कोरडी विहीर

जगाला कंटाळल्या सारखा प्रल्हाद जगत होता
कर्तबगार होता , मेहनती होता, वृत्तीने सज्जन होता, पण तो काळ असा होता की तुमचा जन्म आणि  कूळ तुमच्या जगण्यावर फार परिणाम करून जायचे
लहानपण आश्रमात गेल्याने फारसं जाणवलं नाही कधी
आश्रमातल्या एका बाईने एकदा त्याला सांगितलं होतं तू शेवंताचा मुलगा हाईस, तिला तिच्या होणार्‍या बाळाला त्या तसल्या म्हणजे देवदासींच्या वातावरणात वाढवायचं नव्हतं मग मुलगा असो की मुलगी ती नाळ तोडून टाकायला तयार होती
आणि तेंव्हाच मी सुद्धा नवर्‍याच्या जाचाला कंटाळून पोटच्या तान्ह्याला टाकून  पळाले  होते,पोराच्या ममते पुढे नवर्‍याचा मार असह्य झाला होता , दारची विहीर जवळ करण्यापेक्षा मी गावाची वेस ओलांडली पाय फुटेल तिथे पळत होते अशावेळी एका गावाबाहेरच्या हौदावर तुझी माय भेटली, मी परिस्थितीने मोडून पडलेली अन ती? कुणाचा आधार नसताना बी ताठ कण्यानं उभी असलेली
 तेंव्हा तिचं बाळंतपण  जवळ आलं होतं
मला तात्पुरता आश्रय हवा होता आणि तिला तिच्या  जगापासून  लपवून बाळाला जन्म द्ययचा होता
आम्हाला नियतीने भेटवलं होतं म्हणून आम्ही दोघी एकमेकीच्या सोबतीने भुरटीला एकमेकीच्या सोबत राहिलो, तुझा जन्म झाला आणि तू वर्षाचा असताना तुझी माय आपण दोघे गाढ झोपेत असताना आपल्याला सोडून पळून गेली ती पून्हा परतलीच नाही
तिने तिचे दहा तोळ्याचे दागिने मला दिले होते त्यावर आपण चार वर्ष काढली, मग ओळखीने या आश्रमात मी कामाला लागले , मान्य आहे! काबाड कष्ट करावे लागतात पण आपल्याला  हितं आश्रय मिळाला
दोन वेळेला पोटाला अन्न आणि अंगावर पांघरुण मिळालं,मुख्य म्हणजे तुला शिक्षण भेटलं तुझ्या मायची फार आस होती, जो जल्माला येईल त्यानं चार बूकं शिकावं मोठं व्हावं  इथे तुला माझा मुलगा मानतात, मी सुद्धा तुला माझाच मुलगा  मानते म्हणजे तू माझाच मुलगा आहेस
पण मी हे लपवलं तर शेवंतावर अन्याय होईल, वर्षाच्या मुलाला असं माझ्या ओटीत टाकून निघून जायला तिला किती यातना झाल्या असतील हे एक स्त्री म्हणून मीच जाणू शकते
कारण मी सुद्धा माझ्या लहानग्याला अशीच खाटेवर टाकून पळाले होते
तू मोठा झालास की माझ्या साठी इतकच कर माझ्या लहानग्याचा शोध घे
तुझ्या आईचा शोध घेण्याच्या भानगडीत पडू  नकोस... ज्यांचं घर असतं त्यांचा शोध लागतो
ज्याना आसरा मिळत नाही ते वाळक्या पानासारखे ....
तो मोठा  होता होता मावशी पण थकली म्हातारी झाली, त्याला आश्रम सोडावा लागला असता पण मावशीच्या वशिल्यामुळे त्याला आवारातच कर्मचार्‍यांच्या वस्तीत दोन खोल्या मिळाल्या, आश्रमातच कारकून कम प्रार्थमीक वर्गावर शिक्षकाची नोकरी मिळाली , मिळालेली नोकरी त्याने तात्पुर्ती स्विकारली नाहीतर समाजशास्त्र घेऊन तो एम ए  झाला होता  त्याला डाँक्टरेट मिळवायची होती
त्याला कलेक्टर व्हाअय्चं होतं पण मावशी साठी त्याने स्वत:ला आवर घातला , पण एका हिवाळ्यात मावशीला निमोनिया झाला आणि आधीच थकत चलालेली ती कुडी याच्या मांडीवर डोकं ठेऊन स्वत:च्या लेकराला आठवत हे जग सोडून गेली
मग काही दिवस राहून प्रल्हादनेही  तो आश्रम सोडला
आणि आश्रमातून आलेला मुलगा ही नवी ओळख त्याला चिकटली, ती त्याच्या सवयीची नव्हती
किती शिकला सवरला बढती मिळवली तरी ही कुजबुज पाठ सोडत नव्हती
म्हणून या गावात आल्यावर त्याने गावाबाहेरची ही फारशी वर्दळ  नसलेली हवेली  राहयला स्विकारली, दोन दिवसात काही जुने ऋणानुबंध असावेत तसा तो तिथे रमला
ही हवेली कोणी विकत घेत  नव्हतं किम्मत ही फार नव्हती तरी लोक का पाठ फिरवतात ? हे त्याला कळत नव्हतं त्याचा शिपाई म्हणाला साहेब परसात कोरडी विहीर असेल तर ती वास्तू कोणी विकत घ्यायला जात नाही , कारण कोरड्या विहिरीत आतृप्त आत्मे असतात ते मालकाला सुखाने जगू देत नाहीत असा समज आहे  पण तुम्ही काळजी करू नका आपण ती विहीर  बुजवून टाकू म्हणजे प्रश्नच मिटला
बुजवून प्रश्न सुटत नाहीत तो स्वत:शीच म्हणाला उलट शेपूट  ठेऊन जातात
माझी ओळख मी कर्तबगार असून सुटली नाही , शेवंता माझ्या आईचं नाव ते मी उच्चारू शकत नाही
जिने मला  मायेनं वाढवलं ती स्वत:ला अपराधी समजत या जगातून गेली, माझ्या मांडीवर तिचं डोकं असताना ती तिच्या लेकराला आठ्वत या जगातून गेली मी पून्हा तसाच राहिलो  अनाथ
 इथे तृप्त आहे कोण?
मग त्य अतृप्त आत्म्याना आपण का घाबरायचं ?
नामदेव दुसर्‍या दिवशी येऊन ती विहीर बुजवण्याचं काम सुरू करणार होता , ती कोरडी विहीर बुजवायला बारा गाड्या भरून माती लागणार होती टेमलाईच्या टेकडीवरची माती आणायची ठरली ,
आता सरकारी साहेबाचं काम म्हंटल्यावर जो तो हातभार लावायला तयार झाला
आणि हा सरकारी साहेब आदल्या रात्री त्या कोरड्या विहीरीपाशी  आला, बाहेरच्या पेक्षा दहा पटीने काळोख विहीरीत दाटला होता , त्याने काय विचार केला , बरोबर आणलेलं लोटाभर पाणी विहीरीत ओतलं ,  नमस्कार केला म्हणाला आधीच ही विहीर कोरडी त्यात आपली अतृप्ती सकट तुम्ही यात पहुडलेले
मी प्रार्थना करतो तुम्ही या विहीरीतून बाहेर या आणि माझ्याबरोबर या हवेलीत रहा , मलाही कोणी नाही
अन तुम्हालाही कोणी नाही
आणि काय आश्चर्य कोरड्या विहीरीतून जाणवेल इतपत झुळून उसळली आणि त्याला वेढून पार झाली
काळोखात डचमळलेला काळोख त्याला जाणवला तो घाबरला अजिबात नाही
हरखला जरा, कोणीतरी आपल्या हाकेला साद दिल्याचा तो आनंद होता .
ठरवल्या प्रमाणे ती विहीर बुजवली गेली त्याचवेळी हवेलेचीही डागडुजी करण्यात आली, आदीवासी पाडे भ्वती खूप होते त्यामुळे इथून बदली लगेच होण्याचे चांसेस खूप कमी होते
आश्रमातून आलेल्या मुलाने केलेली ही प्रगती बघून अनेकाना मनोमन कौतूक वाटायचं पण उघड व्यक्त  होणं त्या काळात जमायचं नाही
पण नंतर गम्मत घडायला लागली कोणी हवेलीवरून जाताना बघितलं तर प्रल्हादच्या आईच्या वयाची शोभेल अशी सवाष्ण बाई  अंगणात वाळवणं  नाहीतर दळण कांडण करताना दिसायची
तुम्ही कोण विचारलं तर हसतमुखानं म्हणायची कोण म्हणून काय पुसता लेक सुनबाई आणे पर्यंत मीच या घराची मालकीण साहेबांची आई हाये मी घर लाऊन द्यायला अल्येय
ऐकणारा चकीत व्हायचा पर आम्ही तर कय भलतच ऐकलं की सायबांबद्दल
काय ऐकलत? ह्येच ना आश्रमातून आलायेत म्हणून? मग बरोबरच हाय.. आश्रमाच्या शाळेतच शिकली हाईत माझी पोरं आमचे मालक विनोबांचे भगत ना हो, म्हणून आश्रमाच्या शाळेत धाडलं दोघाना
दोघं कोण? साहेब येकटेच हाईत ना?
तर तर तुम्हास्नी ठाऊक की मला ? सायेब थोरलं  धाकटी भैन हाय की ती बी आता मेट्रीकला बसल
म्हनजं घरंदाज म्हणायचं की साहेब
हे असले घरंदाज  वगैर आमच्यात मानत न्हाईत बघा, विनोबा मानसा कडं मानूस म्हणून बघाया लावतात
या वक्ताला मालक असते तर तुम्माला चांगली पट्टी पढवली असती
मग ते दिसत न्हाईत कुटं ?
ते बुधगावला असत्यात पुन्याजवळ आश्रम त्येच चालवतात
हे झालेलं संभाषण गावात पसरायला वेळ लागला नाही , मग खरं खोटं करायला कोणी आलं तर कुणाला साहेबांची रेखीव देखणी बहीण भेटायची नाहीतर घरंदाज सुस्वरूप आई
आश्रमातल्या प्रल्हादला हे कळेचना... अचानक लोकांचा दृष्टीकोन कसा बदालला
साहेब मुळात अबोल त्यात आलेल्या अनुभवातून जरा जास्तच अंतर राखून राहणारा ...तरी एकदा एकाने धाडस केलच म्हणाला सायेब तुम्ही इतके भले दिसताय? मग कशाला त्या वंगाळ माणसाची हवेली विकत घेतलीत?
प्रल्हाद म्हणाला का? काय झालं? चांगली आहे की हवेली
मला काही त्रास नाही
तसं नाही अव्वो  या हवेलीचा माणूस लै सैतान वृत्तीचा लग्नाच्या बाईला असा झोडपायचा कंटाळून तान्ह पोर टाकून पळाली बघा
मग त्या लहानग्याचे हाल सुरू झाले, मग कुठूनशी शेवंता नावाची साध्वी बाई आली बघा त्यानं  मुलाला सांभाळायला या बाईला ठेऊन घेतलं पर त्याचा डोळा होतच तिच्यावर
ती ऐकना म्हंटल्यावर पोटच्या पोराला विहिरीच्या काठावर उभ राहून  विहिरीत टाकायची धमकी द्यायला लागला बघा त्या गडबडीत पोर सुटलं अन विहिरीत पडलं त्याला वाचवायला त्या साध्वीनं बी उडी मारली पाण्यात दोघं बी गेले... तो हैवान गेला पळून ...प्रल्हाद गोष्ट ऐकत राहिला
आणि आपण एका साध्वी बाईच्या पोटी जन्म घेतलाय म्हणजे आपण घरंदाजच आहोत याची त्याला खात्री पटली, ज्या मावशीने आपल्या मांडीवर डोकं ठेऊन शेवटचा श्वास सोडला
तिच्या हवेलीला आपण जिवंत केलं याचं त्याला समाधान वाटलं अन आईच्या आठवणीने तो कोरड्या विहिरीच्या ढिगार्‍यावर बसून खूप खूप रडला  कधी काळापासून कोरडी पडलेली तिथली माती ओली झाली
तरी गेल्यावरही आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं हे त्याला कधीच कळलं नाही .







Comments

  1. समजून घ्यायला वेळ लागला .. 😍 पण सॉलिड story! मामा 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी