तृप्ती

कान्हेरे गुरुजींकडे रात्री हाततल्या बांगड्या खळखळतात
घरात एकही स्त्री नसताना...
अशा बांगड्या रात्री खळखळल्याकी गुरुजी मुलाला ओरडून सांगातात
जाउन बघ रे फाटक उघडं राहिलय बहुतेक
जाऊन बघ रे मोठ्या काकाना श्वास लागलाय बहुतेक.. कोमट पाणी पाज
या प्रकाराला कंटाळून गुरुजींच्या दोन्ही मुलानी लग्न केली नाहीत, म्हणजे या तिरसट माणसाच्या किर्तीमुळे तसे योगच आले नाहीत
आता आयुष्यात यांचे आदेश पाळण्याशिवाय काही राहिलं नाही हे जणू दोन्ही मुलानी मान्य करून टाकलं होतं
कान्हेरे बाई झिजून झिजून गेली तिच्या भाळी हेच भवितव्य होतं.. सुटली म्हणायचीही सोय नाही, जन्मभर अडकलेली तशी मरणानंतरही... म्हणूनच स्वैपाकघरातल्या चुलीजवळच्या फरशीवर बसायची मरणानंतरही तिथेच चिकटलेली राहिली, गुरुजींचा धाकही मेल्यावरही तसाच..
चुलीवरचं दुध उतू चाललं की धास्तावलेल्या बाईच्या बांगड्या भितीने खळखळायच्या, टाकी वाहयला लागली की बांगड्या खळखळायच्या, पंचक्रोशीत या बांगड्यांची मात पोहोचली होती
दर पितृपंधरवड्यात तिच्या तिथीला जन्मभरासारखच बेचव अन्नाचं ताट ठेवलं जायचं सर्वपित्रीला घास दिला जायचा अविधवा नवमीला साडी चोळी दिली जायची पण तरी बाईचा आत्मा भुकेला तो भुकेलाच..
गुरुजी अंथरुणाला खिळलेले, मोठे काका आरामखुर्चीत चिकटलेले, हे दोघे तरूण रिकामटेकडे सहस्त्रनाम पुटपुटत जागीच खोळंबल्या सारखे, सगळे हळू हळू संपायच्या मार्गावर असल्यासारखे.. कोणी घराकडे फिरकायचं नाही, कोणी ओळखीचं हसायचं नाही.. हे भाऊ तरी एकमेकाशी काय बोलणार?
वास्तूला जणू भावितव्यच उरलं नव्हतं, असाच काही काळ सरकत राहिला
आणि उतारवयाची एक स्वैपाकीण जुनी ओळख सांगत या काळवंडलेल्या वास्तूत आली.. घरात बाईचा वावर सुरू झाला तशी स्वैपाकीणीची गरज नव्हती... घरात शिजत काय होतं? मेतकुटभात हा रोजचा आहार होता या तिघांचा, चैन म्हणजे चवीला अंबुशीचं लोणचं ते ही धाकट्या मावशीने कधीचं पाठवलेलं..पण योग होता म्हणा आणि बाई कान्हार्यांच्या स्वैपाकघरात ओट्याशी उभी राहयला लागली.. घरात वावरायला लागली, आवरा आवर करायला लागली, आणि सांगायचं म्हणजे घरातल्या
इतराना फक्त गेलेल्या बाईंच्या बांगड्यांचा आवाज यायचा
पण सैपाकीण बाईना कान्हेरे बाई दिसल्या कृश शरीर, खोल गेलेले तीक्ष्ण भेदरलेले डोळे पण डोळ्यातली चमक तशीच वृत्ती भित्री आवाज कातर, हातात हातभर बांगड्या, कपाळावर रुपाया इतका कुंकवाचा टीळा त्यावरच हळदी कुंकवाचे थर
स्वैपाकीण बाई घाबरली नाही तिने विचारलं बाई का अडून राहिलाय?
काय हवं ते सांगा माझ्या कुवतीनुसार करेन
बाई भित भित म्हणाल्या दुसरं काही नको पोटभर जेवायला घाल
जन्मभर या माणसाने धाकात ठेवलन कधी चवी ढवीचं खाऊ दिलं नाही कांदा लसूण तिखट मीठ सगळ्यावर याचा करडी नजर अर्ध आयुष्य वरण भाताशी शेवग्याच्या पाल्याची अळणी भाजी खाऊन काढले
शेजारच्या वास्तूत चमचमीत चवदार जेवणाचा गंध दरवळायचा त्यात रमले तरी या माणसाला चालायचं नाही उकळत्या पाण्याची चूळ थुकायला लावायचा तोंड पोळलं की पुढचे दह दिवस जीव होरपळायचा
एकदा माझ्यासाठी चारीठाव स्वैपाक कर कांद्या ल्सणीची फोडणी दे साजूक पोळीशी कांद्या बटट्याचा चमचमीत रस्सा कर गंध घरादारात घमघ्मुदे...
मग माझं ताट त्या आढापलिकडे नेऊन ठेव मनसोक्त आस्वाद घेते आणि या वास्तूला सोडून जाते
स्वैपाकीण बाई म्हणाल्या हक्काचं घर असताना तुम्ही का आडा पलिकडे बसाल?
जर धीर धरा तुम्हाला हवा तसा स्वैपाक करते
आणि इथेच तुमचं ताट वाढते...नुसत्या कल्पनेने बाई जागच्या जागी शहारली
बांगड्या खळखळल्याचा आवाज घरभर घुमला भर दिवसा बांगड्या खळखळलेल्या बघून कान्हेरे गुरुजीना धडकी भरली, ते बावचळले
दोन्ही मुलं स्वैपाक घरात धावली
बाईनी त्याना सामुग्री आणायला सांगितली दोघे मान खाली घालून उभे
काय झालं? बाईनी विचरलं
आमच्याकडे सामुग्री आणायला पैसे नाहीत आणि गुरुजी पैसे हातावर ठेवणार नाहीत
पून्हा बांगड्यांचा खळ्खळाट झाला बाईना कळलं या बाई सुद्धा घाबरल्या
त्यानीच त्या अत्रुप्त आत्म्याला धीर दिला
आपली पडशी उघडली आणि काही रक्कम मुलांच्या हातावर ठेवली
पदार्थांची नावं ऐकूनच मुलाना उत्साहं आला, ते दोघे सांगितल्या बरहुकूम सामुग्री आणायला धावले, गुरुजी किंद्र्या आवाजात चित्कारत राहिले पण आज त्यांच्याकडॆ लक्ष द्यायची गरज नव्हती बाई खुणेने म्हणाल्या तुम्ही निघा मी बघते.. बाईनी कान्हेरे बाईना बसायला पाट दिला आपण कोण कुठून आलो ते सांगितलं बोलता बोलता त्या कामाला लागल्या...
आणि अचानक ती काळवंडलेली वास्तू सुग्रास स्वैपाकाच्या चटकदार गंधाने घमघमली
कान्हेरे गुरुजी अंथरुणात तडफडले.. कार्दावले पण कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही
बाईनी मायेनं कान्हेरे बाईंचं ताट वाढलं.. कांद्याची भजी, खमंग अळुवडी, कांद्याबटाट्याचा रस्सा,भरली भेंडी, काकडीची कोशिंबीर गोडाचं म्हणून बासुंदी त्याना बसायचा आग्रहं केला
भित्रा जीव तो.. बसायला मागेना
बाईनी तिच्या दोन्ही मुलाना समजावलं भीऊ नका सांगितलं
मुलं पण आपल्या नं दिसणार्‍या आईशी बोलली आई भिऊ नकोस.. चल आम्ही पण तुझ्या बरोबर जेवायला बसतो, गुरुजी अंथरुणातून उठू शकत नाहीत , ते नाही येणार इथे, तू बस
मग डोळ्याना नं दिसणार्‍य़ा आई बरोबर दोन्ही मुलं जेवायला बसली अशी अनोखी पंगत स्वैपाकीण बाई डोळे भरून बघत होत्या
इतक्या वर्षानी दोन्ही मुलांच्या मुखात असं काहीतरी रुचकर जात होतं दोघे जेवणात रमली आणि बाईंच्या बागड्या नुसत्याच किणकिणत राहिल्या.. त्याचा ध्वनी फक्त त्या स्वैपाकीण बाईना ऐकू आला
बाई अगत्याने म्हणाल्या बाई तुम्ही जेवाना
बाई म्हणाल्या थांब जरा आधी मला माझ्या मुलाना असं पोटभर जेवताना बघुदे...
माझ्यापेक्षा माझा त्यांच्यासाठीच जिव तुटायचा..
मुलं म्हणत राहिली आई जेवतेस नाss आई जेवतेस नाss मावशीने बघ काय फक्कड बेत केलाय..
कान्हेरे बाई बाईना म्हणाल्या जरा मुलाना त्यांच्या वडीलांकडॆ पाठव तू पण बाहेर जा मी माझे घास घेते
मुलं हात धूउन निर्भयपणे गुरुजींकडे गेली
स्वैपाकीण बाई बाहेर जाते दाखवत तिथेच थांबल्या आणि बाईना जेवताना बघायचं म्हणून आत डोकावल्या अन जे दृष्य पाहिलं ते पाहून त्यांची बोबडीच वळली... काय पाहिलं ते त्या कधीच कुणाला सांगू शकल्या नाहीत
बाईनी बरेच दिवस  अंथरुण धरलं पण मुलानी त्यांचे उपकार स्मरून त्याना सांभाळलं,कारण त्या नंतर कधीच वास्तूत बंगड्या खळखळल्या नाहीत,त्यांची आई मुक्त झाली
बाईना भेटायला विचारपुस करायला त्यांची माणसं जा ये करायला लागली
त्या बाईंच्या नातेवाईकांमुळे त्या निर्जन वास्तूत लोकांचं येणं जाणं सुरू झालं त्यात मधे कान्हेरे गुरुजी हे जग सोडून गेले आणि बाईंच्याच मध्यस्थीने मोठ्याची सोयरीक जुळली
वास्तू एका शापातून मुक्त झाली आणि एका वरदाना साठी सज्ज झाली..

Comments

  1. शीर्षक अगदी शोभेल असच आहे....तृप्ती...👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी