आली
तसा निरोप तुपे वहिनीना पाठवण्यात आला
तुपे वहिनी आल्या तेंव्हा आई नेमकी समितीच्या कामाला बाहेर गेली होती
तुपे वहिनीना द्यायची छत्री मी समोरच काढून ठेवली होती, पावसाळी वातावरण तयार व्हायला लागलं होतं
वहिनी आल्या तेंव्हाही आभाळ भरूनच आलं होतं पण तरी तुपे वहिनी आल्या तशा रिकाम्या हाताने गेल्या
नशिबाने पाऊस आला नाही
आईने आल्यावर छत्री बघून विचारलं , वहिनी आल्या नव्हत्या का?
मी म्हणालो , हो! आल्या होत्या
त्याच रात्री दे मार पावसाला सुरुवात झाली
त्या काळातला पाऊस तो एकदा सुरू झाला की  दोन दोन तीन तीन दिवस थांबायचं नाव घ्यायचा नाही
आईला हूर हूर लागून राहिली वहिनी छत्री का घेऊन गेल्या नाहीत?
आणि मग कळलं तुपे वहिनीना बरं नाही , ताप आलाय
आई मला सोबत घेऊन तशीच भेटायला गेली, सोबत थोडा मेतकुट भात आणि लिंबाचं गोड लोणचं घेतलं त्यांच्यासाठी घेतलेली नवी छत्री घेतली
आम्ही गेलो तर तुपे वहिनी त्यांच्या सोळा फरशांच्या अंधार्‍या घरात मुटकुळं करून पडल्या होत्या
पावसात भिजल्यानेच त्याना ताप आला होता , आईने जरा रागाऊनच विचारलं आला होतात तर छत्री का नाही घेऊन गेलात
तुपे वहिनी म्हणाल्या अहो याने (म्हणजे मी) चुकून तुमची छत्री काढून ठेवली होती, मग मी कशी घेणार?
आईला एकदम भरूनच आलं नवीकोरी छत्री त्यांच्यापाशी ठेवत त्याना म्हणाल्या कमालच करता तुम्ही
तुम्हाला कायम जुनी छत्रीच द्यायची असा काही माझा नियम नाही
यावेळी छत्रीची अगदी वाताहातच झाली होती म्हणून नवी छत्री घेतली तुमच्या साठी , आता या वर्षीपासून ठरलच तुम्हाला हवी असेल तेंव्हा  मी नवीच छत्री घेणार तुमच्यासाठी
तुम्ही काय परक्या आहात का आम्हाला?
त्या वर्षी अविधवा नवमीच्या निमित्ताने आईने तुपे वहिनींसाठी साडी सुद्धा  दरवर्षीपेक्षा थोडी महागडीच त्याना आवडेल अशीच घेतली ...
लाकुडतोड्याची गोष्ट कोणी कोणाला सांगत असलं की मला अजूनही तुपे वहिनींचीच गोष्ट आठवते
वनदेवता लाकुडतोड्याची परिक्षा घ्यायला त्याची कुर्हाड परत करताना मुद्दाम सोन्याची कुर्हाड त्याला देऊ करते
इथे नशीब परिक्षा घेत असताना ज्या वर आपला हक्क नाही त्या वस्तूला ती  सामान्य एकटी बाई हात सुद्धा लावायला तयार नव्हती आणि तिच्या या मानी प्रामाणीकपणाला लाकुडतोड्या प्रमाणे आमच्या आईकडून बक्षीस मिळालं होतं .




Comments

  1. Khup sundar, hrudaysparshi. Dolyat paani anlat 🙏🙏

    ReplyDelete
  2. शब्दच नाहीत... अप्रतिम

    ReplyDelete
  3. भावूक कथा

    ReplyDelete
  4. खूप सुंदर कथा...

    ReplyDelete
  5. सुरुवात वेगळी आणि शेवटही वेगळा 🤗🙏👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी