बालपण

आम्ही थोरांताच्या बंगल्यात राहयला आलो तेंव्हा दिघे कुटूंब आमच्या शेजारी होतं.आमच्या दोघांच्या घराची मेनडोअर्स विरुद्ध दिशेला होती पण यायला जायला आम्ही सर्रास मधल्या खिडकीचा वापर करायचो
आणि तसा इमर्जंसीला तोच रस्ता उपयोगी पडायचा. इमर्जंसी म्हणजे दिघे वहिनीना कसला तरी स्नायूंचा आजार होता अचानक त्यांच्या पाठीत लचक भरायची किंवा हात जखडला जायचा. मुलं घाबरून जायची. आमच्या नावाने ठणाणा केला की आम्ही तयारीत असल्यासारखे धाव घ्यायचो. उमला त्यांना बरोबर सावरता यायचं असं नेहमी नाही पण तरी वरचेवर व्हायचं. त्यात मुलांचे बाबा पोस्टींग झाल्यामुळे बेरूटला होते. तीन मुलं आपल्या आईच्या आधाराने राहयची
मोठी वीन्नी बारावी तर मधला गोपी दहावी तर सगळ्यात धाकटा छेलू सहावीत अशी दिघे कंपनीची गँग होती. शैलेशचं त्याच्यामुळेच छेलू झालं होतं लहानपणी त्याला नाव विचारलं की शैलू पेक्षा सोप्प असं छेलू सांगायचा म्हणे मग तेच नाव कायम झालं होतं
पण खरं सांगतो छेलू थोरातांच्या बंगल्याची जान होता.
मोठे दोघे तसे अभ्यासात हुषार होतेच पण कधी अभ्यासाचं कारण पुढे करायचं आणि कधी सोयी नुसार टंगळ मंगळ करायची हे दोघाना कळायचं.
उमा नेहमी दिघे वहीनीना म्हणायची "तुम्ही फार लहान वयात या धाकट्याला मोठं करून ठेवलय" वहिनीना ते कळायचं पण खंताऊन त्या म्हणायच्या या दोघांची महत्वाची वर्ष आहेत म्हणून.... नाहीतर मलाही कळतय..
अहो पण वर्ष म्हणजे मोजून तिनशेपसष्ट दिवस... कल्पना करा अकरा बारा वर्षांचा मुलगा आईच्या प्रत्येक हाकेला ओ देत धावत जातोय, त्यात परत मोठ्या भावंडांची आरेरावीही सहन करतोय असं किती काळ चालणार? म्हणजे तसा आमचा छेलू इतर मुलांपेक्षा दोन तोळे जास्तच समजुतदार होता. पण लहान मुलाचा समंजसपणा म्हणजे पत्त्याचा बंगला.चढेल तो पर्यंत चढत जाईल पण कोसळला की...
आमच्या शाहण्या छेलूचं पण तसच झालं एक दिवस
देवाची पुजा करण्यापासनं ते दुकानात, बँकेत,डाँक्टर कडॆ गरजेनुसार जाण्यात छेलू विनातक्रार तयार असायचा. त्यात कधी विन्नीचे पेपर्स झेर्रँक्स करून आण गोपीच्या सायकलीत हवा भरून आण ही अँडिश्नल कामंही त्याला करावी लागायची पण त्याने एखादं छोटसं काम कधी सांगितलं तर त्या दोघाना लगेच त्यांचा अभ्यास आठवायचा
आणि हळू हळू छेलूला जाणवायला लागलं. की हल्ली आपली आई आपल्याला फक्त काम सांगायला हाक मारते आणि सांगितलेलं काम झालं का हे विचारायला हाक मारते, त्या दोघांचा अभ्यास जसा महत्वाचा आहे तसा माझाही अभ्यास महत्वाचा आहे.आणि माझाही शाळेत नेहमी पाचाच्या आत नंबर असतो. आणि त्याचं बालमन कुरकुरायला लागलं . काय होतय हे त्याला सांगता येईना पण त्याला आईसकट सगळ्यांचाच राग आला.
उमा म्हणाली राग येईल नाहीतर काय? गोफणीच्या दगडासारखी त्या पोराची अवस्था करून टाकली आहे....दिघे वहिनीना सुद्धा कळत होतं त्यानी रुसून बसलेल्या छेलूला आपल्या कुशीत घेतलं आणि दुसर्‍या दिवशी तो म्हणेल तसं त्याच्या मर्जीनुसार दिवस घालवायचं कबूल केलं. सकाळी उमाच्या हातचा शीरा आणि जेवायला कोलंबीचं भुजणं, शाळेला दांडी आणि ही दोघं शाळा काँलेजात गेल्यावर घरात नुसता दंगा.. चोवीस तासाच्या अवधीत अठ्ठेचाळीस तासांचा मेनू ठरवून पोरगा झोपी गेला
आणि त्याच मूड मधे सकाळी उठला.पण तो उठायच्या आधीच घरचं वातावरण ढवळून निघालं होतं गोपी परिक्षेला बसायला तयार नव्हता. ड्राँप घ्यायची भाषा करत होता त्याचे ट्युशन टिचर आणि दिघेवहीनी डोकं धरून बसले होते आम्ही दोघेही खिडकीचा वापर करून घरात हजर झालो होतो.उमाने रवा भाजून तयार ठेवला होता. पहिल्या अटीप्रमाणे छेलू आई जवळ आला ते दुध मागायला हल्ली कितीतरी दिवस सकाळचं दुध तो एकटाच बसून घ्यायचा पण आई आज त्याच्या बरोबर बसणार होती.. तरी वहिनी संय्यम राखून म्हणाल्या "उमा त्याला जरा दुध ओतून दे मी आलेच उमा त्याला बाबा पुता करत घेऊन गेली पण त्याचं मन जरा खट्टू झालं. आणि मग सगळं बिनसतच गेलं गोपी परिक्षेला बसायला तयार नाही यातलं गांभिर्य त्याला कळण्यासारखं नव्हतं आणि गोपीच्या फुकट जाणार्‍या वर्षापुढे दिघे वहिनीना छेलूचा एक दिवस
महत्वाचा राहिला नाही. उमाने मान्य केल्याप्रमाणे शीरा घेऊन आली पण तो पर्यंत दिघे वहिनीनी कालचा करार मोडला होता. गोपीचा राग त्या छेलूवर काढत
होत्या लेकी बोले सुने लागे चा प्रयोग चालू होता पण ते आपल्या छोट्या हिरोच्या लक्षात येत नव्हतं. त्याने देखील मग पूर्ण असहकार पुकारला. आई आपली म्हणत राहीली मर मर मरते कोणासाठी? तुमच्या साठी तुमचे बाबा इतक्या लांब एकटे जाऊन राहतात कोणासाठी? तुमच्या साठी आणि इथे तुम्ही करा मनमानी... छेलूला संताप अनावर झाला आणि त्याने चार तांबे डोक्यावर ओतून अंघोळ केली पुजा करायचा सवालच नव्हता पण आईच्या पदराला डोकं पुसायची सवय असताना ओल्या केसांचा भांग पाडला उमाने गरम गरम शीरा समोर केला पण त्याकडे नं बघता त्याने शाळेची तयारी केली आणि शाळेत चालता झाल.
शाळेत आल्यावर त्याच्या लक्षात आलं आपण एक तास लवकर शाळेत आलोय. ओस पडलेला शाळा कशीतरीच वाटत होती. आपण घरी गेल्यावर शाळा अशी दिसते? तो उगीच अस्वस्थ झाला त्यात त्याला आठवलं आज पहिले दोन्ही ड्राँईंगचे तास आहेत आणि आपण ड्राँईंगचं साहित्यच नाहीआणलं. आज आपण शळेतच येणार नव्हतो आईमुळे यावं लागलं, आई त्यादोघांच्या कशी मागे मागे करते.त्याना हवं नको ते बघते. माझं दप्तर मात्र मीच भरतो..विचार चालूच होते पण तेव्ह्ढ्यात शाळा गजबजायला लागली एक एक करत मुलं जमायला लागली.तशी छेलूच्या पोटातही भुकेचा खड्डा विस्तारायला लागला. आपण आज आवंढे गिळण्याशिवाय दुसरं काही गिळलेलं नाही उमाकाकीने शीरा समोर धरला पण तो ही....
शाळा भरली. नेहमीची प्रार्थना, सुचना झाल्या, ड्राँईंगच्या बाई गैरहजर असल्याने छेलू वाचला पण त्याचा आनंदही छेलूला साजरा करता येईना. कारण एक तर डोक्यात राग आणि भुकेमुळे तोंडात कडू चव...सगळं असह्य होऊन बसलं. तेव्हढ्यात क्लास टिचर आल्या. नेहमीचे सोपस्कार झाले. प्रेझेंटी घेतली. होमवर्कचा विषय निघाला.छेलूचा थोडा होमवर्क राहिला होता कारण त्याला सकाळी अभ्यास करायची सवय होती. बाईनी विचारलं कोणी कोणी अभ्यास केलेला नाही? दोघं तिघं उभे राहिले त्यात मला वाटतं पहिल्यांदीच छेलू या कारणासाठी वर्गात उभा राहिला असावा. आता बाई रागवणार हे नक्की होतं
पण झालं उलटच.बाई मायेनं म्हणाल्या छेलू आज नाही जमला अभ्यास करायला काही हरकत नाही असं होतं कधी कधी
आणि इतर मुलांकडे बघून बाई म्हणाल्या तुम्हाला वाटेल मी पार्शँलीटी करतेय पण तसं नाही. मी काल आमच्या डाँक्टरांकडे औषध घ्यायला गेले होते तिथे छेलूची आई मला भेटली. छेलूच्या आईलाही वरचेवर बरं नसतं त्यात छेलूचे बाबा परदेशात असतात. याची दोन्ही भावंड अभ्यासात बिझी असतात
मिसेस दिघे म्हणाल्या छेलू हाताशी आहे म्हणून मी उभी आहे, फार लहान वयात घरचा धाकटा असताना तो मोठा होऊन बसलाय.तो स्वत:चा अभ्यास स्वत:हा करतोच पण मला प्रत्येक कामातही त्याची मदत असते. मला त्याचा फार मोठा आधार आहे... छेलू ऐकतच राहिला... आई आपल्याबद्दल.... बाई पुढे म्हणाल्या कदाचीत तुम्हाला अत्ता जाणवणार नाही पण आपल्या आईला आपला आधार वाटण्या सारखी दुसरी ग्रेट गोष्ट या जगात नाही.म्हणून एखादा दिवस त्याने अभ्यास केला नसेल तर... बाईंचं वक्य पूर्ण व्हायच्या आधीच टाळ्यंचा कडकडाट वर्गात घुमला.. रडू आवरत आवंढा गिळत छेलूने बाहेर बघितलं तर रणरणत्या उन्हात छेलूची आई त्याच्यासाठी डबा घेऊन येताना दिसली. मग तर त्याला रडू आवरलच नाही... आपल्या इथे दुपारी रिक्षा सुद्धा मिळत नाही.हमसाहमशी रडणार्‍या छेलूकडे बघून कोणालाच कळेना काय झालं
त्याच्या भोवती कोंडाळं जमत असतानाच आई दाराशी पोहोचली. आई आई मी चुकलो म्हणत छेलू आईला बिलगला. दिघेवहिनीनी सुद्धा त्याला घट्ट पोटाशी लपेटला... त्या बाईना एवढच म्हणाल्या मी त्याला घरी नेऊ का? त्याची तब्येत बरी नाहिये.
दोघं मायलेक घरी परतले तेंव्हा तरंगत येणारा छेलू नेहमीप्रमाणे खिडकीतून आत आला तो पर्यंत दोन्ही भावंडाना आम्ही समजावलं होतं. काय नेमकं झालय ते त्यांच्याही लक्षात आलच होतं त्यामुळे छेलू भोवती सगळं घर जमलं आणि त्याचा तो निरागस आनंद शेअर करायला आम्ही तिथे हजर होतो....

Comments

  1. नेहमीप्रमाणे खूप छान ! तुम्हाला खरच अशी माणसं भेटतात की फक्त तुम्हालाच ती कळतात ? फार छान खरच !

    ReplyDelete
  2. ही गोष्ट होती म्हणून, नाहीतर अशाच छैलूंचे पुढे स्फोट होतात.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं , म्हणूनच जा वयात शक्य तितकं जपावं मुलाना
      शिस्तीचे काटेकोर नियम काय्म लाऊ नयेत

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी