अजब प्यार की....गजब कहानी

 मी दादर माँडेल ला फाउंडेशन कोर्स साठी प्रवेश घेतला म्हणून पद्माकर शिल्ले माझ्या परिचयाचा झाला
मी फायनली फी भरायला त्या इमारतीत गेलो तेंव्हा सगळ्यात आधी हाच भेटला
काळा सावळा म्हणायची पद्धत  म्हणून म्हणायचं , नाहीतर काळाच
मुंबईबाहेरचा आहे हे बघताच लक्षात येईल असं व्यक्तीमत्व,गरीबी पण लपवता येणार नाही अशी
त्यातल्या त्यात धड कपडे घालून तो कशीबशी जमवलेली फी भरायला आला होता
तो गरीब होता, गावाकडनं आला होता , तसा साधाच बिच्चारा वातेल असा होता, पण त्याच्या डोळ्यात स्वप्न होती त्यावर  कशाचंही सावट नव्हतं , भीती नव्हती , आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशाबद्दलही शंका नव्हती त्यामुळे पद्माकर वेगळाच  होता
हातात असामान्य  ओघवती रेष होती आणि गावात आयुष्य गेल्याने कायम ब्राईट कलर्स तो चित्रासाठी निवडायचा एखादा माणूस सगळ्यांचा आवडता होऊन जातो ना तसा पद्माकर झाला होता
आमची मैत्री तर पहिल्या भेटीतच झाली होती , त्याचं विलक्षण सूंदर हस्ताक्षर बघून मी अवाक झालो होतो
आणि त्याच्या चेहर्‍यावरचं हासू म्हणजे मला अगदी निर्मळ आनंदाचा झरा वाटून गेलं होतं
काँलेज सुरू झाल्यावर फार लवकर त्याने नं सांगता  त्याची परिस्थीती आमच्या लक्षात यायला लागली आणि कोणी नं सांगता प्रतिभा मेधा त्याच्यासाठी दुपारचा डबा आणायला लागल्या
मराठे सर त्याला लागणारी सामुग्री न बोलता पुरवायला लागले , एकूण सगळं सुरळीत सुरू होतं , तो उत्तम चित्रकार आहे तितकाच उत्कट कलाकार आहे हे आम्ही एकमताने मान्य केलं होतं
पण पद्माकर कुठे राहतो कुठून येतो हे कळायला मार्ग नव्हता ,  गावाहून त्याची पत्र यायची ती काँलेजच्या पत्त्यावर , पण पत्र सारखी यायची  काँलेज एक ते सात असल्याने बरेचदा पत्र त्याच्याच हातात पडायची
इतकी पत्र कशी येतात याचं आम्हालाही अप्रूप वाटायचं
खूप कमी बोलायचा, हसायचा जास्त त्यातही कधी कधी उगाच
एकदा मेधा त्याला म्हणाली तू असा उगाच नको हसत जाऊस फार केवीलवाणा दिसतोस
तेंव्हा त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं , हुंदका अडवण्यात तो यशस्वी झाला  होता पण त्याचं गुदमरणं तो लपवू शकला नाही
मग तर आम्ही त्याला मोकळा़च सोडला आणि तो मोकळा झाला , मैत्री म्हणजे काय हे त्याचं त्यालाच कळलं
होतं मग त्यानेच सागायला सुरुवात  केली
निपाणी जवळ कोरडयी गावातून आला होता घरची गरीबी, वडील  शाळा मास्तर, ही चार भावंड, भावंडात हा दुसरा,  दहावीपर्यंत पोहोचून दहवी पास झालेला पहिला
आणि  शिकण्यासाठी मुंबईला पळून आलेलाही हा पहिलाच
इथे खांडके बिल्डींग मधे एका सोनाराच्या पेढीवर त्याच्या गावचा एक कारागीर होता त्याच्या ओळखीने रात्री पथारी पसरायला आणि त्याच्या दोन ट्रंका ठेवायची सोय झाली होती
त्या बदल्यात त्याला रोज सकाळी पेढी झाडावी लागायची आणि पाणी भरावं लागायचं
 त्याच्या बद्दल एक एक कळत असताना एक धक्कादायक गोष्ट कळली म्हणजे पठ्ठयाचं जमलं होतं
त्याच्याच गावातली त्याच्या बहिणीची  मैत्रीण   नलीनी कोरडयीकर त्याची भावी पत्नी होणार होती, मुंबईला पळून येताना त्या काळात त्याच्या हातात दोन  हजार रुपये ठेवायची हिम्मत तिने दाखवली होती
संपले की सांग अजून पाठवते असं ती छातीठोकपणे म्हणाली होती
हा एकच प्राँब्लेम होता ती तालेवार घरातली होती , दोघी बहिणी गावात राजकन्या म्हणूनच ओळखल्या जायच्या, तशी साधी माणसं तरी पद्माकर सारख्या मुलाला जावई म्हणून स्विकारणं कसं शक्य होतं ? तो पण नको त्या अपेक्षा ठेवत नव्हता
फाउंडेशनचं वर्ष हां हां  म्हणता  संपलं आणि  आमचा ग्रूप विखुरला कोणी रहेजाला गेलं कोणी जे जे ला तर कोणी रचनाला पण पद्माकरच्या काळजीने आम्ही एकत्र राहिलो
आता त्यालाही जरा  पाँवर आली होती आमच्या कामावरून, कामचुकार वृत्तीवरून तो आम्हाला ओरडायला बिरडायला लागला होता  प्रतिभा त्याला पंतोजी म्हणायची
पण त्याच्या शिस्तीमुळे आमच्या कामाला शिस्त आली हे आम्ही सगळेच अजूनही  मान्य करतो
दोन तीन वर्षांचा काळ असा निमूट सरकला आणि आमचे पद्माकर साहेब जरा अस्वस्थ दिसायला लागले
आम्ही सगळे  आठवड्यातून दोनदा तिनदा दादरला भेटायचोच
त्यात पद्माकर बरेचदा माझ्याकडे राहयला यायचा त्यामुळे मी फार लवकर त्याच्या अस्वस्थतेत सहभागी झालो, कुणाला सांगू नको कुणाला सांगू नको असं तो म्हणत होता आणि नाही सांगत नाही सांगत मी सगळ्याना सांगत होतो नलीनीच्या घरी आता स्थळं बघायला लागलेत, ती बारावी पास झाली म्हंटल्यावर घरचे थांबायला तयार नाहीत, आता आपल्या हिरोलाच काहीतरी पाऊल उचलायला हवं
असं आम्ही म्हणत असलो तरी  प्रत्यक्षात ते शक्य  नाही याची आम्हालाही कल्पना होती, फायनल इयरची परिक्षा अजून व्हयची होती , छोटी मोठी कामं तो घेत होता पार्ट टाईम जाँब करत होता पण तेव्हढ्याने तो फक्त आईच्या हातात तुटपुंजे पैसे  पाठ्वून तो इथला खर्च काटकसरीने भागवत होता
त्यातही  त्याचे कपडे धुवायला  माझ्याकडे असयाचे, महत्वाचे कागदपत्र, असायन्मेंटच वर्क माझ्याकडे असायचं  माझ्या घरचे सुद्धा त्याला फार प्रेमाने सांभाळत होते
पण तरी लग्न करण्यासाठी ते पुरेसं नव्हतं
फायनलची परिक्षा पार पडली आणि निकाल हातात पडायच्या आधीच पद्माकरला एका छोट्याशा एजंसीत जाँब मिळाला आता दर  महा एक ठरावीक रक्कम त्याच्या हातात येणार होती
ही गूड न्युज गावाला कळवल्यावर नलीनी त्याच्या मागेच लागली मी घरी आपल्या बद्दल सांगते
तू घरी येऊन अण्णाना भेट
तेव्ह्ढं धाडस पद्मकार मधे नव्हतं
नलीनीच्या घरच्यानी राग धरला तर गावाला आपल्या घरच्यांचं जीणं कठीण होऊन बसेल याची त्याला भिती होती आणि धाडस दाखवण्यात नलीनीने पहिला नंबर पटकवला
   तीस डिसेंबरला भल्या सकाळी  आमच्या घरची बेल वाजली , नशिबाने पद्माकर आमच्याकडेच राहयला होता आम्ही दोघे गाढ झॊपेत होतो आणि स्फोटकानी भरलेली लाँरी घरावर आदळावी तशी
नलीनी  आमच्या दारात उभी राहिली
आई म्हणते कोणी नं सांगता मी ओळखलं ही तीच असणार
आईच्या मते इतकी सूंदर मुलगी तिने या आधी पाहिली नव्हती
निमगोरी असली तरी आईला ती हीमगौरी वाटली सोज्वळ सौंदर्य काय असतं ते आई बघत होती
भीतीपोटी नलीनीच्या तोंडून शब्द फुटत  नव्हता
पळून येतानाचं आवसान आता पूर्ण गळून  गेलं होतं , आता दार उघडल्यावर काय प्रतिसाद मिळतोय  यावर तिची भिस्त होती
आईने मायेने विचारलं तू नलीनी ना?  आणि पाया पडायला  वाकलेली नलीनी आईच्या कुशीत जवळ जवळ कोसळली
म्हणाली गावात राहिले असते तर अण्णानी अन काकानी माझं लग्न लाऊन दिलं असतय
हा काहीच बोलना म्हणून मी आले, आईने तिला बसवलं पाणी दिलं अगदी योग्य केलस म्हणून  तिला हमी दिली , ती जरा निर्धास्त झाली
आई आम्हाला उठवायला आली
पद्माकर म्हणाला आई झोपुदे ना जरा आज सुट्टी आहे
आई म्हणाली सुट्टी असुदे पण आता तुझी सुटका नाही, तुझ्या नावानं  वाँरंट आलय
आम्ही दोघे दचकलो, काही टोटलच लागेना
आई म्हणाली बाहेर येऊन बघा, आईच्या मागे जाताना मधला पँसेज पार होता होईना
आणि हाँलमधे नलिनीला बघून   पद्माकरला सगळं ब्लँक अँड व्हाईट दिसायला लागलं
तू? असं तो किंचाळला
इतकं सलग कानडी तो  इतक्या वर्षात पहिल्यांदी बोलला
आईनी दोघाना शांत  केलं
 आता काय तो निर्णय घेणं जरुरीचं होतं
नलीनीने आपलं सामान सोडलं रीतीला  धरून तिने त्याही परिस्थीतीत मोतीचुराचे लाडू आणले होते
पद्माकरला आवडायची त्या पाल्याची भाजी आणली होती
आई म्हणाली मुलगी संसार चांगला करेल
अए पण संसार करायला एक आसरा लागतो
आणि मुंबईत आसरा शोधायचा म्हणजे ? ते ही रिकाम्या खिशाने? नुसतीच वण वण
पद्माकर मान्य करत नसला तरी नलिनीच्या येण्याने त्याला उभारी आली होती
कोणीतरी आपल्यासाठी आपल्या भरवशावर आयुष्य पणाला लाऊ शकतो ही भावनाच किती ग्रेट आहे ती नात्या बरोबर आपल्यालाही ग्रेट करून टाकते
दोन दिवसात नलीनी घरात रमली फार क्वचीत घरच्या आठवणीने ती व्याकूळ वगैरे व्हायची नाहीतर बाकी आपल्या संसाराची सूंदर स्वप्न बघण्यात रमायची
माझ्या आईच्या हे फार लवकर लक्षात आलं , तिला वास्तवाचं भान नाही , ती फक्त स्वप्न बघत नाही , ती स्वप्नात जगते
तिला गरीबी म्हणजे टुमदार छोटसं घर, मागे पुढे स्वछ्च अंगण, अंगणात तुळशी वृंदावन कडेला छानशी बाग
फुलझाडं , सायकलीवरून कामाला जाणारा नवरा  त्याच्या हातात जाताना जेवणाचा डबा येताना गजर्‍याची पुडी असं काहीतरी जे ती लहानपणापासून बघत आली होती
वास्तवाची कल्पना  यायला तिचं वयही नव्हतं , तिने निघून येण्याचा जो निर्णय घेतला तो ही ही स्वप्न गृहीत धरूनच, नवरा कमावता आहे म्हणजे हे  सगळं अपोआप होणारच असं तिला वाटत होतं
इथे दहाजणांकडे हात पसरून मदत मागून पद्माकरने एक खोली बारा महिन्यच्या बोलीवर मिळवली, कुठे?
मजासवाडीत गांजावाला चाळीत तळमजला
चौफेर बकाल वस्ती , कचर्‍याच साम्राज्य
वेगवेगळ्या छ्टांची पोसलेली डुकरं भटक्या कुत्र्यांची दहशत वाटावी अशी झुंड
शेजारी पण असे तसेच.. पण बारा महिन्यासाठी हक्काचा आसरा
तो तिला घर दाखवायला घेऊन आला आमच्या घरापासनं तसं लांब तरी आवाक्यातलं
तो  नलिनीला घेऊन गांजावाला चाळीत पोहोचला, मी ही होतो पण खर्‍या अर्थाने ती दोघच एकमेकांच्या सोबत होती, ती आजूबाजूचा परीसर काहीशी गोंधळून बघत होती
तिथे गेल्या गेल्या तिने नाकाला लावलेला पदर काढला नव्हता, तिने सहज विचारलं आपालं घर कुठाय?
तो गोंधळून जरा वरमून म्हणाला हेच
आणि ते संपलीच, तिला कल्पनाच करवेना
शी शी शी ती नकळत गलबलून म्हणाली, तिने खिडकीतून बाहेर बघितलं , खोलीचं छत बघितलं , भिंतीला असलेली ओल तिला एका स्पर्शात जाणवली आणि काकुळतीला येऊन ती म्हणाली
मी नाही इथे राहू शकत , तू जरा अजून चांगलं घर शोध मग आपण तिथे राहू
त्याला कळून चुकलं हिला समजवण्यात काही अर्थ नाही कारण तिला समजणारच नाही
आपण ऐपतीपेक्षा जास्त धाडस दाखवलय, याहून जास्त काहीही होऊ शकत नाही
आतल्या आत तो तात्पुरता शाहणा झाला , सय्यम राखत तो म्हणाला तू आता  शेखर बरोबर घरी जा मी आणखी चांगलं घर शोधून येतो, ती बरं म्हणत माझ्या बरोबर यायला निघाली
मी  पद्माकरकडे बघायचंही टाळलं ,बोलणं तर दूरच, आई म्हणाली तसच झालं होतं
आम्ही गेल्यावर पद्माकर तिथेच जरावेळ बसला
मग बाहेर पडल्या पडल्या त्याने  प्रथम काय काम केलं असेल तर गावाला फोन करून  तो तिच्या घरच्यांशी बोलला त्याने शरणागती पत्करली क्षमा मागितली आपला वेडेपणा मान्य  केला
आणि  आमच्या घरचा पत्ता देऊन मोकळा झाला ते लगेच यायला निघाले , पण याला परत परतावसं वाटेना
तिथेच टपरीवर तो घोट  घोट चहा पीत राहिला
मग त्यालाही वास्तवाचं भान आलं आपल्याला परत जायला हवं तिला समजवायला हवं
या विचाराने त्याने आमच्याकडे यायला पाऊल उचललं
तो घरी आला नलीनी दिसेना, नलू कुठाय? त्याने आईला विचारलं
आई म्हणाली अरे ती परत मजास वाडीत गेली
अंगाचा तिळपापड म्हणतात तसा त्याचा झाला, रागाच्या भरात तो असा काही वेगा ने पोहोचला
बघतोय तर मी निमूट स्टूलावर बसलो होतो आणि ती पदर खोचून घर झाडत होती
मगासची खोली आता तिच्यासाठी  घर झालं होतं
तो ओरडायच्या आधी तीच ओरडली  ए ए थांब तिथच अत्ता पुसलय
ठसा उमटवलास तर बघ
तो जरा  चिडून म्हणाला मगासच्याला इतकी नाटकं केलीस अन आता हे काय
ती हातातलं फडकं टाकत त्याच्या  जवळ आली
म्हणाली गम्मतच झाली
इतके दिवस प्रेम हाये प्रेम हाये म्हणून घोशा  लावत राह्यले
पण खरं प्रेम म्हणजे काय ते गेल्या दोन  तासात समजलं , तू मला दादा बरोबर घरी धाडलस
मी निघाले वळून पाह्यलं तर सगळं संपल्या सारखा तू उभा होतास एकटा
मग मी बी एकटी झाले, अन जाणवलं सोबत  खरी कुठे  र्हातोय कसे र्हातोय  ये जरुरी नाही एकत्र र्हातोय ते महत्वाचं. मग जिथे तू र्हातोस तिथं मी र्हाऊ शकत नाही होय?अन ही तर सुरुवात आहे  मग होईल की सगळं नीट्
 मग दादा बरोबर घरी गेले अन आईला सांगून परत यायला निघाले आईने हळद कूंकू लावलं ओटी भरली म्हणाली आता खर्‍या अर्थानं तू स्वत:च्या घरी निघालीस,  अत्ता  जशी तुझी ओटी भरली आहे तसच तुझं घर सदैव भरलेलं राहुदे
भरल्या डोळ्यानी आवंढा गिळत पद्माकर उभा होता पण ती गळ्यात पडल्यावर ढसा ढसा रडला
आणि मग त्याने सावकाश बाँब टाकला म्हणाला मी अगाऊपणा केलाय
तुझ्या घरी कळवलं तुला घेऊन जा सांगितलय
 पद्माकरने संगितल्याप्रमाणे तिच्या घरचे आले पण आमच्या आई दादानी त्याना समजावलं त्याना ते मान्य झालं नाही पण तू तुझ्या नशिबाची म्हणत ते चालते झाले त्यानी फार ताणून धरलं नाही
आता पद्माकरचा हिरानंदानी मधे अजस्त्र मोठा फ्लँट आहे, स्वत:ची एजंसी आहे
अनुरुप आणि अनिरुध सारखी गुणी मुलं आहेत, पण तरी जिथे त्यानी संसाराची  सुरुवात  केली, जिथे डासांमुळे रात्र रात्र जागून भावी आयुष्याची स्वप्न रंगवली ती गांजावाला चाळीतली खोली अजून सोडलेली नाही
त्यांच्या लग्नाचा पंचविसाव्वा वाढदिवसही आम्ही तिथेच साजरा केला मेधा आणि प्रताप तेव्ह्ढ्यासाठी कँनडाहून आले होते
आता काय ती चाळ सुद्धा रिडेव्हलपमेंटला जायची आहे, आता काही तो एरिया पहिल्यासारखा बकाल राहिलेला नाही तरी ती चाळ पाडायच्या आधी दोघे परत तिथे राहयला आलेत
एकतीस डिसेंबर बहुतेक आम्ही तिथेच साजरा करू....





Comments

  1. superb, ashakya watanari goshta

    ReplyDelete
  2. भारीच....पण डोळ्यात पाणी आलं...
    आमचे दिवस आठवले...राहण्याजेवण्याचे असे हाल काही झाले नाहीत, पण काही वर्षे आम्हीच एकमेकासठिच होतो

    ReplyDelete
  3. जीवन कसे असते, कसे होऊ शकते, कसे त्याला सामोरे जायचे हे आपल्या गोष्टीतूनच शिकावे. नव वर्षा साठी नव्या उमेदीने पहायला ही गोष्ट अगदी समर्पक आहे.

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    आपल्याला हे वर्ष सुख समृद्धीचे व आरोग्यपूर्ण जावो ही ईश्वराकडे प्रार्थना.

    अरविंद केळकर
    औंध, पुणे.

    ReplyDelete
  4. वाह काका...एकच ओळ कथेसाठी...
    प्रेम कर भिल्ला सारखं...बाणा वरती खोचलेलं...माती मधे उगवून सुद्धा...मेघ पर्यन्त पोचलेलं...✌

    ReplyDelete
  5. ग्रेट ग्रेट.... Inspired!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी