जाणीव

मनू असेल तेंव्हा साधरण पाच वर्षांची
भारी गोड मुलगी, खूप हट्टी झाली आहे असं तिची मम्मा म्हणायची, पण बाकी कुणाला तसं वाटायचं नाही
तसे तिचे हट्टही इंट्रेस्टींग असायचे, तिच्या आत्याच्या लग्नात तिलाही लग्न करायचं होतं मंडवळ्या बांधायच्या होत्या, मजा म्हणून  मम्माने बांधल्याही असत्या पण कोणीतरी अनुभवी बाई मम्माच्या कानात कुजबुजली बाई गं  नसते लाड पुरवू नकोस अत्ता कपाळावर मंडवळ्या चढवल्यास तर जेंव्हा खरच वेळ येईल तेंव्हा जड जाईल आणि म्हातार्‍या नवर्‍याशी सोयरीक जुळवावी लागेल
माँर्डन असली तरी ती आईच होती शेवटी , तिच्याच्याने काही हे धाडस झालं नाही
शेवटी मुसमुसत मनू झोपली... 
एरवी तिच्या हट्टापुढे बरेचदा मम्माच थकून झोपायची कारण मनूच्या बालहट्टामधे बरेचदा तिचा बाबा सामील असायचा
मनूला एकदा घरात हत्ती पाळायचा होता, हो  नाही हो नाही करता करता भू भू च्या पिल्लापर्यंत मांडवली फायनल झाली
पण मम्मा त्यालाही नकारच देत होती
पण मनूचा बाबावर पूर्ण भरवसा होता बाबा पण हो हो करत होता
मम्म  करताना, दुपारी मम्माच्या कुशीत गुडूप होताना मनू आपले एक एक बेत ऐकवायची , भू भू ला तिच्या बरोबरीने शाळेत न्यायची पण तयारी होती बाबा त्यासाठी टिचरकडून स्पेशल परमिशन मिळवणार होता
मग स्कूलबस वाल्याशी पण बाबा बोलणार होता,  बाबा भू भू साठी  रेनकोट सुद्धा आणणार होता
भू भू  चे बेत आखण्यात मनू पेक्षा बाबाच जास्त रंगत होता
गेले कित्येक दिवसात मनूला ना परीराणीची गोष्ट आठवत होती ना ससुल्या गडीची
मी तर ससुल्या गडी डुलू डुलू डुलक्या मारी म्हंटलं की छान डोळे मिटून डुलक्या मारायची अँक्टींग करणारी मनू आठवून मम्माला अगदी चुकल्या चुकल्या सारखं व्हायचं
एकच होतं की भू भू च्या गप्पा सुरू झाल्याकी मनूराणी खळ खळ न करता जेवत होती
दूधाचा  ग्लास रिकामा करत होती
हळू हळू हे भू भूचं खूळ कमी होईल अशी मम्माला खात्री होती
आणि म्हणून भू भू चा विषय आपणहून काढायचा नाही अशी बाबाला ताकीद होती आणि घरी येणार्‍या पाहुण्याना इंस्र्ट्रक्षंस...
सगळ्यात जास्त काळ टिकलेला ह्ट्ट  अशी भू भूच्या हट्टाची नोंद झाली
आणि एक दिवस उगवला
मनू स्कूलबस मधून उतरली ते चिमुकल्या पाहुण्याबरोबरच
बस मधला केअरटेकर  मनू बरोबर उतरला, आणि तो चिमुकला जिव घेऊन मम्मापाशी पोहोचला
नुकते डोळे उघडलेला तो अजाण जिव होता ज्याला आपण श्वान योनीत जन्म घेतलाय हे ही कळलेलं नव्हतं
अत्ता घशातून ची ची आवाज येत असला तरी नंतर आपण भू भू करत भूंकणार आहोत याची त्याला कल्पना नव्हती
मम्मा  बघून बिथरलीच  कोरगावकर हे तुम्ही काय उचलून आणलय? मम्मा कडाडली
नाही म्हणू नका भारी जिव  आहे मनूचा... आमच्या शाळेच्या गटारापाशी एका कुत्रीने सहा पिल्लं दिली
बघा कसा गोजिरवाणा जिव आहे
कोरगवकर अहो तुम्हाला तरी कळतय का?
अहो याला अत्ता आईची गरज आहे, आईच्या दूधावर हे पिल्लू तगेल 
कोरगावकर म्हणाले रस्त्यावरची कुत्री असं किती दिवस दूध पाजू शकणार? दोन दिवसात दूध अटेल तिचं
मग मी काय करू? मम्मा वैतागून म्हणाली
आणि मनूनी आवरून धरलेललं भोकाड पसरलं
आजूबाजूची माणसं जमली आणि त्यानी एक क्षणात मम्माला खलनायिका ही पदवी दिली
पोटचं पोर असं रडतय, तो निराधार जिव असा आशेनं बघतोय  आणि ही बाई बघा
हिला कशानं फरक पडत नाही
तरी मम्माने बाबाला फोन लावला.
बाबा दब्या आवाजात म्हणाला आणला का पाहुणा शेवटी?
दोन दिवस मला म्हणत होती भू भूचं बाळ आणुया..
मम्माला कळलं आपल्या एकटीचं काही चालणार नाही, तिने कोरगावकरलाच ते पिल्लू घरी आणून सोडायला सांगितलं, मनूला ते बेडवर ठेवायचं होतं त्याला मात्र मम्माने साफ नकार दिला
मिक्सरच्या जुन्या खोक्यात पोतेरं टाकून त्यात त्याला ठेवलं ,  कोरगावकर दिवाळीच्या शुभेच्छा देऊन चालता झाला
कारण दुसर्‍या दिवशीपासून  मनूची दिवाळीची सुट्टी सुरू होत होती
 तशी कळायला लागल्यापासून मनूची पहिलेच सुट्टी
पण प्राँब्लेम हा की आमच्या मनूला शाळा फार आवडायची, अभ्यास करण्यात ती  रमायची त्यामुळे सुट्टीचं अप्रूप तिला वाटलच नसतं ते या पिल्लामुळे वाटलं 
कोणी नण बोलावता बाबा लवकर घरी आला
मग बाटलीने पिल्लाला दूध पाजण्याचा कार्यक्रम झला 
मित्राशी बोलून, नेटवरून माहीती घेत पिल्ल्लाचं संगोपन सुरू झालं
त्याला जास्त हाताळू नका, त्याला मऊ कापडात गुंडाळून ठेवा,साधारण तीन तासानी दूध पाजा त्यात पाण्याचं प्रमाण किती दुधाचं टेंप्रेचर किती?
मम्मा म्हणाली माझ्या बाळाला वाढ्वतानाही इतका काटेकोर शास्त्रीय विचार केला नव्हता
बाबा म्हणाला एका आईपासनं उचलून आणलेलं लेकरू आहे, आपली नैतीक जबाबदारी आहे ही
पण ते पिल्लू घरात आलं आणि नकळत घरात विभागणी झाली
मम्मा एका बाजूला आणि मनूला घेऊन मनूचे बाबा एका बाजुला
रात्री निजतानाही मनू बाबाकडे सरकते असा भास मम्मला व्हायला लागला, आता तीन दिवस झाले तो जिव या घराला सरावत होता
या तिघातला संवाद संपत चालला होता, कारण मनूला पिल्लाशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं आणि मनूचा  आनंद बघून बाबाला आकाश ठेंगणं झालं होतं या कशातच आपण सहभागी नाही याची जाणीव मम्माला आतल्या आत टोचत होती  आणि म्हणून ती त्या पिल्लाला जास्तच दोशी  समजत होती
पण   तरी दिवाळीचे दिवस होते थोडी  खरेदी करणं बाकी होतं गरजेचं होतं
शेवटी तिच्या पिल्लाचे लाड ही तिची हौस होती नाहीतर मनूनी सांगून टाकलं होतं मम्मा मला भू भू मिलाला आता मला काही पण नको
पिल्लाला मार्केटात नेता येणार नाही कळल्यावर मनू मम्मा बरोबर जायला तयार नव्हती
पण बाबानी समजावलं भू भू अजून लहान आहे, त्याला  गर्दीत नेता येणार नाही, मी भू भू जवळ थांबतो तुम्ही जाऊन या, ही नसती ब्याद नसती तर आज आम्ही तीघं मजेत बाजारात गेलो असतो
या विचाराने तर मम्माला घराबाहेर पडायची घाईच झाली
दोघी मार्केटात पोहोचल्या, दिवाळीचं रंगीबेरंगी वातावरण सगळीकडे पसरलं होतं, झगमगाट दिवाळीच्या आधीच सुरू झाला होता नाही म्हंटलं तरी मनूचा इवलासा जिव हरखला... तिचा आनंद बघून मम्माही सुखावली ती म्हणेल ते घ्यायचं हे तिने ठरवूनच टाकलं
भर गर्दीतून वाट काढत पुढे जाणं मम्मालाही जड जात होतं आणि मधेच मम्माला  एकदम हलकं  हलकं वाटायला लागलं तिने पाहिलं तर तिचं हात धरून चालणारं कोकरू तिच्यापाशी नव्हतं, भिरभिरणारी गर्दी एका क्षणात स्तब्ध झाली, पोटात खड्डा पडणं म्हणजे काय हे मम्माकडे बघून कळत होतं
ती किंचाळली मनूssss  मनूssss
  मनूची ही वेगळी अवस्था नव्हती आपला मम्माचा हात कधी सुटला हे तिलाच कळलं नाही
मम्माssss   मम्माsssss तिने एकच घोशा लावला
ती वाट मिळेल तशी धावत सुटली तशी एका बुजूर्ग बाईने तिला अडवलं आपण तुझी मम्मा शोधुया असं म्हणत तिने तिला उचललं  पोटाशी धरलं  आणि इतक्यात मनूला मम्मा दिसली, कासावीस झालेली मम्मा
अर्धमेली झालेली स्वैरभैर झालेली मम्मा... आपल्या मम्माचं आपल्यावर किती प्रेम आहे याची मनूला कल्पना आली असेल... तिने त्या बाईच्या कडेवरून उतरत मम्माकडॆ धाव घेतली
मम्माने तिला उचलून घेत तिचे किती पापे घेतले कोणजाणे
पण मनू एकदम गंभीर झाली, घरी  जाउया म्हणाली
मम्माने समजावलं अगं असं घडतच असतं घाबरायचं नाही, मी काय सांगितलय आपण हरवलोय असं वाटलं की पोलीसकाकाना आपला अँड्रेस सांगायचा नाहीतर जवळच्या दुकानात जाऊन आपला अँड्रेस सांगायचा शाहणी मुलं अशी घाबरत नाहीत,अन माझ्या मन्नू सारखी ब्रेव्ह मुलं तर कधीच घाबरत नाहीत
पण तरी मनू घरी जाउयाच  म्हणाली, मग काय, दोघी घरी आल्या, रात्र झाली होती,येतानाही मनू गप्प गप्प होती, पोर फार घाबरली आहे हे मम्माच्या लगेच लक्षात आलं , आता  बाबा काही बोलला तर निमूट ऐकून घ्यायला हवं असा विचार करत मम्मा मिनूला घेऊन घेरी आली 
मनू घरी येऊन बाबाच्या गळ्यात पडून रडली, बाबानी शांत केलं म्हणाला त्या भू भूची तू ताई आहेस ना?
मग ताईला रडताना बघून ते हसेल हं 
मनू म्हणाली बाबा आपण जाऊन हे पिल्लू त्याच्या मम्माला परत करू
घर एकदम  अवाक, अनपेक्षीत होतं हे  या घरासाठी
हत्तीला घरी आणलं तर त्याच्यासाठी जागा करणारी मनू  भू भूच्या पिल्लाला आपखुषीने  त्याच्या घरी सोडायला तयार झाली होती
ब्रेन वाँश करायला जमलं का? अशा आशयानं बाबा मम्माकडे बघत होता पण मम्माच मायेनं मनूला पोटाशी धरून ्विचारत होती काय झालं बाळा? भू भूला का परत करायचं सांगतेस?
मनू म्हणाली मम्मा अत्ता तू पुढे गेलीस ना माझा हात सोडून
तेंव्हा मला तुझी खूप आठवण आली, भिती सुद्धा वाटली, मग हे पिल्लू तर खूप लहान आहे, त्याला मम्माची आठवण येत असेल तर ते कसं बोलणार? ते रडलं तरी आपल्याला कसं कळणार?
त्यापेक्षा आपण त्याला त्याच्या मम्माकडे परत करू आणि मोठं झालं की .. सगळ्या  बेबीजना त्यांची मम्मा हवी असते... मम्मा सारखं कोणी नसतं
मम्मा आणि बाबाचे डोळे  वाहयला लागले... बाबा म्हणाला आपली मनू फार लवकर मोठी झाली गं
तशी मम्मा  पण खूप शाहणी मम्मा होत म्हणाली
डोंट वरी बेटा मी तूझी मम्मा आहे ना तशी या बाळाची सुद्धा मम्मा होईन 
मग त्याला त्याच्या  मम्माची गरजच उरणार नाही , ते आपल्या ताई बाबा आणि मम्मासोबत मजेत इथे राहील
खरच? लकाकलेल्या डोळ्यानी मनूनी विचारलं
उत्तरादाखल तिने त्या पिल्लाला आपल्या ओंजळीत घेतलं मग पोटाशी धरलं क्षणात त्या पिल्लाचं पोरकेपण नाहीसं झालं त्या मायेच्या  स्पर्शला असुसलेला तो अजाण जिव मम्माच्या कुशीत शिरला आणि मनूसकट त्या घरानी मम्माला कुशीत घेतलं

Comments

  1. व्वा..हृदयस्पर्शी..👍👍

    ReplyDelete
  2. अप्रतिम काका!आमच्या घरी असेच मनु, बाबा आणि मम्मा आहे आणि माझ्या रूपातील मम्मा अजून त्यांना भू भू आणू देत नाहीये

    ReplyDelete
  3. Khup mast.. dolyatun pani ala..

    ReplyDelete
  4. किती छान 👌👌👌

    ReplyDelete
  5. खूपच ह्रदयस्पर्शी. ही गोष्ट वाचल्यावर साने गुरूजी कथामाले मधल्या 'सर्जा आणि रूळ्या' या गोष्टीची आठवण झाली. किती सहज माणूस आणि प्राणी यातील अंतर मिटवलं आहेत तुम्ही या गोष्टीत.

    ReplyDelete
  6. किती गोड छान मनाला भिडणारी गोष्ट लिहिली आहे... खूपच आवडली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी