शुभमंगल

एकवीस मार्च उजाडणार म्हंटल्यावर गेली बारा वर्ष झाली मी फारच बेचैन होतो.. मै किसिको मूह दिखानेके काबील नही रहाँ असं हिच्या धाकाने म्हणत नाही इतकच 
माझी तशी काही चूक नसताना ही बोच मला लागून राहीली अहे हो ... तसा मी साधा सरळ माणूस नाका समोर बघून चालणारा(नशिबाने नाकही सरळ आहे,मोठ असलं तरी)मग नक्की झालं काय? 
काही नाही हो लग्नाचा मौसम होता एका लग्नाचं निमंत्रण होतं... आहेर द्यायचा होता की नाही आठवत नाही.. कारण जे आठवतय तेच इतकं भयंकर आहे की...
मला लग्नाला जायचं म्हणजे जेवायला जायचं इतकच माहीत पण ही म्हणाली मूहूर्त महत्वाचा... आपल्या हाताने वर वधूच्या डोक्यावर अक्षता पडायलाच हव्यात... म्हणून मुहूर्त साधून हाँलवर पोहोचलो तर तिथे अक्षता वाटायची नवीनच पद्धत दिसली मूठभर अक्षता हातात देऊन एकदाचं मोकळं व्हायचं की नाही? तर नाही !क्रेपच्या नाजूक गुलाबी केशरी कागदात अक्षतांची पूडी बांधली होती भरीस भर म्हणून हळदीत बुडवलेल्या धाग्याने ती पूडी बांधलेली होती
मुळात मला सा~~वधा~~न या शब्दावर अक्षता टाकायचं टेंशन असतं खर सांगू का? टेंशन हा माझा कायम मेन प्राँब्लेम राहिलाय शाळेत असताना कवायतीच्या वेळी टाळ्यांचा ठरलेला ठेका असायचा ठाक टाक ठाक...ठाक ठाक ठाक..ठाक ठाक ठाक..ठाक ठाक त्यात ही माझी शेवटची एक्स्टाँ टाळी वाजायचीच. सर म्हणायचे "गोखले तुझा प्राँब्लेम काय आहे?" प्राब्लेम हाच ! टेंशन.अमूक एक गोष्ट अमूक वेळाच करायची की मला टेंशनच येतं.. नशिब माझं एकदा लग्न झालं होतं तेंव्हा मला अक्षता टाकायच्या नव्हत्या... खरं सांगू का? पालथ्या घड्यावर पाणी आणि डोक्यावर अक्षता यात विशेष फरक नाही, कितीही लोक ओरडले सावधान तरी त्याचा काही उपयोग नसतो असो,तर माझ्या हातात पुडी होती, पुडीत अक्षता होत्या पण काही केल्या त्या पुडीची
गाठ सुटता सुटेना एरवी हिचं लक्ष असत माझ्याकडॆ . हिने पाहिलं असतं तर पटकन् गाठ सोडवून पुडी चटकन माझ्या हातात सरकवली असती..
पण तसे होणे नव्हते...मंगलाष्टकं वेगाने पार पडत होती आणि माझ्या पूडीची गाठ सुटायला तयार नव्हती..सावधान शब्द कानावर आदळला आणि कसलं टेंशान आलं कोणजाणे मी हातातली पूडीच नवरदेवावर भिरकावली (मुलाकडून होतो ना) एरवी कधी कुठ्ठे कुठ्ठे म्हणून नेम बसायचा नाही पण त्या दिवशी हातून सुटलेल्या पूडीने भलतच मनावर घेतलं आणि नवर देवाचा
गालच गाठला पचाक्कन...खरं सांगतो तो पच्याक असा आवाज माझ्या कानात घुमला आणि मग मनात घुमत राहिला... या दोघानी पळून जाऊन का लग्न केलं नाही? असा दुष्ट विचारही माझ्या मनात आला.
हातात वरमाला होती म्हणून तो बिचारा गाल चोळू शकला नाही आणि हिच्या धाकामुळे मी पळून जाऊ शकलो नाही पण त्याची शोधक नजर माझ्यावर कशीकोण जाणे स्थिरावली आणि झाला प्रकार मी नाकारू शकलो नाही. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी वरवधू सोबत फोटॊला हसत्मुखा्ने(?)उभं राहवं लागलं पण तेंव्हाही तो माझ्याकडेच रोखून बघत होता आणि मी श्वास रोखून उभा होतो तेंव्हापासनं माझ्यापुरत्या अक्षता मी घरून घेऊनच जातो. ही तांदूळ निवडायला बसली की दोन मुठी तांदूळ खास माझ्यासाठी.कारण नं जाणो आणखी कुठे लग्नाला गेलो आणि तिथे चांदीच्या डबीत अक्षता वाटल्या वर कल्प्कता वापरून ती डबी उघडायला नखाएव्हढी किल्ली दिली.. तर? पुडी परवडली तिचा फक्त पच्याक आवाज झाला जो मला ऐकू आला पण डबीचा आवाज कसा येईल? किती येईल?त्या मुळे एकवीस मार्चचा हा धडा म्हणून..दर एकवीस मार्चला मी उगाळतो..

Comments

  1. पुन्हा पुन्हा वाचली तरी तितकीच गंमत येते

    ReplyDelete
  2. khup hasayala ale gokhale kaka

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी