पाडवा

काही बातम्या कनात कुजबुजल्या की त्यांचं महत्व वाढतं, गांभिर्य मनावर ठसतं असा ठाम समज अहे
म्हणूनच गुड्डीचं लग्न मोडलं हे दादरकर बाई अगदी उमाच्या कानाशी बसून सांगत होती... याला झाली असतील दोन अडीच तीन वर्ष... पण तो दादरकर बाईंचा अविर्भाव आणि उमाचा झालेला चेहरा मी कधी विसरू शकत नाही.. उमा लग्न होउन आली तेंव्हा गुड्डी असेल अशीच तीन वर्षांची तिला मी बुढ्ढी म्हंटलं की तिला खूप राग यायचा.. लहानपणापासून तिला दांडगी समज..
एक सिक्रेट होतं तिला दात उशीरा आले आणि अजून दोन दातांचा तर पत्ताच नव्हता शेवटी छोटी सर्जरी करून त्या दाताना अवतिर्ण होण्यास मदत करवी लागली म्हणून मामा आपल्याला बुढ्ढी म्हणतो इतक्ं त्या लहान जिवाला कळायचं पण मामीच्या गळ्यात पडून भोकाड पसरलं की मामी मामाला खोटं खोटं रागवते हे तिला कळायचं नाही
पण उमा म्ह्णते मी खोटं रागवायचेच नाही मुळी.. मला खरच तुमचा राग यायचा बाहुली सारखी गोड मुलगी तिला काय बुढ्ढी म्हणायच?
आणि पाटणकरांची ही धाकटी बया होती मात्र खरच गोड.. आणि गोड मुलीची सूंदर मुलगी कधी झाली हे आम्हाला कळलच नाही
आम्ही जितकी घरं बदलली तितक्या घरात ही बया राहून गेली आणि या ना त्या कारणाने उमा कडून मला ओरडा खायला लाऊन गेली
आम्ही घाटकोपरला राहत होतो तेंव्हाही ही घरचा पाडवा सोडून आमच्याकडॆ खास गुढीपाडव्याचं जेवायचं म्हणून राहयला आली पण तेंव्हा आम्ही घरी थांबणार नव्हतो आमच्या शेजारच्या वागळे वहीनी आम्हाला नवंवर्षाची शोभायात्रा दाखवायला त्यांच्या माहेरी घेऊन जाणार होत्या, कारण नव वर्षाच्या स्वागताची शोभायात्रा हा प्रकारच तेंव्हा नवीन होता
रस्ताभर रांगोळ्या तरूण मुलांचे मेळावे त्यांचे नाच लेझीम, ढोल ताशे.. सगळच मग आता एखादी शाहणी मुलगी म्हणाली असती की ठीक आहे मी जाते घरी किंवा एखादी वेडी मुलगी म्हणाली असती आता मी आलियेनाsss तुम्ही दोघानी कुठे जायचं नाही
पण हे आमचं पडलं अगाऊ आमच्यापेक्षा शोभायात्रा बघायचा तिला उत्साह दांडगा
आमच्या वागळेबाई सुद्धा भारी प्रेमळ मायाळू आमच्यापेक्षा गुड्डीला घेऊन जायचं त्यानीच ठरवून टाकलं
आणि आम्ही तिघं वागळे बाईच्या माहेरी जाऊन थडकलो.. तसे लवकरच गेलो होतो पाहटेची झूंजूमुंझूची वेळ उमानी गुड्डीला नाहयला घातलं होतं काही म्हणा आपल्या वांगमयात नाहून आलेल्या मुलीचं वर्णन जरा मुक्त हस्ताने करतात ते काही चुकीचं नाही तात्पुरती का होईना पण एक जादू त्यांच्यात संचारते खरी..
तर अशी ही नवलपरी घेऊन आम्ही वागळ्यांच्या घरी पोहोचलो आणि गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर गुड्डीची प्रेमकथा सुरू झाली
झालं असं की वागळे बाईंचा शंतनू आधीच तिकडे शोभायात्रेच्या सरावा साठी गेला होता.. झुंजूमुंजूच्या प्रकाशात ही नाहून आलेली पहाट त्याने बघितली आणि तो केलेला सराव विसरला हो! त्याच्या मनाने वेगळाच ताल धरला वेगळेच सूर याला ऐकू यायला लागले.. उमाला नावाने हाक मारणारा हा आमचा एक्मेव पुतण्या.. छ्याss हिला काय काकी म्हणायचं ? असं तो म्हणाला आणि हो की नाही काका म्हणत माझी संमती घेतली म्हणजे थोडक्यात काय तो ही आम्हाला परका नव्हता
पण कधी कधी वारुळातल्या मुंग्या पायावर चढून चावे घेत नाहीत तो पर्यंत आपल्याला पत्ता लागत नाही तसं झालं
शोभायात्रा एका दिवसाची पण मग या ना त्या कारणाने गुड्डीच्या यात्रा आमच्याकडे सुरू झाल्या तशी ती लहानपणापासून हिचा पदर धरूनच असायची त्यामुळे शंका येण्याचं कारण नव्हतं
पण दोघे एकदा बाईकवरून पडले दोघाना जरा लागलं तो तिला घेऊन घरी आला आणि आमच्यावर मलम पट्टी करायची वेळ आली
कुठे पाटणकर कुठे वागळे.. काही मेळच नव्हता
शंतनूचे वडील एका वर्तमानपत्रात अकांउंटंट होते वागळे वहिनी शिक्षिका.. शंतनू इंजिनियर होणार होता पण ते ही त्याच्या मामाच्या मदतीने
वागळ्यांची परिस्तिथी खाऊन पिऊन सुखी त्यात सूख मानण्याची सवय अंगवळ्णी पडलेली त्यामुळे ओढाताण कधी जाणवलीच नाही
शंतनूसुद्धा अगदी तसा गुणी पण तरूण वय त्यात दिसायला हजारात उठून दिसेल असा मग थोडं ्हुडपण येतच ना? त्याच्या दृष्टीने जे आवष्यक ते वागळ्यांच्या दृष्टीने नसती चैन
या विरुद्ध पाटणकरांचं घर, .. घर म्हणजे टुमदार बंगला
पाटणकरांचा स्वत:चा बिझनेस पाटणकर हजाराचे पोशिंदे... अक्षरश:मुंग्या डसायला लागल्या सारखं झालं, मला माझं लग्न जमवायचं इतकं टेंशन आलं नाही तितकं पपांसमोर विषय काढायला मी घाबरलो म्हणजे त्याला मी अरे तुरे करतो हेच विसरलो.. शेवटी तोच म्हणाला अरे काय झालय ? अहो जाहो का करतोय्स? मग मी भानावर आलो
पण या श्रीमंत लोकांचं आपल्याला कळत नाही तसं झालं कारण पाटणकराला गुड्डीच्या शोभायात्रेचंसगळं सिक्रेट माहीत होतं त्याने शंतनूची माहीतीही काढली होती आणि त्यांच शंतनू बद्दल चांगलं मत होतं
तो म्हणाला अरे बाब मुली मोठया झाल्या की अशी खबर ठेवावी लागते.. मोठीची काळजी नव्हती रे हे तुमचं येडच काय करेल याचा नेम नव्हता
मग सगळं रीतीला धरून झालं आम्ही गुड्डीसहं तिच्या आई बाबाना घेऊन वागळ्यांकडॆ गेलो... जुजबी बोलणी झाली आणि लग्न ठरलं त्यात दुसरा गुढी पाडवा गेला मग त्या शोभायात्रेला दोघं जोडीने नाचली जोडीने ताल धरला त्या शोभायत्रेचे स्वयंघोशीत नायक नायिका होते
आणि नायक नायीका म्हंटलं की कथा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांना स्वत:ला घ्यावी लागते, इथे आपला नायक जरा बिथरला
दैव असं की तेंव्हाच त्याला नोकरी लागली ते ही सरकारी खात्यात.. पगाराचा पैसा हातात यायला लागला, लग्न नवीन ठरलेलं त्यात पाटणकरांचा रुबाब तो बघत होता आणि कळत नकळत तो त्यांच स्टँडर्ड जपायला लागला, वागळे काकाना कळत नव्हतं असं नाही पण बोलायचा त्यांचा स्वभाव नव्हता
आणि उधळलेलं कोकरू जसं अलगद जाळ्यात सापडतं तसा हा डिपार्टमेंटच्या बदमाश लोकांच्या नजरेत भरला त्यानी लगेच त्याला हातशी धरला आणि नको ते पाठ शिकवले, गैरव्यवहार त्याच्या थ्रू पूर्ण व्हायला लागले, याच्या हातात पैसा खेळायला लागला, महागडी गिफ्ट्स, महागडी हाँटेल्स,
... आम्ही म्हणायचो शंतनू हे काय चाललय?
नाकापेक्षा मोती जड ही म्हण् तुझ्या बाबतीत लागू होत नाही तू का असा वागतोयस? त्यावर त्याचं ठरलेलं उत्तर साईड बिझनेस सुरू केलाय... चांगला जम बसेल असं वाटतय.. गुड्डीला तिचा चाँईस चुकला असं वाटायला नको
पण हा साईड बिझनेसच त्याच्या गळ्याशी आला आणि लग्नाच्या बेडीत अडकायच्या आधी त्याच्या हाताला पोलिसानी बेड्या ठोकल्या वागळे काका मधे पडायला तयार नव्हते या बातमी मुळे पाटणकरांची खूप बदनामी झाली
म्हणून दादरकर बाई अगदी उमाच्या कानशी बसून सांगत होती गुड्डीचं लग्न मोडलं
मग यथावकाश केस उभी राहिली त्याला शिक्षा झाली न्युझ चँनलल्नीही ही बातमी उचलून धरली, वागळे काकानी अंथरुण धरलं वागळे वहिनींची तब्येत ढासळली त्यांचा भाऊ आला आणि दोघाना घेऊन गेला
आता हे लग्न मोडल्यातच जमा आहे असं दादरकर बाईला वाटणं साहजिक होतं
पण तसं झालं नाही, पाटणकर समजुतदार होते संयमी होते शंतनू गांगरला हे त्यानी ओळखलं आणि शेवटी जे केलं ते माझ्या मुलीसाठी केलं याची त्याना जाण होती, जेंव्हा त्याला सोबतीची जास्त गरज आहे तेंव्हाच त्याला एकटं टाकायचं?अशानं तो कधीच हाताला लागणार नाही, पकडला गेला म्हणून गुन्हेगार, पकडलाच गेला नसता तर? ते जास्त डेंजरस असतं माझ्या मुलीसाठी.. पाटणकराच्या विचाराने आम्ही सुखावलो होतो पोरासाठी आमचाही जीव तुटत होता
आम्ही आज गुड्डीला भेटायला गेलो तेंव्हा दादा म्हणाला वेळ असेल तर तुम्हीही चला आमच्याबरोबर उद्या पाडवा आहे तसा पोरगा हळवा आहे एकटा कुढत बसेल आपण जाऊन भेटून येऊ येरवड्याला .. मी परमिशन काढली आहे , तसा तो सुटेल आता थोड्या दिवसात मग लगेच लग्न उरकून घेऊ दोघांच थोडे दिवस जमशेद्पूरला आमच्या मोठया जावयाबरोबर काम करेल मग बघू तो काय म्हणतोय?
गुड्डी कडे बघितलं तर ती बुढ्ढी सारखी कोपर्‍यात बसली होती.. मी नुसतं बुढ्ढी म्हणायचा अवकाश ती उमाच्या गळ्यात पडून मुसमुसून मुसमुसून रडायलाच लागली
आमचीही अवस्था वेगळी नव्हती

Comments

  1. मस्त..शेवटी positive attitude महत्वाचा :)

    ReplyDelete
  2. पाटणकरांसारखे मोठे मन सगळ्यांकडे नसते. Hats off for him.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी