ठका

आडदांड शरीरयष्टीचा ठका समोर आलाकी अनेकांची गाळण उडायची
त्याच्या भेदक नजरेचे किस्से अनेक ठिकाणी चघळले जायचे.. ठका फार कुठे दिसायचा नाही आणि दिसला तर दखल घ्यायला लावायचा
त्यानी अनेकाना मार्गी लावल्याच्या वार्ताही अशाच पसारायच्या आणि विरून जायच्या पण त्याचा परिणाम मात्र अधीकच गडद होत जायचा
या दहशतीमुळेच हल्ली ठकाची मनमानी खूप वाढली होती.. त्याच्या भेदक नजरेला नजर भिडवणारं पंचक्रोशीत कोणी दिसत नव्हतं
पण आज आपल्या नायकाचा नाईलाज झाला... त्याच्या विधवा बहिणीला ठकाने भर बाजारात छेडलं आणि राजरोसपणे तिन्हिसांजेला गावाबाहेर खापरीच्या वाळवंटापाशी यायला बजावलं
ती कशीबशी जीव मुठीत ठेऊन घरी आली आनि त्याचाच जाब विचारायला आपला नायक खापरीच्या वाळवंटापाशी आला..
तो आला तेंव्हा तिन्हिसांज पार पडायच्या बेतात होती तरी काळोख कभीन्नं व्हायचा होता.. गावाबाहेर वारा रोंरावत होता, बाभळीची खुरटी झुडपं वारा सोसत निमूट हेलकावत होती इतकीच काय ती त्या वातावरणात हालचाल जाणवत होती निरव शांतता अंगावर येत होती अशा वातावरणात ठका नायकाच्या ताईसाठी व्याकूळ झाला होता
आकाशाकडे बघत तो वाळवंटात उताणा पडला होता .. चाहुल लागली तशी त्याने वळून बघायचे कष्ट घेतले.. पाहिलं तर नायक त्याच्या जवळ येत होता जरा अंदाज घेतला तर एकटाच दिसत होता..
तो जवळ आल्यावर तर ठकाची खात्रीच पटली.. हा काही मनधरणी करायला आलेला नाही.. जाब विचारायला आलाय
दोघेही आमने समाने भिडले.. खूप दिवसानी कोणीतरी ठकाच्या भेदक नजरेला आपली भेदक नजर भिडवायची हिम्मत दाखवत होतं
विनाकारण बोलायची ठकाला सवय नव्हती.. त्याने आपलं सरळ सुजीर नाक फुगवलं आणि आग ओकणारे दोन डोळे आपल्या नायकावर स्थिरावले, आकाशातल्या विजेसारखी त्याच्या कपाळावरची नीळी नस तटतटली आणि नायक त्याचं ते ऊग्र रूप बघत असतानाच ठकाने त्याला मागे ढकललं
आणि काही कल्पना नसताना आपला नायक गडगडत गडगडत खाली निघाला
वाळवंटाखाली इतकं खोल तळघर आहे याची त्याला कल्प्नाच नव्हती..पायरी मागे पायरी पार करत तो शेवटी तळघराच्या दमट ओलसर जमीनीवर आदळला
वाळवंटा खाली ओलसर जमीन? .. त्याने अवती भवती बघायचा प्रयत्न केला बराच कचरा, भंगारातल्या वस्तूंचा ढीग पसरला असावा असं त्याला वाटलं तेव्हढ्यात त्याला भानावर आल्यासारखं झालं जितकं खाली आलो तितकच आपल्याला वर जायचय याची त्याला जाणीव झाली
तो भर भर पायर्या चढायला गेला पण पायर्या इतक्या तेलकट ओशट होत्या की जितकं चढणं सोपं वाटत होतं तितकच ते जिकरीचं होतं
पडत धडपडत तो झडपेपाशी आला आणि ठकाने वेळ साधून झडप बंद करून टाकली , मिट्ट काळोख पसरला.. त्याने सर्व शक्तीनिशी झडपेवर धडका द्यायला सुरुवात केली पण व्यर्थ... त्याने लाथा मारल्या धक्के दिले शेवटी अतीव थकव्याने त्याला भोवळ आली आणि पून्हा तो तसाच जिन्यावरून खाली कोसळला पून्हा त्याने ती ओलसर जमीन गाठली
एक क्षण त्याला हा आपला मनाचा खेळ वाटला... त्याने जस्ट एक धक्का दिला काय आणि आपण मागे पडलो काय... त्याने डोळे चोळून बघितलं
भोवती सगळं दमट ओशटच वातावरण होतं एक मोडकी आराम खुर्ची होती, पींप होती तेलकट तुपकट कागदांचा पसारा होता..
त्याने अजून कुठून मार्ग मिळतोय का शोधायचं ठरवलं तो गरा गरा फिरला त्याच्या कल्पनेपेक्षा तळघर मोठं होतं त्याला खूप चोरकप्पे होते पण बाहेर जायचा मार्ग तो एकच होता
त्याही परिस्तिथीत त्याने हातशी लागलेला दंडुका धरला आणि परत तो तेलकट जिना चढायला लागला
अत्ता नाही तर मग ठका दार किलकिलं करेलच आणि संधीचा फायदा घेऊन आपण त्या दारात हा दंडुका अडकवून त्याच्यावर हल्ला करू असे काय काय मनसुबे करत तो त्यात रमायला लागला...त्याने मोठया जिकरीने जीना पार केला झडपेशी आल्यावर त्याच्या लक्षात आलं उजाडायला आलय आता गवळ्यांची कामकर्यांची वर्दळ सुरू होईल उतावीळ होऊन त्याने परत धडका दिल्या आणि पून्हा तसाच ग्लानी येऊन तो गडगडला
मग मात्र त्याच्यात पडल्या जागेवरून उठायचं त्राण उरलं नाही.. तो ग्लानीत गेला आणि त्याला त्याच्या नावाच्या हाका ऐकू आल्या त्याला शोधायला त्याची माणसं वळवंट तुडवत होती त्याचे अप्पा, भिडे गुरिजी, शेजारचा मोरू
भिकूमाळी.. त्याने परत जिना चढायचा नेटाने प्रयत्न केला पण त्याचा क्षीण आवाज त्या लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता त्यांचा आवाज याला हलकासा का होईना पण येत होता.. त्याने टाहो फोडला पण व्यर्थ त्याचा काही उपयोग झाला नाही.. इथे वाळवंटात तळघर असेल याची कुणाला कल्पाना? पडेपर्यंत त्याला तरी कुठे होती..
शेवटी सगळी आशा सुटल्या सारखा तो जमीनीवर पडून राहिला आता फक्त ओलसर जमीनीमुळे अंग ठणकत असल्याची जाणीव आणि कानावर काही आवाज घेत तो तसाच पडून राहिला
एक दिवस, दोन दिवस तीन दिवस आपला नायक सताड डोळे उघेडॆ ठेऊन निर्विकार नजरेने आढ्याकडॆ बघत पडून होता डाक्टर तपासत होते पण तो कशालाच प्रतिसाद देत नव्हता.. घरचे त्याच्या काळजीने व्याकूळ झाले होते
त्यात ती सुद्धा होती "ईला’ आपल्या नायकाची नायीका
ती पून्हा पून्हा विचारत होती ठका तिथे होता का?ठका तिथे होता का? तिच्या तोंडी ठकाचं नाव ऐकून ताई चपापली पण बाकिच्यानी उडवून लावलं
ठका कशाला तिथे असेल?... आम्ही गेलो तेंव्हा हा एकटाच वाळवंटात पडला होता.. तरी ईलाने ताईचा ताबा घेतला तिला खोदून खोदून विचारलं शेवटी ताईने झाला प्रकार सांगितला
ईला म्हणाली ताई अगं आपला नायक ठकाच्या बंधनात गेलाय,त्याचं अंतर्मन ठकाच्या प्रभावाखाली गेलय.. त्याला सोडवायला हवं हे वैद्यकीय उपचार काही कामाचे नाहीत डाक्टर उपचार करत राहतील आणि आपला माणूस आपल्या डोळ्या देखत झुरून झुरून मरुन जाईल मग ताई म्हणाली आता काय करायचं?
ईला म्हणाली या विद्येचा उतारा माझ्याकडॆ आहे...काही करून ठकाला बेशुद्ध करायला हवं त्याचं स्वत:च भान हरपलं की त्याच्या हातून सावज सुटेल.. तो स्वत:हून त्याला मोकळं करेल असं वाटत नाही , ठकाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल
ताई घाबरली पण ईलाने तरी तिला हिम्मत दिली भरौसा दिला
ठरवल्याप्रमाणे
ताई परत सहज निघाल्या सारखी ठकाच्या समोरून निघाली...ईला तिच्या मागावर आहे याची त्याला कल्प्नाही नव्हती
मानभावीपणाने ठका आपल्या नायकाची विचारपूस करायला तिच्यापाशी आला.. ईला मागे असल्याने ताई धीराने बोलली.. म्हणाली काय झालय कळत नाही पण पार दुसर्याच दुनियेत असल्या सारखा झालाय
ठका म्हणाला माझ्या ओळखीचा मांत्रीक आहे.. येत असशील तर चल आपण त्याला घेऊन येऊ, डाक्टर काही करू शक्णार नाही
ताई म्हणाली ..अप्पाना विचारते.. तो उतावीळ होत म्हणाला त्यात त्याना काय विचारायचं ? तुझा भाऊ बरा झाला तर त्याना नकोय का?
ईलाने जा अशी खूण केल्यावर ताई त्याच्या बरोबर चालायला लागली ठका भलताच खुश होता,दोघे कधी गावाबाहेर आले हे त्याला कळलही नाही खापरीचं वाळवंट लागल्यावर ताई थबकली आणि त्याने तिला जवळ ओढली ईलाने धीरानं घे सांगत दोन क्षणांचा अवधी जाऊ दिला ताई ठकाच्या मिठीत स्थिरावली आणि ईलाने बरोबर डाव साधून हाततल्या लाठीने ठकाच्या डोक्यात जोरदार प्रहार केले एकदा दोनदा तीनदा ठकाचं डोकं फुटलं तो बेशुद्ध झाला आणि इथे नायकाचं बंधन सुटलं तो भानावर आला,आपण आपल्या घरात सुरक्षीत असल्याचं त्याला जाणवलं भवतीचं आभासी जग नाहीसं झालं होतं पण तीन दिवसाच्या त्या अधांतरी अवस्थेने त्याला थकवा आला होता...
आणि इथे ईला सांगत होती ही विद्या या हलकटाने माझ्या वडिलाकंडूनच घेतली होती त्यांचा डोकं फुटून अंत झाला
ताईने उत्सुकतेने विचारलं तुझ्या वडिलाना कोणी मारलं ?
ईला शांतपणे म्हणाली माझ्या आईनेच... या विद्येच्या जोरावर ते ही मुजोर झाले होते माझ्या धाकट्या मावशीला कह्यात घेण्यासाठी त्यानी तिला अशाच अवस्थेत नेलं होतं ऐन विशीतली माझी सूंदर नाजूक मावशी अस्थीपंजर झाली होती शेवटी आईला हा निर्णय घ्यावा लागला...माझ्या मावशीला आपण ऊंच कड्यावर उभे आहोत असं वाटायचं आम्ही उशा पायथ्याशी असून काही उपयोग नव्हता.तिला कोणाचीच सोबत जाणवायची नाही.दिसायचे ते फक्त कवटाळू पाहणारे माझे बाबा शेवटी आईने निग्रहाने पाऊल उचललं ... ठकाकडॆ बघून ती म्हणाली हा मरेल असं वाटत नाही..
आता हा शुद्धीवर यायच्या आधी आपण इथून जाऊ म्हणजे याला कायम वचक राहील की कोणीतरी आहे ज्याला याच्या विद्येचा सुगावा आहे, याचा माज उतरेल
दोघी झपाझप घराकडॆ जायला लागल्या..
गोष्ट इथे संपली की सुरू झाली?..

Comments

  1. बापरे!!! भारी होती गोष्ट

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी